विमलाबाई मुलखाची तोंडाळ व फटकळ म्हणून गावभर प्रसिद्ध होती. त्यामुळे तिच्या तोंडाला लागण्याची कुणाची शामत नव्हती. साहजिकच ती अधिकच चढेल बनली होती. घरात चोकरचाकर भरपूर असल्याने तिला इकडची काडी तिकडे करावी लागत नसे. त्यामुळे घराच्या व्हरांड्यातील सोप्यावर ऐसपैस बसून येणार्या-जाणार्यांना, विशेषतः स्त्रियांना, विनाकारण हटकून त्यांच्याशी मुद्दाम बोलणे उकरून काढून काहीतरी नाट लावणे म्हणजेच अपशकून करणे हा तिचा आवडता छंद होता. आणि आपण वाईट बोललेले खरे ठरते, अर्थात आपली ‘बत्तीशी वठते’ असा तिचा (गैर)समज होता.
एक दिवस विमलाबाई सकाळीच नेहमीप्रमाणे सोप्यावर बसून कुणाशी तरी बोलायची संधी शोधत असतानाच तिला अलीकडल्या गल्लीतील शांताबाई जाताना दिसली. शांताबाई इकडेतिकडे न पाहता हातातील नोटा मोजत खालमानेने चालली होती. पण गप्प राहील तर ती विमलाबाई कसली? तिने मोठ्यांदा हाक मारली, ‘‘काय ग ए शांते, एवढ्या सकाळीच अशी नोटा मोजत चाललीस तरी कुठे?’’ विमलाबाईचे असे आगंतुक विचारणे शांताबाईला अजिबात आवडले नाही. पण ती पडली नावाप्रमाणेच शांत स्वभावाची. त्यामुळे तिला या मुलुखमैदानी तोफेशी सामना करायचा नसल्याने नाईलाजाने तिने उत्तर दिले. म्हणाली, ‘‘जरा शहरातल्या बाजारात जाऊन येते. एक गाय खरेदी करावी म्हणते.’’ यावर फटकळपणे विमलाबाई उद्गारली, ‘‘आता जातेसच तर जा बापडी. पण पैसेबिसै हरवून येऊ नकोस म्हणजे झालं. आजकाल चोरट्यांचा सुळसुळाट झालाय म्हणून सांगते हो मी.’’ विमलाबाईंच्या या वक्तव्याला अजिबात प्रतिसाद न देता शांताबाई आपल्या मार्गाने चालू लागली.
संध्याकाळच्या सुमारास विमलाबाई रोजच्याप्रमाणे सोप्यावर स्थानापन्न झाली असताना तिला दुरून रिकाम्या हस्ते परत येणारी शांताबाई दिसली. तिला तशी येताना बघून विमलाबाईला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण शांताबाई जवळ आल्यावर मात्र चेहर्यावर काळजीचे भाव आणत वरकरणी चिंतायुक्त स्वरात विमलाबाई तिला म्हणाली, ‘‘मग आलीसच ना पैसे हरवून? तरी मी तुला सांगत होते. माझी वाचा कधीच…’’ तिला मध्येच अडवून शांताबाई काहीशा खोचक स्वरात म्हणाली, ‘‘काही पैसेबिसै हरवले नाहीत हो माझे. तीन हजार रुपये मोजून एक चांगली दुभती गाय खरेदी करून परतत होते. तेवढ्यात वाटेत शेजारच्या गावचे रंगराव सावकार भेटले. त्यांना ती गाय एवढी आवडली की तिथल्या तिथे रोख पाच हजार रुपये देऊन त्यांनी ती खरेदी केली.’’ एवढे बोलून कनवटीला खोचलेल्या पिशवीतून नोटा काढून विमलाबाईसमोर नाचवीत शांताबाई पुढे म्हणाली, ‘‘बसल्या जागी दोन हजारांचा फायदा. तुमची वाचा बाधली नाही, तर फळली बरं का विमलाबाई!’’
विमलाबाई खेटर मारल्यागत चेहरा करून निमूटपणे आत निघून गेली.