गोवा विद्यापीठाच्या परीक्षा १ जूनपासून सुरू होणार

0
121

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे  गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये दुरूस्ती केली असून १ जून २०२० पासून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ला १६ जुलै २०२० पासून प्रारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू व इतर अधिकार्‍यांशी परीक्षा व आगामी शैक्षणिक वर्षाच्या विषयावर मंगळवारी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी यांनी परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाबाबत सुधारित परिपत्रक ७ एप्रिलला जारी केले आहे.

विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांना १५ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वर्ष २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील दुसर्‍या सत्राचा विस्तार १५ जुलै २०२० पर्यंत करण्यात आला आहे. परीक्षांना १ जून २०२० पासून सुरुवात केली जाणार आहे.  विद्यापीठाच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांवर वर्गातील हजेरीची सक्ती करू नये, असे परिपत्रकात म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी डीन, विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख, संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्याची १५ मार्च रोजी बैठक घेण्यात आली होती.