Home Featured विकासाला कौल

विकासाला कौल

0

मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंची वर्षानुवर्षांची सत्ता अखेर काल संपुष्टात आली. आशियातील ह्या सर्वांत मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपला झेंडा रोवला. बीएमसीचा हा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंग जंग पछाडले. अगदी आपले बंधू व मनसे नेते राज ठाकरे यांच्याशीही हातमिळवणी केली. परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही भाजप – आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ह्यांनी अखेर देशाच्या आर्थिक राजधानीतील ही अत्यंत प्रतिष्ठेची महानगरपालिका काबीज करण्यात यश मिळवले. ज्यासाठी भाजपचा वर्षानुवर्षे अट्टहास होता, परंतु प्रत्येक निवडणुकीत शिवसेना ज्यात खो घालत आली होती ती ही महापालिका शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर सहजगत्या भाजपाच्या खिशात गेली आहे. दोन आकडी संख्येवरून सुरूवात करून हळूहळू आपले बळ वाढवत गेलेल्या भाजपासाठी हा विजय मोठा आत्मविश्वास देणारा आहे, तर पक्षाचे नाव, चिन्ह, सत्ता आणि आता तर प्रतिष्ठेची महापालिकाही गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरेंसाठी हा फार मोठा झटका आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यांच्याशी हातमिळवणी करून ठाकरे ब्रँडची कमाल दाखवण्यास पुढे सरसावलेल्या राज ठाकरे यांचीही मतदारांनी पार निराशा केली आहे. मराठी महापौराचा मुद्दा जोरकसपणे पुढे लावूनही मतदारांनी बहुतेक प्रभागांमध्ये त्या भावनिक मुद्द्याहूनही महत्त्वाच्या अशा विकासाच्या मुद्द्याला साथ दिली आहे. शिवाय नाराज झालेले उत्तर व दक्षिण भारतीय, गुजराती, मारवाडी समाज आदींनीही भाजपाच्या पाठीशी आपले बळ लावलेले दिसते. प्रत्येक निवडणुकीत येणारे अपयश यावेळीही राज यांच्या पदरात पडले आहे. दुसरीकडे, शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मात्र भाजपचा पदर पकडून का होईना मुंबईत आणि ठाण्यात तर स्वबळावर महापालिकेवर आपला वरचष्मा दाखवून दिला आहे. काँग्रेसने ह्यावेळी मुंबईत महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडून वंचितच्या मदतीने नवी सुरूवात करण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु मुंबईत काँग्रेसची फारशी डाळ शिजली नाही. काही महापालिकांमध्ये त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेले दिसते. लातूरसारखा आपला गड मात्र काँग्रेस राखू शकली. राज्यभरात भाजपच्या साथीने त्यांनी आपल्या पक्षाचे अस्तित्व राखले आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊनही जे घडले, तेच दोन्ही पवारांच्या वाट्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आले. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी तेथे सोईस्कररीत्या एकत्र आले होते खरे, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांचा धुव्वा उडवून पुण्यासारख्या शहरातील बदलत्या राजकीय समीकरणांची चुणूक दाखवली आहे. पुणे आणि परिसर आज पूर्वीसारखा पवारांचा पारंपरिक गड राहिलेला नाही. तेथील नवा शिक्षित मतदार, त्यांच्यातील सुशासन व विकासाबाबतची आस्था, राष्ट्रीय प्रश्नांची त्यांच्यात असलेली जाण ह्या सर्वाचा फायदा भाजपाला मिळालेला दिसतो. राज्याच्या इतर महापालिकांमध्येही लातूरसारखा काँग्रेसचा पारंपरिक गड अपवाद मानल्यास भाजपाने उत्तम कामगिरी दाखवली आहे. एका अर्थी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या शांत, संयमी, विवेकी आणि परिपक्व नेतृत्वाला आणि त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेली मुक्त कंठाने दिलेली ही पोचपावती आहे. डबल इंजिन सरकारला महापालिका निवडणुकांतील विजयामुळे ट्रिपल इंजिनची जी जोड मिळाली आहे, त्यासाठी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत महापालिकांमधून उत्तम प्रशासन आणि विकासकामांचा धडाका लावून देण्याची जबाबदारी आता नवनिर्वाचित महापालिका मंडळांची असेल. महत्त्वाच्या सर्व महापालिका खिशात घातलेल्या भाजपाला मतदारांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल. विशेषतः ज्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच आपल्या हाती आली आहे, त्या महानगरीचे विविध प्रश्न – मग ते पावसाळ्यात शहर बुडण्याचे असोत, रस्त्यांवरील खड्ड्यांचे असोत किंवा कोस्टल रोडसारख्या विकासकामांचे असोत, केंद्र सरकारच्या भरघोस मदतीनिशी ह्या प्रश्नांना येणाऱ्या काळात जोरकसपणे भिडावे लागेल आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल. विरोधक आपल्या पराभवाचे खापर आता दुबार मतदार, पुसली गेलेली शाई, ‘पाडू’ यंत्रे वगैरेंवर फोडू पाहतील. मतमोजणीतही गैरप्रकार झाल्याचा कांगावा काल केला गेला. परंतु मतदारांचा कौल स्पष्ट आणि निःसंदेह आहे. भावनिक प्रश्नांऐवजी त्यांनी विकासाला पसंती दिली आहे. मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान आता सत्ताधाऱ्यांपुढे असेल.