राजस्थान रॉयल्स व कोलकाता यांच्यात आज आयपीएलचा सामना होणार आहे. राजस्थानने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहे. तर कोलकाताने एक विजय व एक पराभव अशी नोंद केली आहे. राजस्थान विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर कोलकाता आपल्या दुसर्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
जोस बटलर व संजू सॅमसन यांच्या रुपात दोन स्पेशलिस्ट यष्टिरक्षक संघात असल्यामुळे खराब फॉर्ममध्ये असलेल्या उथप्पा याला वगळणे राजस्थानसाठी सोयेचे ठरेल. त्याच्या जागी मनन वोहरा याला खेळविण्याचा पर्याय आहे. स्टीव स्मिथ व संजू सॅमसन ही दुकली जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्यांच्यासाठी चिंतेचे कारण नाही.
तेवतिया, आर्चर, करन यांनी गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही आपली उपयुक्तचा सिद्ध केल्याने अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय शोधण्याची गरज नाही. या त्रिकुटामुळे फलंदाजी फळीला खोली मिळत असल्याने प्रतिस्पर्धी संघाचे काम कठीण होत आहे. राजस्थानच्या काही कमकुवत बाजूदेखील आहेत. पहिल्या दोन सामन्यांतून बोध घेत ही बाजू भक्कम करणे आवश्यक आहे. मागील सामन्यात आघाडी फळीच्या झुंजार कामगिरीमुळे दोनशेपेक्षा जास्त धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला असला तरी गोलंदाजांनी निराश केले आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन घेतलेला जयदेव उनाडकट निष्प्रभ ठरला आहे. गडी बाद करणे सोडा तर धावांवर लगाम घालणेदेखील त्याला शक्य झालेले नाही. ७४ धावा मोजून त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही. लेगस्पिनर श्रेयस गोपाळ याची लेगस्पिन गोलंदाज देखील परिणामकारक ठरलेली नाही. चेन्नईविरुद्ध केवळ ५ व पंजाबविरुद्ध अवघ्या ९ धावा केलेला मधल्या फळीतील फलंदाज रॉबिन उथप्पा याची संघातील जागादेखील धोक्यात आहे.पराग याचीदेखील हीच गत आहे. चेन्नईविरुद्ध सहा व पंजाबविरुद्ध भोपळाही फोडण्यात त्याला अपयश आले होते. दुसरीकडे कोलकाता संघाचा विचार केल्यास त्यांना अजूनपर्यंत योग्य समतोल सापडलेला दिसत नाही. नारायणच्या अपयशामुळे त्यांना मुंबई व हैदराबादविरुद्ध मोठ्या सलामीपासून मुकावे लागले होते.
नारायणच्या गोलंदाजीतील दाहकता कमी झाली असली तरी धावा रोखण्यात तो बर्यापैकी यशस्वी झाला आहे. शुभमन गिल, ऑईन मॉर्गन यांच्यावर कोलकाताची भिस्त असेल. धोकादायक अष्टपैलू आंद्रे रसेल याला मुंबईच्या गोलंदाजांनी बर्यापैकी रोखत ११ धावांवर बाद केले होते. सनरायझर्सविरुद्ध त्याला फलंदाजीचा मौका मिळाला नव्हता. त्यामुळे मोठी खेळी करण्यासाठी रसेल आसुसलेला असेल. सनरायझर्सविरुद्ध केकेआरने वरुण चक्रवर्ती याला खेळविले होते. वरुणने या सामन्यात प्रभावी मारादेखील केला होता. हैदराबादविरुद्ध त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली असली तरी राजस्थानविरुद्ध मात्र केकेआरची ही चाल अंगलट येऊ शकते. त्यामुळे त्यांना संघ निवड जपून करावी लागेल.
कोलकाता संभाव्य ः सुनील नारायण, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, ऑईन मॉर्गन, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी व कमलेश नागरकोटी.
राजस्थान संभाव्य ः स्टीव स्मिथ, जोस बटलर, संजू सॅमसन, मनन वोहरा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाळ, वरुण ऍरोन व जयदेव उनाडकट.