म्हापसा येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयात काल संध्याकाळी पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कनिष्ट कारकून मीना तुयेकर यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
एका वाहनाचे मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासंबंधी ना हरकत दाखला देण्यासाठी तिने ही लाच मागितली होती असा आरोप आहे. या ना हरकत दाखल्यासाठी रु. १५० अधिकृत शुल्क आहे. मात्र तक्रारदार अंकित साळगावकर यांच्याकडे कारकून तुयेकर यांनी ५०० रु. मागितले व ते न दिल्याने दाखला देण्यास टाळाटाळ चालवली होती.
शेवटी काल सकाळी साळगावकर यांनी तक्रार दिल्यानंतर संध्याकाळी सापळा रचून कारवाई करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत तुयेकर यांच्या म्हापसा वाहतूक उपसंचालक मेघश्याम पिळर्णकर यांच्या कार्यालयात जबानी घेण्यात आली तसेच तेथील कागदपत्रांची तपासणी केल्याचेही कळते.
अधिकार्यांना पैसे द्यावे लागतात अशी सबब सांगून ही कारकून ’हिला अनेकांकडून पैसे घ्यायची अशा तक्रारी होत्या. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे उपअधीक्षक बोसेट सिल्वा, निरीक्षक फिलोमिना कोस्ता, राजेंद्र निगळ्ये व अन्य जणांचा कारवाई करणार्या पथकात समावेश होता.