पत्रलेखक रामदास लवंदे

0
133

गोव्याच्या राजधानीचं शहर पणजी येथील आत्माराम बोरकर रोडवरील एका बैठ्या घरात गेली कित्येक वर्षे राहणारे रामदास लवंदे यांच्या निधनाचा आज बारावा दिवस. रामदास लवंदे यांच्या वयाचं शतक अवघ्या पाच या संख्येनं हुकलं. त्यांच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या खिडकीला गज नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरावरून जाताना त्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर रामदास यांचं दर्शन घडायचंच. अर्थात केवळ दर्शनानं भेट आटोपली असं सहसा व्हायचं नाही. खुद्द तेदेखील आपल्याला तशा उभ्या स्थितीत राहू देत नसत. ‘या… आत या’ असं त्यांनी अगत्यानं शिगोशिग भरलेल्या आवाजात म्हटलं की, हाताशी असलेली कामं बाजूला ठेवून त्यांच्या घरात प्रवेश घेण्याची इच्छा प्रबळ व्हायची आणि आपल्या नकळतच आपण आत जाऊन तिथल्या आरामखुर्चीत विसावल्याचं घडायचं. त्यांच्या वयाला मान देऊन मी पहिला प्रश्‍न विचारायचो, ‘‘काय म्हणते तब्येत? बरे आहात?’’ या माझ्या प्रश्‍नावर महामिश्किल चेहरा करीत ते म्हणायचे, ‘‘मी बरा आहे असं म्हटलं तर सकाळी सकाळी मला खोटं बोलल्याचं पाप लागेल! ते तसं लागू नये म्हणून मी तुम्हाला माझ्या आरोग्याबद्दल, खरं म्हणजे अनारोग्याबद्दल सांगायला लागलो तर तुम्हाला कंटाळा येईल आणि पुढच्यावेळी या रस्त्यावरून जाताना तुम्ही हळूच मला टाळण्याचा प्रयत्न कराल… बरं, ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही आता लगेच तुमच्या ताळगावला जाणार आहात, का तुमची कामं आटोपणार आहात?’’
‘‘झाली सगळी कामं! तुमची भेट हे सर्वात आवडतं काम, जे मी आता करायला घेतलंय.’’ असं मी त्यांच्याच स्टायलीत म्हटलं की ते म्हणायचे, ‘‘इथं जवळच एक हॉटेल आहे, तिथं चांगले सामोसे मिळतात. मला सांगा, तुमच्या घरात कितीजण राहतात?’’
मला सामोसे घेऊन जायला ते भाग पाडताहेत हे लक्षात आल्यामुळे संकोचानं मी घरातल्यांच्या मूळ संख्येला काट मारून ‘सहा’ असे म्हणायचो आणि मग रामदासबाब आपल्या चिरंजिवाला बोलावून सामोसे आणायला पाठवत. त्यानं आणलेली सामोश्यांची पुडी माझ्या हातावर ठेवत ते म्हणत, ‘‘तुम्ही घरी पोहोचेपर्यंत हे थंड होणार, तेव्हा घरी गेल्या-गेल्या तुमच्या घरकान्नीच्या हातावर ठेवा आणि गॅसवर तवा ठेवून ते सगळे गरमागरम होतील अशी व्यवस्था करायला घ्या!’’
रामदासबाब म्हणजे एक नंबरची गप्पीष्ट व्यक्ती. जुन्यातल्या जुन्या आठवणींचे साक्षीदारच जणू. गप्पांच्या ओघात मध्येच त्यांना कुठल्यातरी नाटकातला संवाद आठवे आणि मग सुधाकर असं म्हणतो म्हणून तो संपूर्ण संवादच ते ऐकवायचे.
‘‘रामदासबाब, तुम्ही नाटकात कामं करायचा की काय?’’ माझा प्रश्‍न.
‘‘छे हो! शेजारच्या महालक्ष्मी देवळात त्या काळात नाटकांच्या तालिमी चालत. त्या ऐकायला, पाहायला मी जात असे. माझा नियमितपणा पाहून तिथला प्रॉम्टर माझ्या हातावर नाटकाची ‘पटी’ ठेवायचा आणि म्हणायचा, तुम्ही जरा सांभाळून घ्या… घरी कामं पडतील ती उरकेन म्हणतो.’’ आणि मग अंगावर आलेलं प्रॉम्टरपण मी निभवायचो. त्यामुळे नाटकांत कामं केल्याशिवाय माझेही संवाद चोख पाठ असायचे.
‘‘तुमच्या या खिडकीला गज नाहीत. कुणीही उडी मारून आत येऊ शकतो!’’ असं मी म्हटलं की रामदासबाब म्हणत, ‘‘गोव्यातून पोर्तुगीज गेले हे बरे म्हणजे काय छानच झाले! पण आम्हाला स्वातंत्र्य काय मिळाले आणि पहिल्याप्रथम आम्ही केले काय तर खिडक्यांना गज बसवून घेतले! गज म्हणजे कैदखानाच नव्हे काय? मी स्वतः खिडकीला गज लावून घेण्याच्या विरुद्धच आहे… गज असलेल्या खिडकीजवळ उभं राहून तुम्ही माझ्याशी बोलू लागाल तर तुम्हाला आणि मलाही कैद्याशी बोलत असल्याचा भास नाही का होणार?’’
रामदासबाब यांच्या युक्तिवादावर आपण काय बोलणार? बाकी हेही खरंच होतं की, रामदासबाब यांच्याशी गप्पा म्हणजे ते बोलणार… बोलत राहणार आणि आपण ऐकत राहणार! पण एक मात्र होतं, त्यांचा हा काहीसा एकपात्री प्रयोग निखळ आनंद देऊन जायचा… अशाच एका भेटीत त्यांनी मला कुसुमाग्रजांच्या कवितेचा त्यांच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या नव्हे तर रामदासबाब यांच्या हस्ताक्षरातला झेरॉक्स कागद दाखवला. चट्‌दिशी नजरेस पडली ती एक गोष्ट म्हणजे मूळ कवितेतल्या एका शब्दाची रामदासबाब यांनी केलेली दुरुस्ती! अर्थात कवितेखाली त्यांनी एक टीपही जोडलीय- कविराजांनी क्षमा करावी!!
‘‘वर्तमानपत्रांचा मी पूर्वीपासूनचा एक वाचक आहे. त्यात प्रसिद्ध होणारी वाचकांची पत्रे वाचून मीही लिहायला लागलो. आजही लिहितो…’’ आणि मग एवढं सांगून रामदासबाब उठून उभे राहतात. कपाटापाशी जाऊन तिथं ठेवलेले चारदोन कागद उचलतात. माझ्या हातावर ठेवून म्हणतात, ‘‘इतरांसारखा मी एकटाकी लेखक नाही. मला मी लिहिलेल्या मजकुरात चुकाच चुका दिसत राहतात. मग मी शब्द बदलत राहतो…शेवटी फायनल प्रत तयार होते, ती कुणाजवळ तरी देऊन त्यांच्याकडे पाठवतो. पूर्वी माझी पत्रं पटकन प्रसिद्ध व्हायची. आजकाल तशी होत नाहीत. बहुतेक नवीन माणसं आली असली पाहिजेत. त्यांना कुठं माहीत असायला माझं नाव? तुमची आणि संपादकांची ओळख आहे ना? सांगा त्यांना… म्हणजे केवळ माझ्याच या कामासाठी जाऊ नका… तुमचं काम करायला जाल तेव्हा आठवणीनं माझंही काम करा. काम म्हणजे काय, कानावर घाला त्यांच्या!’’
रामदासबाब यांचं छापून आलेलं पत्र म्हणून त्याबद्दल सांगण्यासाठी माझ्या संग्रही त्यांचं एकही पत्र नसलं तरी त्यांना प्रा. रवींद्र घवी यांनी दिलेला मान अविस्मरणीयच म्हणायला हवा. प्रा. घवी यांनी एकदा लिहिलं होतं- ‘रामदास लवंदे हे केवळ पत्रलेखक नसून कवी-पत्रलेखक आहेत. मोठ्यातला मोठा आशय अगदी कमी शब्दांत मांडण्याचं जे कसब उत्तम दर्जाच्या कवीत असतं तेच कसब रामदास लवंदे यांच्या पत्रात दिसून येतं. अवघ्या तीनचार ओळींच्या पत्रात ते आपलं जे म्हणणं मांडतात ते भल्याभल्या पत्रलेखकांना जमत नाही! उत्तम पत्र कसं असावं, असं जर कुणी मला विचारलं तर मी रामदासबाब यांच्या पत्रांकडेच अंगुलिनिर्देश करेन!’ रामदासबाब यांच्यावरचा प्रस्तुत लेख येथे प्रसिद्ध होण्यामागचं कारणही तेच आहे… त्यांच्या दोनचार ओळींच्या पत्रात कुणीतरी संबंधिताला त्यांनी मारलेली कोपरखळी मार्मिकच असायची.
त्यांच्या रोखठोक स्वभावाचा मला जाणवलेला विशेष त्यांच्या सुपुत्रांनी, त्यांच्या निधनानंतरच्या इच्छेचा कागद मला दाखवला तेव्हा अधोरेखितच झाला. त्यांनी आपल्या मोठ्या पण स्पष्ट अक्षरांत लिहिलं होतं- ‘माझं देहदान करावं. माझ्या सुपुत्रांना ते खटकत असेल तर दहन करायला हरकत नाही, पण त्याप्रसंगी एकही धार्मिक विधी होता कामा नये. ही माझी इच्छा मात्र कटाक्षानं पूर्ण करावी! मी संतुष्ट आहे!’ …आणि तशीच ती पूर्ण झाली!