वाळू उपसा परवान्यांसाठी आता ऑनलाइन प्रक्रिया

0
28

नद्यांतील वाळू उपशासाठी परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबवली जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोगे यांनी काल दिली.

वाळू उपसा करणार्‍या व्यावसायिकांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाइन पध्दतीनेच परवाने मंजूर केले जाणार आहेत. ऑफलाइन पध्दतीने परवाने दिले जाणार नाहीत, असेही डॉ. शानभोगे यांनी स्पष्ट केले.

शापोरा नदीतील वाळू उपसा करण्यासाठी पर्यावरण दाखला मिळाला आहे. तसेच, एनआयओने मांडवी आणि झुआरी नदीतील वाळू उपशासंबंधी अहवाल सादर केला आहे. सदर अहवाल खाण खात्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला आहे. हा अहवाल नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी एका महिना खुला ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविला जाणार आहे. पर्यावरण दाखला मिळाल्यानंतर परवाने देण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. वाळू उपसा केवळ पारंपारिक पध्दतीने करण्यास मान्यता दिली जाणार आहे. वाळू उपशासाठी यंत्राचा वापर करण्यास मान्यता दिली जाणार नाही. वाळू उपशाच्या अटींची सूचना लवकरच जारी केली जाणार आहे, असेही डॉ. शानभोगे यांनी सांगितले.