वास्कोचा आज प्रसिद्ध दामोदर सप्ताह

0
57

>> आभासी पद्धतीने होणार अखंड साखळी भजन

वास्को येथील प्रसिद्ध श्री दामोदर सप्ताह आज शनिवार दि. १४ रोजी मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून दामोदर मूर्तीला नवा साज चढवण्यात आला आहे. हा नवा साज देण्याचा मान येथील संकेत दिलीप लोटलीकर यांना लाभला आहे. सप्ताहाच्या यानिमित्ताने चोवीस तास साखळी पद्धतीने होणारे भजन आभासी पद्धतीने यूट्यूब चॅनलवर प्रसारित केले जाणार आहे.

या भजनी सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाही कोरोना महामारीमुळे हा सप्ताह आभासी पद्धतीने साजरा होणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. शनिवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजता केवळ १५ जणांच्या उपस्थितीत श्रीचरणी श्रीफळ ठेवून पारंपरिक भजनाला सुरुवात केली जाणार आहे. नंतर लगेचच पुढील चोवीस तास अखंडित भजनाला प्रारंभ होईल. याचे थेट प्रसारण केले जाईल. या भजनाचे रेकॉर्डिंग सलग तीन दिवस रवींद्र भवन येथे झाले. हे प्रसारण आज दि. १४ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते उद्या दि. १५ ऑगस्टपर्यंत सलग २४ तास केले जाणार आहे.

२३ पथकांचा समावेश
वास्को सप्ताहात सहभागी झालेल्या भजन पथकांत बेलाबाय भजन मंडळ, त्रिमूर्ती भजन मंडळ, श्रीराम भजन मंडळ, कलादीप भजन मंडळ, लक्ष्मीनारायण भजन मंडळ, त्रिशूळ खाप्रेश्‍वर भजन मंडळ, मुशेले कला मंडळ, शिवप्रसाद भजन मंडळ, साईबाबा भजन मंडळ, गजानन भजन मंडळ, ओंकार संगीत भजन मंडळ, संतोषी माता भजन मंडळ, स्वरब्रह्म भजन मंडळ, शनेश्वर भजन मंडळ, शिवसमर्थ भजन मंडळ, राष्ट्रोळी भजन मंडळ, ओरूले दत्तवाडी भजन मंडळ, मधुकर मांजरेकर भजन मंडळ, राजाराम भजन मंडळ, ओम विष्णू कला सांस्कृतिक संस्थान, शारदा संगीत विद्यालय, गणपती पंचायतन मंडळ, हनुमान भजन मंडळ अशा २३ पथकांचा समावेश आहे.