वायनाडमध्ये भूस्खलन; 123 जणांचा बळी

0
16

>> 128 जण जखमी; 800 हून अधिक लोक बेपत्ता; 3000 हून अधिक लोकांचे अन्यत्र स्थलांतर; 4 गावांना सर्वाधिक फटका

मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चार गावांत काल पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले. वायनाडमधील मेप्पाडीच्या डोंगराळ भागात 4 तासांत 3 वेळा भूस्खलन झाले. मध्यरात्री 2 ते पहाटे 6 च्या दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे झोपेतच शेकडो जणांना मृत्यूने गाठले. या भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्यांखाली सापडून 123 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या घटनेत 128 जण जखमी झाले असून, 800 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या घटनेतून बचावलेल्या 3000 हून अधिक लोकांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. भूस्खलनामुळे मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांतील अनेक घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली. तसेच काही लोक चालियार नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याचीही भीती व्यक्त आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर केरळ सरकारने राज्यात दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

सविस्तर माहितीनुसार, काल पहाटेच्या सुमारास मेप्पाडीजवळील डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यामुळे मलप्पुरममधील निलांबूर परिसरातून वाहणाऱ्या चालियार नदीला पूर आला. त्यामुळे वायनाडमधील मेप्पाडी पंचायती अंतर्गत येणाऱ्या मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे डोंगरावरील माती आणि हजारो झाडे खाली आली आणि त्याबरोबर या चार गावांत प्रचंड विध्वंस झाला. या गावांतील अनेक घरे कोसळली, तसेच, वाहने, रस्ते आणि पूलही पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. रात्री 2 वाजताच्या सुमारात भूस्खलनाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे 4 वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झाले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले असले तरी त्याची भीषणता आणि व्याप्ती दिवस उजाडल्यानंतरच आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान, सिव्हिल डिफेन्स, तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकेही घटनास्थळी तात्काळ दाखल झाली.

कन्नूरमधील 225 भारतीय लष्करी जवानांना देखील वायनाडला बचावकार्यासाठी पाठवण्यात आले. तसेच बचावकार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आली होती. या सर्व पथकांनी आणि जवानांनी दिवसभरात युद्धपातळीवर बचावकार्य राबवत गंभीर जखमी झालेल्या 128 जणांना बाहेर काढले. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या 123 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले. अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता; मात्र रात्रीच्या वेळी अंधारामुळे बचावकार्य राबवण्यात मर्यादा आल्या. आता बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा बचावकार्य राबवले जाणार आहे.
भूस्खलनाचे कारण काय?

वायनाड केरळच्या ईशान्येला आहे. केरळमधील हे एकमेव पठारी क्षेत्र आहे. म्हणजेच, माती, दगड आणि झाडे आणि झाडे उगवलेल्या मातीचे उंच आणि खालचे ढिगारे असलेले क्षेत्र. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या 2021 च्या अहवालानुसार, केरळमधील 43 टक्के क्षेत्र भूस्खलनाने प्रभावित झाले आहे. वायनाडची 51 टक्के जमीन डोंगर उताराची असून, तेथे भूस्खलनाची शक्यता खूप जास्त आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; मदत जाहीर
वायनाडमधील भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. केरळ सरकारला केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.

3069 लोकांचे स्थलांतर : पी. विजयन
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतून बचावलेल्या 3069 लोकांचे आपत्कालीन केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यासाठी वायनाडमध्ये 45, तर राज्यभरात 118 आपत्कालीन केंद्रे उघडण्यात आली आहेत. अग्निशामक दलाचे 321 जवान बचावकार्यात गुंतले आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्याला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती विजयन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.