वाहनांचिये गुंती…

0
12

क्षणचित्रं… प्राणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

अनेकपदरी रस्ते, इतके उड्डाणपूल, एवढे बगल रस्ते (बायपास) करूनही वाहतुकीची कोंडी कमी का नाही होत? याचं कारण हनुमंताच्या शेपटीसारखी वाढत असलेली लोकसंख्या आणि घरोघरी माणसांपेक्षा अधिक असलेली वाहनं

आईने केलेल्या मुरंब्याचा डबा हातात देत समूनं विचारलं, “काका, आईनं तुम्हाला मँगोजॅम दिलाय. कोणता जॅम तुम्हाला आवडत नाही?” ‘कारल्याचा जॅम!’ या काकांच्या उत्तरावर नाक-भुवया उंचावत समू उद्गारली, “शीऽऽ कारल्याचा जॅम कुणी करतं का?” ‘मग तूच सांग’ असं म्हटल्यावर विजयी मुद्रेने समू म्हणाली, “ट्रॅफिक जॅम!” अशा रीतीने आपला पराभव करताना छोट्या मंडळींना आनंद होतो. यात आपली हार नसते तर जीत असते. काकांनी पुढे विचारले, “ट्रॅफिक काय फळ आहे का जॅम करायला?” ‘मला नाही माहीत!’ म्हणत समू आली तशी फुलपाखरासारखी उडून गेली.

पण खरा विचार केला तर ट्रॅफिक हे फळच नाही का आपल्या कर्माचे? खरंच, किती ती वाहनं! किती त्यांचे प्रकार आणि आकार! आणि ते चालक! दुचाकीस्वार तर हनुमंताला चकित करतील अशा प्रकारे गाड्या चालवतात. आता अनेक रस्ते चौपदरी-सहापदरी झालेयत. परवा एक फलक वाचला- ‘सहापदरी रस्ता- लेनची शिस्त पाळा.’ पदर म्हणजे लेन. फलकावर ‘लेन’ची शिस्त म्हटलं होतं, ‘पदराची शिस्त’ म्हटलं नव्हतं हे आपलं नशीब. अर्थात आईच्या पदरातून (दुधातून) आलेले संस्कार जरी पाळले गेले तरी बरीच शिस्त येईल जीवनाला नि वाहतुकीलासुद्धा, नाही का?

  • वाहनांच्या गुंत्यात म्हणजेच रहदारीच्या कोंडीत सापडल्यावर एक विचार येतो की एवढे अनेकपदरी रस्ते, इतके उड्डाणपूल, एवढे बगल रस्ते (बायपास) करूनही वाहतुकीची कोंडी कमी का नाही होत? याचं कारण हनुमंताच्या शेपटीसारखी वाढत असलेली लोकसंख्या आणि घरोघरी माणसांपेक्षा अधिक असलेली वाहनं. चारचाकी वाहनं असतातच, पण त्यांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही म्हणून माणशी एक दुचाकी वाहन असते. कधीकधी वाटतं की लवकरच वाहनं रस्त्यावर चालवणंही अशक्य झाल्यानं गॅरेजमध्ये चालू करून, तिथंच ‘रेस’ करून, मनातल्या मनात चालवून नंतर बंद करून- सार्वजनिक वाहनातून कामाला जावं लागेल. हवाईमार्ग, जलमार्गही वापरावे लागतील. अनेक शहरांतून सुरू होत असलेली मेट्रो (रेल्वे) लोक अधिक पसंत करतील, यात अशक्य काही नाही. असो.
  • वाहतुकीची कोंडी होऊन रहदारी ठप्प झाल्याने अनेक परिणाम भोगावे लागतात. हेच पहा ना- ऑक्टोबरच्या परीक्षेत पहिल्या काही क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी नव्वदच्या वर असते. त्यांचीही मुलाखत घेतली जाते. साहजिकच प्रश्न विचारला जातो, ‘एप्रिलमध्ये नापास झाला म्हणून ऑक्टोबरला बसावं लागलं तर चारपाच महिन्यांत एवढी प्रगती कशी झाली? अभ्यास खूप केला की अभ्यासाची पद्धती बदलली?’ या प्रश्नावर अनेकदा उत्तर असतं- रहदारीत अडकून राहिल्याने एक पेपर चुकला आणि नापास असा निकाल लागला. अभ्यास तर त्याहीवेळी तयार होता.
  • अपवादात्मक असेल पण रुग्णवाहिका (अँब्युलन्स) अशा कोंडीत अडकून पडल्यामुळे एखादी बाई तिथेच बाळंत होते किंवा एखादा रुग्ण मरण पावतो. या त्रासाला पर्याय काय?
  • क्वचित एखाद्या महनीय किंवा अतिमहनीय (व्हीव्हीआयपी) व्यक्तीला वाहनांच्या कोंडीत अडकून पडल्यामुळे अडचणीला तोंड द्यावे लागते. कधीकधी त्यांच्यासाठी खास वाट काढली जाते किंवा मार्ग रिकामा ठेवला जातो (स्पेशल कॉरिडॉर) तेव्हा सामान्य नागरिक संतप्त होतात. अशा खास वागणुकीला ‘अतिमहनीयांचा वंशवाद’ (व्ही.व्ही.आय.पी. रेसिझम) असं म्हटलं जातं.

खरंच वाहतुकीची कोंडी हा यक्षप्रश्न बनून राहिलाय.

  • एका खास प्रसंगी मात्र या कोंडीतून विशेष मार्ग काढला जातो. याला म्हणतात- ग्रीन कॉरिडॉर (हिरवा मार्ग). जसा हिरवा सिग्नल मिळाला की त्या दिशेनं वाहनं धावू लागतात तसा विशेष प्रसंगी किंवा खास कारणानं असा हिरवा मार्ग तयार केला जातो. उदा. देहदानासारख्या पवित्र कार्याची प्रेरणा घेऊन दान केलेल्या अवयवांना काही तासांतच दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात बसवावं लागतं. डोळे, मूत्रपिंड, यकृत (लिव्हर) इ. अवयव मृत रुग्णाच्या शरीरातून काढून वेळ न घालवता विमानातून दुसऱ्या रुग्णांसाठी पाठवावे लागतात, तेव्हा इस्पितळापासून विमानतळापर्यंत असा ग्रीन कॉरिडॉर पोलिस तयार करतात. सुसाट वेगात जाऊन हे अवयव पोचवले जातात. एकूणच मानवकल्याणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असते.
  • रहदारीची कोंडी झाली की होणारा वाहनांचा धूर, वाजवले जाणारे भोंगे (हॉर्न) वातावरणाचं खूपच प्रदूषण करतात. वाहनात वातानुकूलित यंत्रणा असल्याने त्या परिसरातली उष्णताही कमालीची वाढते. यासाठी काय उपाय योजणार? गतिनिरोधक, गतिदर्शक कॅमेरे, पोलीस वा अन्य अधिकारी हे किती प्रभावी आहेत याचा अनुभव आपल्याला नेहमी येतोच.
  • वाहतूक नियंत्रणासाठी चौकाचौकांत असणारे सिग्नल हे असून अडचण, नसून खोळंबा या स्वरूपाचे असतात. कधीकधी परस्पर सामंजस्याने सिग्नलशिवाय वाहतूक सुरळीत चालते. आहे किनई गंमत!
  • अंतराळात पाठवलेल्या उपग्रहांच्या वाहतुकीतही कोंडी निर्माण होऊ लागलीय. लवकरच तिथंही ‘अवकाशी पोलीस’ किंवा अशीच यंत्रणा तयार करावी लागेल. तो दिवस दूर नाही.
  • आपल्या शरीरातही रक्त नि त्यातील पेशांची अखंड वाहतूक चालू असते. तिचीही कोंडी झाली की ब्लॉक्स तयार होतात. मग हृदयावर बायपास, स्टेंट असे प्रयोग करावे लागतात. शहरातील रस्त्यांना आर्टरीज्‌‍ म्हणजे रक्तवाहिन्या असंच म्हणतात. असो.
  • शेवटी ज्ञानोबांच्या शब्दात ‘मनाचिये गुंती गुंफियला शेला, बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला।’- इथे मनातला गुंता सोडवून त्याच धाग्यांनी सुंदर शेला (वस्त्र) विणून विठुरायाला अर्पिला आहे. तसाच वाहनांचिये गुंती नियम पाळून, आत्मशिस्तीनं शांतसुंदर वाहतुकीचा शेला गुंफून तो समाजपुरुषाला, जनताजनार्दनाला अर्पण करूया. मगच नित्य जीवनात वाहनांच्या गर्दीतही अनुभव येईल- ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला…’