वाचक हाच खरा पुरस्कार : वेरेकर

0
125
दैनिक नवप्रभाचे पणजी शहर प्रतिनिधी व कोकणी साहित्यिक श्री. संजीव वेरेकर यांना विश्व कोकणी केंद्राचा एक लाख रुपयांचा विमला पै शणै पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू. (छाया : हेमंत परब)

गेली अनेक वर्षे मी गांभीर्याने कवितालेखन करीत आलो असून पत्रकारितेच्या धकाधकीच्या जीवनात कविताव्रत जोपासणे ही तशी कठीण गोष्ट आहे, परंतु सातत्याने साहित्यलेखन करीत आलो आहे. विमला पै शणै पुरस्कार मला लाभल्याने दैनिक नवप्रभाच्या कर्मचारीवर्गातर्फे माझा सन्मान झाला ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, वाचक हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन कोकणी कवी व पत्रकार श्री. संजीव वेरेकर यांनी काल केले.
विश्व कोकणी केंद्राचा एक लाख रुपयांचा विमला पै शणै पुरस्कार श्री. वेरेकर यांना नुकताच जाहीर झाला असून त्यानिमित्ताने दैनिक ‘नवप्रभा’च्या वतीने त्यांचे काल एका छोटेखानी कार्यक्रमात नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
श्री. प्रशांत वेेरेकर यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात श्री. वेरेकर हे आपले नवप्रभेतील सहकारी व गावबंधूही असल्याने आपल्याला त्यांना पुरस्कार मिळाल्याचा दुहेरी आनंद झाल्याचे सांगितले.
दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पत्रकार म्हणून वावरत असताना आपल्या वैयक्तिक जीवनातील कलागुणांची जोपासनाही महत्त्वाची असते. श्री. वेरेकर यांना मिळालेला पुरस्कार हा नवप्रभेसाठीही अभिमानाचा विषय असून यापुढेही त्यांनी उत्तमोत्तम साहित्यलेखन करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
श्री. अनिल लाड यांनी यावेळी श्री. वेरेकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवप्रभाचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.