विजय सरदेसाईंकडून म्हादईवरील कर्नाटकच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

0
5

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर व इतरांच्या समवेत म्हादई नदीला भेट देऊन कर्नाटक सरकारकडून म्हादईचे पाणी वळविण्यासाठी सुरू केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या कामाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही, असा दावा आमदार सरदेसाई यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईच्या प्रश्‍नाकडे वेळीच गंभीरपणे लक्ष द्यावे; अन्यथा कर्नाटकाने पाणी वळविल्यास गोव्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

म्हादईच्या रक्षणासाठी सर्व ती खबरदारी घेत असल्याचे राज्य सरकार सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकार म्हादई व उपनद्यांच्या संरक्षणाबाबत गंभीर नाही, अशी टीका त्यांनी केली म्हादई जलतंटा लवादाने पाणी वळवण्यासाठी सर्व ते परवाने घेण्याची अट घातलेली आहे, असे असूनही कर्नाटकने सर्व नियम पायदळी तुडवून सर्वबाजूनी पाणी वळवण्याचा चंग बांधलेला आहे. कळसा, भांडुरा, हलतरा नाल्याचे पाणी मलप्रभेच्या पात्रात वळवले आहे, असेही त्यांनी सांगितले
दुर्गादास कामत यांनी याप्रश्नी आम्ही कर्नाटकला रोखण्यास अपयशी ठरलो, तर त्याचे पर्यावरण व इतर बाबतीत गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी दीपक कळंगुटकर, दिलीप प्रभुदेसाई उपस्थित होते.