(अ)यशस्वी

0
144
‘‘मी अगोदर सांगितल्या निकषानुसार गोव्यात कोठेही कोळीनृत्य हा प्रकार होत असलेला मला दाखवण्यात आला तर आयुष्यात पुढे कधीही सही करण्यापुरतेही पेन वापरणार नाही.’’ कणभर शांतता. विषय बदलला गेला. आमच्या उपाध्यक्षांच्या मते मी माननीय सदस्यांचा अपमान केला.
————————————
————————————
भारतीय परंपरेत ‘गुरू-शिष्य’ हे सर्वात श्रेष्ठ नाते. शिकवतो त्याला शिक्षक म्हणायचं. गुरू शिकवत नसावा. गुरूची व्याख्या ‘गिरति शिष्याणाम् अज्ञानम् गुरुः’ अशी केली. शिष्यांचं अज्ञान दूर करतो, त्यांना विहित मार्ग दाखवितो तो गुरू. ही संकल्पना दिल्लीस्थित केन्द्रीय संगीत नाटक अकादमी राबवत होती.
कालौघात वाहून जाणार्‍या कलात्मक लोकपरंपरांचे जतन, संवर्धन व्हावे, त्याना पुनः संजीवनी मिळावी हा यामागचा उदात्त हेतू. मुळात लोककलांचे बहुतेक प्रकार जातीवर आधारित असतात. ‘वाडो’ ही व्यवस्था तर आहेच, पण तो तेथे बहुसंख्याचा निवास असेल त्यांचा होता. गोव्यात तरी ‘वाडो’ ही सांस्कृतिक रचना आहे. एकेकाळी ती जातीवर आधारित होती. इतर जमातींची काही कुटुंबे त्या वाड्यात राहत असली तरी प्रमुख वासीयांची त्या वाड्यावर सांस्कृतिक सत्ता चालायची. त्यांच्या नावाने तो वाडा ओळखला जायचा.
विशिष्ट अशा एखाद्या लोककला प्रकाराशी बांधिलकी असलेल्या जमातीतील, त्या विषयातील जाणकार व्यक्ती गुरू म्हणून निवडायची व परंपरेने त्या प्रकाराशी संबंध असलेला युवावर्ग. शिष्य समूहात एका गुरूकडे चार शिष्य. गुरूला दरमहिना आठ हजार रुपये, तर शिष्याला प्रत्येकी दोन हजार. खेरीज वाद्ये, वेषभूषा यासाठी एकदाच, एकत्रित रुपये दहा हजारांचं अनुदान. प्रकारानुसार नियंत्रित होणारा कालावधी अधिकाधिक दोन वर्षांचा. रक्कम दर महिना रोखीत. रकमेचा योग्य विनियोग, सोबतच निकड असलेल्या कलाप्रकाराची निवड व सुविहीत पद्धतीचे संचालन यासाठी एखाद्या तज्ज्ञाची नियुक्ती व्हायची गोव्यात. अर्थातच ही जबाबदारी आमच्यावर. गरज भासल्यास वाहतुकीच्या अतिरिक्त रकमेसह. योजनेची सुविहीत कार्यवाही व देखरेख ही जबाबदारी राज्य अकादमीकडे. या योजनेचा ङ्गायदा गोव्याला होणे, करून घेणे ही आमच्या दृष्टीने संधी होती. आणि दिल्लीतील आमचे सांस्कृतिक वजन यासाठी पुरेसे होते. कलाप्रकार कोणता निवडावा हे ठरविणे बाकी होते.
अकादमीस्वीकृत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र सल्लागार समिती असणं ही जुनी परंपरा. लोककला विषयासाठीही अशी समिती होतीच. तेथे सूचना व्हायच्या, पण सहसा माझं मत अंतिम मानलं जाई. किमान विरोध कुणी करत नसे.
किस्सा सांगायलाच हवा असा. क्लेता लोबो नावाची एक (अति)विद्वान महिला सदस्या. या बाईंनी लंडनला कोरियोग्राङ्गी विषयातील तीन महिन्यांचा कोर्स केल्याचे सांगण्यात आले. तिला स्थानिक कोकणीसह एकही भारतीय भाषा कामचलावू पलीकडे समजत नव्हती. परंतु ब्रिटिश ऍक्सेंटनुसार इंग्रजी व वरील कोर्स या दोन पात्रता तिला अकादमी मेंबर बनवून गेल्या. कोरियोग्राङ्गी विषयामुळे त्यांचा प्रवेश लोककला सल्लागार समितीत झाला.
गोव्यातील लोककला, संगीत, गायन, वादन, नृत्य यात उत्सवी, नाट्य आविष्करणांतर्गत, विधिनृत्य व पारंपरिक यांचा समावेश असलेली संदर्भसूची सदस्यांना आधीच देण्यात आली होती. एका बैठकीत सूचीचा संदर्भ देत बाईनी मांडलं की यात ‘ङ्गिशर ङ्गोक डान्स’- कोळी नृत्याचा समावेश का नाही? माझं ङ्गाडकन् उत्तर, ‘‘गोव्यात कोळीनृत्य नाही.’’ बाई खवळल्या. मूळ इंग्रजीत झालेला संवाद.
‘‘काय खेडेकर, लोककला संस्कृतीतले म्हणविता, तुम्हाला एवढंही माहिती नसावी?’’ मी म्हटलं, ‘‘कोठे होते दाखवा.’’ उपहासात्मक स्वरात बाईंचं विधान, ‘‘तुम्हाला काय माहिती गोव्याची? कोळी, खारवी आहेत तेथे.’’ यावर माझं सैद्धांतिक उत्तर. अर्थातच कोकणीतून. ‘‘गोव्यात कोठेही पारंपरिक कोळीनृत्य नाही. निर्धारित दिवशी, ठरल्या ठिकाणी, सकाळ, सायंकाळ, रात्र अशा रूढीनुसार निश्‍चित समयी, विशिष्ट जनजातींचा समूह एकत्रित येऊन, कोणीही पुरस्कृत केल्याविना जे कलात्मक आचरण करतो, त्यालाच लोककला म्हणता येते.’’ पुढे असेही सांगितले की, ‘‘पूर्ण आविष्करण शक्य नसेल तर किमान भोगावळ नावे केली जाते.’’ बाईनी अर्थ समजून घेतला तरीही आढ्यता कायम ठेवून, ‘‘माझ्यासंगे कलंगुटला या, मी दाखवते तुम्हाला.’’
बाईनी माझ्या वस्त्रालाच हात घातला होता. माझी सहनशक्ती संपली होती. मी खिशातील पेन काढून खाली ठेवलं आणि ठामपणे सांगितलं, ‘‘मी अगोदर सांगितल्या निकषानुसार गोव्यात कोठेही कोळीनृत्य हा प्रकार होत असलेला मला दाखवण्यात आला तर आयुष्यात पुढे कधीही सही करण्यापुरतेही पेन वापरणार नाही.’’ कणभर शांतता. विषय बदलला गेला. आमच्या उपाध्यक्षांच्या मते मी माननीय सदस्यांचा अपमान केला. मी घुश्शातच. म्हटलं, ‘‘त्या अजाण बालिकेला सांगा. पुनः मला डिवचू नका. येथील लोककला कळण्यासाठी या मातीची संस्कृती समजून घेतली पाहिजे.’’ अशाच दुसर्‍या एका प्रसंगी एका महनीय सदस्यानी ‘मांडो, धुलपद, देखणी, कुर्रिदीन्य; या सोडून गोव्यात कोणत्या लोककला?’ या प्रश्‍नाला चेअरमन मा. प्रतापसिंह राणेंनी त्यांना थोपवलं होतं. ‘‘उलोव नाका, तो खेडेकार खातलो तुका.’’
अशावेळी याद येते. ‘रणमाले’ हा सत्तरीतील विधीनाट्यप्रकार. तेथील ङ्गक्त कुळवाडी जमातीचे म्हणून याला ‘कम्युनिटी थिएटर’ असेही म्हणता येते. ‘रामकथा’ व अधेमधे ‘धोंगां’ असे ते चालते. या रणमाल्याची निवड गुरू-शिष्य योजनेसाठी केली. त्याकाळी सुयोग्य पद्धतीने, पारंपरिकता राखूनही आविष्करणात नेटकेपणा असलेली दोन पथके माहितीत होती. बांबर व धावे. धावेत तिळू गावकर हा जाणकार तर होताच, पण सुजाण व रणमाले जगले, तगले पाहिजे या विचारांचा. त्याच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक रणमाले विधिनाट्य आचरण करणार्‍या पथकाची निवड केली. योजनेच्या आर्थिकबाबतीत थोडा बदल केला. एका गुरूऐवजी रक्कम विभागून दोघांना नेमले. लोक नाटक असल्याने भाग घेणारा शिष्य परिवार दहानी वाढवला. येणारी एकूण रक्कम तेवढीच, पण वितरित होत होती अधिक संख्येतील लोकांना.
दोन वर्षे ही योजना राबवली. पदरी नेमकं काय पडलं याबद्दल पुनः कधीतरी. एक निश्‍चित कळलं. गावात काहीजणांनाच अवांतर पैसा मिळू लागला की इतरांच्या पोटात उगाचच दुखतं. खेरीज हा वेळपर्यंत गावात राजकारणानेही प्रवेश केला होता. कोण कोणत्या पार्टीचा यावर खल सुरू झाला होता. काही काळानंतर दूरदर्शनसाठी रेकॉर्डिंग करायला गेलो तर सगळा गोंधळ. त्या काळचे काही लाख रुपये धावेच्या जंगलात हरवले होते. आम्ही शोधतोय अजून. (क्रमशः)