नव्याने खरेदी केल्या जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांवरील रस्ता कर ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे गोव्यातील वाहन विक्रेत्यांची संघटना स्वागत करीत असल्याचे काल संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वाहन विक्री उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. ३१ डिसेंबरपर्यंतच तरी ही करकपात लागू राहणार असली तरी ह्या कपातीचा वाहन विक्री उद्योगाला चांगला फायदा मिळणार असल्याचे जोशी म्हणाले.
सध्या देशभरात आर्थिक मंदी असून त्याचा मोठा फटका वाहन विक्री उद्योगाला बसल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या उद्योगाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नव्याने खरेदी केल्या जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांवरील रस्ता कर ५० टक्क्यांनी कमी करावा अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती, असे ते म्हणाले.
वाहनांच्या रस्ता करात कपात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात येताच सुमारे २० ते २५ टक्के लोकांनी नव्या वाहनांच्या किमतीविषयी चौकशी करण्यास सुरवात केल्याचे जोशी यांनी सांगितले.
अन्य राज्यांतील वाहन विक्रेत्यांनाही आपल्या राज्यातील सरकारने रस्ता करात कपात केलेली हवी आहे. त्यामुळे त्यासंबंधीची चौकशी करण्यासाठी विविध राज्यांतील विक्रेते आम्हाला फोन करू लागले असल्याचे जोशी यांनी सांगितले.