वाङ्‌मयीन संस्कृतीचे निस्सीम उपासक बा. द. सातोस्कर

0
1037

– डॉ. सोमनाथ कोमरपंत
गोमंतकातील सव्यसाची आणि तपस्वी साहित्यिक बा. द. सातोस्कर ऊर्फ दादासाहेब सातोस्कर यांची २६ मार्च २०१५ रोजी १०६ वी जयंती. त्यांचे संपूर्ण नाव बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर. वाङ्‌मयनिर्मिती, वाङ्‌मयप्रकाशन आणि वाङ्‌मयप्रसार हेच त्यांच्या जीवनाचे व्रत होते. जाणिवेच्या वयापासून वयाच्या ९१ व्या वर्षापर्यंत तोच त्यांचा श्‍वास आणि ध्यास होता. पुस्तक हे संस्कृतीचे उत्तमांग, अशी त्यांची धारणा होती. या केंद्राभोवती त्यांचे चिंतन चाले. व्युत्पन्नता आणि रसज्ञता या गुणांचा स्वरसंगम त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वात झालेला होता.त्यांचा राष्ट्राभिमान, त्यांची प्रगल्भ जीवनदृष्टी, साहित्यकलेबरोबर जीवन समृद्ध करणार्‍या चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला आणि संगीतकला या कलांविषयी ते निरतिशय प्रेम बाळगीत. स्थापत्त्यशास्त्राविषयीही त्यांना कुतूहल होते. जाज्वल्य मनोवृत्तीने आणि असीम निष्ठेने त्यांनी शारदेची उपासना केली. त्यांनी कथा, कादंबरी, ललित निबंध, स्थलवर्णन, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य हे वाङ्‌मयप्रकार यशस्वीरीत्या हाताळले. संशोधनात्मक आणि समीक्षात्मक लेखन केले. ‘उदंड जाहले पाणी’ हे नाटकही लिहिले. त्यांचे ‘बादसायन’ हे आत्मचरित्र म्हणजे जीवनभर साहित्याला वाहिलेल्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन. अभिरूचिसंपन्न, निसर्गानुभूतीत रमणारा व ग्रंथसहवासात राहून समाजमनस्क वृत्तीने सांस्कृतिक समृद्धी प्राप्त करून देणारा हा समर्थ साहित्यिक होता. विश्‍वसाहित्यातील अभिजात स्वरूपाच्या कादंबर्‍यांचा त्यांनी अनुवाद केला. पर्ल बक हा अमेरिकन कादंबरीकार. त्यांच्या ‘मदर’ आणि ‘गुड अर्थ’ या कादंबर्‍यांचा अनुक्रमे ‘आई’ आणि ‘धरित्री’ या नावांनी अनुवाद केला. हा फक्त अनुवादन नसून ते अनुसर्जन आहे. त्यांच्या उत्कृष्ट अनुवादकार्याबद्दल त्यांना गोमंतक मराठी साहित्यसंमेलनाचे पहिले सुवर्णपदक प्राप्त झाले. पत्रविद्या व ग्रंथालयशास्त्र या विषयांवरची पुस्तके त्यांनी लिहिली. ग्रंथवर्गीकरणाची स्वतःची अशी नवी पद्धती त्यांनी शोधून काढली.
वाङ्‌मयीन नियतकालिकांच्या अभिवृद्धीचा वैभवशाली कालखंड त्यांनी अनुभवला होता. त्या संस्कारांमुळेच त्यांच्या वाङ्‌मयीन पिंडधर्माची जडणघडण झाली होती. त्यातूनच ‘मराठी मासिकांचे पहिले शतक’ हा ग्रंथ साकार झाला. लेखक म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी अनेक नियतकालिकांचे व मासिकांचे यशस्वीरीत्या त्यांनी संपादन केले होते. ही मिळालेली संथा त्यांना भविष्यकाळात उपयुक्त ठरली. त्यांच्या जीवनातील सार्‍या उपक्रमांमागे आणि अथक प्रयत्नांमागे वाङ्‌मयाचा निदिध्यास ही एकमेव प्रेरणा होती. त्याला अखंडित व्यासंगाची जोड मिळाली. खडतर साधनेमुळे त्यांनी विपुल आणि विविधांगी स्वरूपाची ग्रंथनिर्मिती केली. ‘गोमन्तक’ या दैनिकाचे पहिले संपादक या नात्याने मुक्त गोमंतकात त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
मुळात पत्रकार असलेल्या अनेक प्रज्ञावंतांनी सृजनशील साहित्यनिर्मितीत कर्तृत्व गाजविले आहे. अशा नामवंतांच्या मालिकेत दादासाहेब सातोस्करांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. त्यांनी स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरू केला. ग्रंथप्रसाराचे कार्य त्याद्वारा निरलसपणे केले. प्रा. अनंत काणेकरांचे ‘आमची माती; आमचे आकाश’ हे प्रवासवर्णन दादासाहेब सातोस्करांनी प्रसिद्ध केले. ‘कथासागर’, ‘विसावा’ आणि ‘दूधसागर’ ही नियतकालिके तर साहित्यप्रसाराला वाहिलेली होती. ‘महाराष्ट्र ग्रंथालय संघा’च्या ‘साहित्य सहकार’ या मासिकाच्या संपादनकार्यात त्यांचा मौलिक वाटा होता. गोमंतकात परतल्यानंतर या प्रदेशात ग्रंथसंस्कृती रुजावी म्हणून त्यांनी ‘ग्रंथालयशास्त्रा’चे वर्ग सुरू केले. मुंबईच्या वास्तव्यात येथील सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यात त्यांनी मनःपूर्वक भाग घेतलेला होता. ते गोव्यात परतल्यावर या कार्याला अधिक वेग प्राप्त झाला. मुक्त गोमंतकाच्या नवनिर्माण प्रक्रियेत दादासाहेबांचा मौलिक वाटा आहे असे निःसंदिग्धपणे म्हणता येईल. त्यांच्या परिणत वयातील अनुभवसंचिताचा लाभ नव्या पिढीला झाला. मुक्तीपूर्व काळात आणि मुक्तीनंतरच्या काळात गोमंतक मराठी साहित्यसंमेलने भरविण्यात त्यांचा वाटा सिंहाचा आहे. हे व्यासपीठ निरंतर वर्धिष्णू कसे होईल याचा ध्यास त्यांनी बाळगला. त्यासाठी अहर्निश कष्ट घेतले. ती भरविण्यात खंड पडू दिला नाही. ‘सागर साहित्य प्रकाशन’ ही प्रकाशनसंस्था स्थापन करून गोमंतकातील आणि मराठीच्या मुख्य धारेतील लेखक-कवींची पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. ग्रंथसंस्कृतीची त्यांनी केलेली निगराणी हादेखील त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू. दादासाहेब सातोस्करांचे विविधांगी कर्तृत्व न्याहाळताना आपण नतमस्तक होतो; त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत अशा प्रकारच्या अजोड व्यक्तिमत्त्वाचा द्रष्टा पुरुष येथे जन्मला याबद्दल अभिमान वाटतो.
बा. द. ऊर्फ दादासाहेब सातोस्कर यांचा जन्म माशेल येथे २६ मार्च १९०९ रोजी झाला. माशेल या जन्मगावीच २७ नोव्हेंबर २००० रोजी त्यांचे निधन झाले. शेवटपर्यंत ते लेखनमग्न राहिले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ते जन्मले आणि शतक संपता संतपा त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. ते कृतिशील जीवन जगले. श्रीकृष्ण हे त्यांचे श्रद्धास्थान होते. ‘त्याच्याप्रमाणे मला सव्वाशे वर्षे जगायचंय,’ असे ते नेहमी म्हणायचे. विसाव्या शतकाचा प्रदीर्घ पट त्यांनी डोळसपणे पाहिला. जीवनाच्या सम्यक पैलूंविषयी त्यांना आस्था होती. आयुष्यात जे जे संकल्प त्यांनी सोडले ते ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या मुखावर नेहमी समाधान विलसत असे. वृत्तिगांभीर्याबरोबर त्यांच्या संभाषणशैलीत नर्मविनोद असायचा. १९१० नंतर गोमंतकात प्रबोधनाचा नवा कालखंड सुरू झाला. त्याचे ते साक्षीदार होते. प्रेमळ आईवडिलांचे त्यांच्यावर सखोल संस्कार झाले. त्यांच्या ‘बादसायन’ या आत्मचरित्रात त्यांच्या संस्कारबहुल, प्रांजळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचे तरंग उमटले आहेत.
माशेल ही पूर्वीची महाशाला. या गावाला आणि पंचक्रोशीला ज्ञानपरंपरा लाभलेली आहे. येथील रहिवासी महेश्‍वरशास्त्री सुखठणकर यांनी ‘अमरकोशा’वर ‘अमरविवेक’ ही टीका लिहिली. रामचंद्र वामन ऊर्फ फोंडूशास्त्री करंडे हे तर माशेल परिसराचे भूषण. विविध पैलू असलेल्या या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा दादासाहेबांवर प्रभाव पडला. रघुनाथ ऊर्फ बाबा माशेलकर हे संगीतकलेतील बुजूर्ग. मास्टर दीनानाथांनी संगीताचे प्राथमिक धडे त्यांच्याकडून घेतले. येथील मंदिरांच्या परिसरात मराठी रंगभूमीची निरंतर उपासना चाले. दादासाहेबांचे वडील नाटकांत काम करायचे. दादासाहेबांचा बालपणीच नाटकाशी संबंध आला.
नाडकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे दादासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची कोनशिला बसविली गेली. म्हापशाचे सारस्वत विद्यालय हे तर त्यांना लाभलेले वरदान होते. काका दणाईतांसारखे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व असलेले गृहस्थ या विद्यालयाचे चालक होते. ते विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असत.
साहित्यक्षेत्रात नावलौकिक कमावलेले प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई, ऍड. जयवंतराव सरदेसाई, व्यंकटेश पै रायकर आणि शिक्षण क्षेत्रात मौलिक कार्य केलेले पिपल्स हायस्कूलचे अध्वर्यू मंगेश फोंडू ऊर्फ लाला सुर्लकर हे त्यांचे जीवश्‍चकंठश्‍च स्नेही. किंबहुना मैत्र हेच दादासाहेबांच्या जीवनप्रणालीतील सुखनिधान. वेळोवेळी लाभलेल्या मित्रांमुळे दादासाहेबांच्या वाङ्‌मयीन पिंडधर्माचे पोषण झाले. रघुवीर चिमुलकर, दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर या कुशल चित्रकारांचा सहवास दादासाहेबांना लाभला. चित्रकला हा त्यांच्या जीवनातील मर्मबंध आहे असे त्यांनी तिच्याविषयी आत्मीयतेने केलेल्या लेखनातून जाणवले. गानतपस्विनी अंजनीबाई मालपेकर यांच्याविषयी त्यांनी ममत्वाने आणि जाणकारीने लिहिले आहे.
अशा वाङ्‌मयी आणि कलासंपन्न वातावरणात दादासाहेब वाढले. त्यात ते रमले. आपले संवेदनशील मन त्यांनी सद्भिरुचिसंपन्न बनविले.
गोमंतकाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे अध्वर्यू डॉ. पुरुषोत्तम वा. शिरगावकर यांनी इ.स. १९११ मध्ये पणजीत ‘प्रभात’ हे साप्ताहिक सुरू केले. ते अकाली कालवश झाले. त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून त्यांच्या शिष्यांनी ‘प्रभात’ साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर केले. संपादक होते जनार्दन नारायण पै अस्नोडकर. ते दादासाहेबांचे मामा. त्यांच्या सांगण्यानुसार दादासाहेबांनी ‘प्रभात’च्या संपादनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यावेळी ते मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये मराठी विषय घेऊन बी.ए.च्या वर्गात शिकत होते.
दादासाहेब सातोस्करांच्या स्वतंत्र लेखनाचा परामर्श घेण्यापूर्वी त्यांच्या लेखनगंगोत्रीकडे आवर्जून लक्ष वेधावे असे वाटते. पर्ल बक यांची ‘गुड अर्थ’ ही कादंबरी त्यांनी वाचायला घेतली. या कादंबरीतील आशय अनुभवल्यानंतर त्यांना चीनमधील समाजजीवन आणि आपल्याकडील समाजजीवन यांच्यामध्ये मूलतः साम्य आढळले. या वर्ण्य विषयातील वैश्‍विकता त्यांना जाणवली ती सुवर्णक्षण. कादंबरीचा अनुवाद त्यांनी केला, पण शीर्षक छळत राहिले. ‘गुड अर्थ’चे भाषांतर चांगली जमीन का? छे! ‘अर्थ’ म्हणजे ‘धरित्री.’ त्यांनी कादंबरीचे नाव दिले ‘धरित्री’! येथून स्वतंत्र लेखनाचे बीजांकुर त्यांच्या मनोभूमीत रुजले. क्रमाक्रमाने प्रज्ञा, प्रतिभा आणि परिश्रम या गुणत्रयीचा संगम त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वात होत गेला. वि. स. सुखटणकर यांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या कथासंग्रहातून प्रेरणा घेऊन ‘कुळागर’ हा बारा कथाकारांच्या प्रादेशिक कथांचा संग्रह १९३७ मध्ये संपादित केला.
गोव्यातील प्रादेशिक वातावरणाची पार्श्‍वभूमी असलेली ‘जाई’ ही दादासाहेबांची लक्षणीय कादंबरी. बदलत्या समाजातील स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे चित्रण या कादंबरीत त्यांनी केलेले आहे. प्रेमभावनेचा प्रगल्भ आविष्कार ‘जाई’मध्ये आढळतो.
चित्रकला, संगीत आणि नाटक या जीवनाला समृद्ध करणार्‍या कलांचा दादासाहेबांनी समरसून अभ्यास केलेला होता. त्यांच्या या अभ्यासाचे आणि रसज्ञतेचे फलित म्हणजे ‘मेनका’ आणि ‘अनुपा’ या कादंबर्‍या. ‘मेनका’ या कादंबरीत एका गानतपस्विनीचे आणि मनस्विनीचे चित्रण त्यांनी तन्मयतेने केलेले आहे. तिच्या भावजीवनातील चढ-उतार आणि संगीतकलेत नैपुण्य मिळविण्यासाठी तिने केलेल्या खडतर साधनेचा आलेख येथे रेखाटलेला आहे. सामाजिक विषमतेमुळे अभंग जिद्दीने कला आत्मसात करणार्‍या संवेदनशील कलावंतांच्या मनाची होरपळ कशी होते, तिचा करुण पट येथे लेखकाने रंगविला आहे.
‘अनुपा’ ही चित्रकाराच्या जीवनावर आधारलेली कादंबरी. आधुनिक जीवनप्रणालीत मूल्यांचा र्‍हास कसा होत चाललेला आहे, त्याचे प्रातिनिधिक चित्रण या चित्रकाराच्या व्यक्तिरेखेद्वारा लेखकाने केलेले आहे. आपल्या कलेवर निरपेक्ष भावनेने प्रेम करणार्‍या अनुपाला तो चित्रकार कसा फसवतो या कथासूत्राभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. तिच्यातील वास्तव चित्रण अंतर्मुख करणारे आहे.
‘आज मुक्त चांदणे’ ही गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामावर आधारलेली दोन भागांत प्रसिद्ध केलेली कादंबरी. इ. स. १९४६ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांनी या लढ्याचे रणशिंग फुंकले. तेथून मुक्तिसंग्रामाने उग्र स्वरूप धारण केले. इ. स. १९६१ साली गोमंतकाच्या मुक्तीची महन्मंगल पहाट उजाडली.
१९४६ ते १९६१ हा कालखंड, त्यातील महत्त्वपूर्ण घटना आणि त्यात गुंतलेल्या माणसांच्या मनातील आंदोलने यांचे प्रभावी चित्रण लेखकाने केलेले आहे. या कादंबरीचा नायक विश्‍वनाथ हा संवेदनशील व काव्यात्म वृत्तीचा तरुण आहे. तो कृतिशील आहे. निसर्गसौंदर्याचा मुक्त मनाने आस्वाद घेणारा रसिक आहे. त्याच्या वृत्तीशी भिन्न असणारी सदानंद ही व्यक्तिरेखा कृतीपेक्षा लेखणीवर भिस्त ठेवणारी आहे. या दोन प्रवृत्ती तत्कालीन गोमंतकात वावरत होत्या याचे भान लेखकाने ठेवलेले आहे. विश्‍वनाथने केलेल्या साहसाच्या कृत्यांचे वर्णन येथे आहे. आजेंंतु मोंतेरो या क्रूर व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांच्या केलेल्या छळाचे चित्रण येथे आढळते. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ येथे उलगडले जातात आणि वाचकाचे मन नजीकच्या भूतकाळात प्रवेश करते. गोमंतकाच्या पारतंत्र्यामुळे सर्व क्षेत्रांत काळोखाचे साम्राज्य पसरले होते आणि मुक्तीमुळे मुक्त चांदणे कसे खुलले हे दादासाहेबांनी समरस होऊन रेखाटले आहे. ते स्वतः मुक्तिसंग्रामाशी निगडित असल्यामुळे आणि अनेक घटनांचे साक्षीदार असल्यामुळे वास्तवाचे त्यांनी सतत भान ठेवले.
रामायण आणि महाभारत हे दादासाहेबांच्या अखंड चिंतनाचे विषय. भारतीय जीवनदृष्टी घडविणारी ही दोन श्रेष्ठ महाकाव्ये. कादंबरीच्या रूपबंधात आपल्या चिंतनशील प्रतिभेचा आविष्कार दादासाहेबांना परिणतप्रज्ञ वयात करावासा वाटला. अथक प्रयत्नांनी त्यांनी रामायण-महाभारतातील व्यक्तिरेखांवर नवा प्रकाश टाकला. श्रीरामाच्या जीवनावर त्यांनी ‘अभिराम’ ही कादंबरी लिहिली. श्रीकृष्णाच्या जीवनावर ‘वासुदेव’ ही कादंबरी लिहिली. पर्ल बकच्या ‘मदर’ या कादंबरीचा ‘आई’ हा अनुवाद त्यांनी केला. चार्ल डिकन्सच्या ‘ऑलिव्हर ट्‌विस्ट’चा ‘दिग्या’ हा त्यांचा अनुवाद. मराठी कादंबरीचे अनुभवक्षेत्र वाढविण्यात दादासाहेब सातोस्करांचा महत्त्वपूर्ण हातभार लागलेला आहे.
दादासाहेबांनी कथालेखनही केलेले आहे. ‘प्रीतीची रीत’ आणि ‘अभुक्ता’ हे त्यांचे कथासंग्रह आजवर प्रसिद्ध झालेले आहेत. ‘द्राक्षांचे घोस’ आणि ‘पंचविशीतले पाप’ हे त्यांचे अनुवादित कथासंग्रह.
त्यांच्या कथा या प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबजीवनाचे चित्रण करणार्‍या आहेत. माणसा-माणसांमधले नातेसंबंध ते उलगडून दाखवितात. मराठीच्या मुख्य धारेतील कथेच्या वळणापासून त्या अलिप्त आहेत. प्रयोगशीलता आणण्याचा अट्टहास त्यातून दिसून येत नाही. ‘अभुक्ता’मधील कथांत प्रादेशिकतेची पार्श्‍वभूमी आहे. पात्रे गोमंतकातील आहेत. समकालीन गोमंतकीय कथाकारांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला नाही. कथालेखनाला त्यांनी वाहून घेतलेले नाही अथवा विपुल कथालेखन केले नाही.
‘उदंड जाहले पाणी’ हे एकमेव नाटक दादासाहेबांनी लिहिले. मगध साम्राज्यात माजलेली बेबंदशाही, चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने केलेली राज्यक्रांती हे आशयसूत्र घेऊन त्यांनी हे ऐतिहासिक नाटक लिहिले. त्यातून त्यांचा इतिहासाचा व्यासंग आणि संशोधनात्मक दृष्टी प्रकट होते.
‘शांग्रीला’ हा त्यांचा एकमेव ललितनिबंधसंग्रह. लालित्याच्या सर्व छटांचे या पुस्तकात दर्शन घडते. निसर्गानुभूती आणि आत्मनिष्ठ वृत्ती यांचा स्वरसंगम या पुस्तकात उत्तम रीतीने साधलेला आहे. निसर्गाचे त्यांना अतिशय आकर्षण. सागराविषयी अत्यंत प्रेम. तरल संवेदनशीलतेने त्यांनी आपल्या ‘स्वप्नगंध‘ या वास्तूच्या गच्चीवरून दिसणार्‍या समुद्राचे, रमणीय सूर्यास्ताचे चित्रमय वर्णन केलेले आहे. ‘मांडवी आणि जुवारीच्या काठावर’ हा संस्मरणात्मक लेख अप्रतिम आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीच्या जुन्या वातावरणात तो आपल्याला घेऊन जातो. इतिहासाच्या अभ्यासकाची दादासाहेबांची जी बैठक आहे ती येते दृग्गोचर होते. वृक्षवल्लरीविषयी त्यांना नितांत ममत्व वाटते. वास्तविक हे सारे विस्ताराने सांगायला हवे. ‘गावातल्या कुंपणाच्या एखाद्या कोपर्‍यावर पांगारा फुलतो तेव्हा मंदिरासमोरच्या प्रज्वलित दीपमाळेची आठवण होते’ किंवा ‘संध्याकाळच्या वेळी मांडवीतून येणारा खारा वारा सुरूच्या बनात घुसू लागेल तेव्हा सनाईचे सूर घुमल्यासारखे वाटते,’ हे वाचताना रसिकमन ताजेतवाने होते. निसर्गाविषयीचे लेखकाचे मैत्र अनुभवल्यानंतर आपणास आल्हाद वाटतो. या लेखसंग्रहातील विषयांची विविधता पाहून लेखकाच्या अनुभवविश्‍वाची कल्पना येते. त्याच्या वृत्तिगांभीर्याबरोबर नर्मविनोदी स्वभावाची झलक येथे पाहावयास मिळते.
सृजनशील साहित्यनिर्मितीबरोबरच दादासाहेब सातोस्करांनी समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखन केले. ते तोलामोलाचे ठरले. ‘गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार’ आणि ‘गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार’ या समीक्षात्मक ग्रंथांमधून गोमंतकातील मराठी परंपरेची निरसलपणे सेवा करणार्‍या वाङ्‌मयोपासकांचा आणि त्यांच्या विविधांगी वाङ्‌मयसंपदेचा त्यांनी चिकित्सक वृत्तीने परामर्श घेतलेला आहे. गोमंतभूमीविषयीचे ममत्व आणि मराठी वाङ्‌मयाविषयीची निःस्सीम निष्ठा हा दादासाहेबांचा स्थायीभाव आहे. वाङ्‌मयाच्या इतिहासाला पूरक ठरणारे हे महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहेत. कृष्णदास शामा, विठ्ठल नृसिंह नाईक केरीकर, गो. ना. माडगावकर, माधव चंद्रोबा डुकले व अनंत चंद्रोबा डुकले, सूर्याजी सदाशिव महाले, कृष्णंभट बांदकर, पंडित धर्मानंद कोसंबी, शणै गोंयबाब, वि. का. प्रियोळकर, डॉ. पांडुरंग स. पिसुर्लेकर, प्रा. अ. का. प्रियोळकर, ना. भा. नायक, रा. ना. वेलिंगकर, वि. स. सुखटणकर, प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई, कविवर्य बा. भ. बोरकर, पंडित महादेवशास्त्री जोशी, नारायण केशव शिरोडकर, चंद्रकांत शिरोडकर, प्रा. मनोहर हिरबा सरदेसाई, नारायण देसाई, शांताराम पांडुरंग केणी, प्रा. स. शं. देसाई, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई, सुधाकर प्रभू, ना. र. धारगळकर, ज्योत्स्ना भोळे, गणाधीश खांडेपारकर आणि डॉ. सुभाष भेण्डे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्‌मयाचा वेध दादासाहेबांनी घेतलेला आहे. या नावांवर दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येते की सोळाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या साहित्यातील तसेच समीक्षा-संशोधन क्षेत्रातील मानदंडांविषयीचे हे विवेचन आहे. यावरून दादासाहेबांच्या प्रज्ञेचा पल्ला किती व्यापक आहे हे ध्यानात येते.
‘मराठी मासिकांचे पहिले शतक’ हे दादासाहेबांचे छोटेखानी पुस्तक असले तरी तो माहितीपूर्ण आणि मौलिक दस्तऐवज आहे. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनयुगाला ज्या नियतकालिकांनी चैतन्य प्राप्त करून दिले त्यांच्या कार्याचा येथे दादासाहेबांनी साक्षेपाने परामर्श घेतलेला आहे. दादासाहेब सातोस्कर यांनी लिहिलेला ‘गोमंतक ः प्रकृती आणि संस्कृती’ हा त्रिखंडात्मक बृहद्ग्रंथ म्हणजे त्यांच्या संशोधनकार्याचा कलाशाध्यायच आहे. गोव्याचा प्राचीन इतिहास, येथील समाजजीवनाची जडणघडण, सांस्कृतिक परंपरा, भाषा, मौखिक परंपरा आणि विविध कला अशा अनेक पैलूंची साक्षेपी नोंद करणारा आणि त्यातून आपल्या राष्ट्रीय परंपरेशी असणारे अंतःसूत्र अधोरेखित करणारा संशोधक आणि प्रज्ञावंत म्हणून दादासाहेब सातोस्कर यांची तेजस्वी प्रतिमा साकार होते. इतिहास, संस्कृतिशोध, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या ज्ञानशाखांची मिती या अभ्यासाला प्राप्त झालेली आहे. ज्या वयात दादासाहेब या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बैठक मारून सिद्ध झाले ते पाहता मती कुंठित होते. अखंडित ज्ञानयज्ञ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांशी मतभिन्नता असू शकेल; पण उतारवयात व्यासंग करून नव्या पिढीसमोर त्यांनी हा दस्तऐवज ठेवलेला आहे. तो अभ्यासकांना चालना देणारा आहे. विधायक कार्य करायला प्रेरणा देणारा आहे. गोमंतकाची परंपरा समजून घेण्यासाठी तो लक्षणीय संदर्भग्रंथ ठरणार आहे. त्यांच्या दुसर्‍या खंडाला ‘केसरी-मराठा ट्रस्ट’चा न. चिं. केळकर पुरस्कार लाभला. मराठीच्या मुख्य प्रवाहाने त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेतली असा त्याचा अर्थ.
दादासाहेबांनी ‘श्रद्धांजली’ आणि ‘स्मरण’ हे व्यक्तिपर लेख लिहिले आहेत. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय नेत्यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील व्यक्तींनी या शोकात्म प्रसंगानंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया ‘श्रद्धांजली’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
‘स्मरण’ हा मृत्युलेखांचा संग्रह ‘स्मरण ज्येष्ठांचे’ आणि ‘स्मरण स्नेह्यांचे’ अशा दोन भागांत विभागलेला आहे. दादासाहेबांचे व्यक्तिमत्त्व संपन्न करण्यात या सर्वांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अर्थात लेखकाचा त्यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव या पुस्तकात ओथंबून आलेला आहे. त्यामुळे या लेखनाला आत्मनिष्ठ स्वरूप प्राप्त झालेले आहे. ज्या व्यक्तींचे भावस्मरण लेखकाने केलेले आहे त्या जीवनाच्या विविध क्षेत्रांतील आहेत. या ‘स्मरणसाखळी’मधून नकळत न लिहिलेले आत्मचरित्र साकार होते. ही संस्मरणे हृद्य आहेत. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये ‘नाडकर्णी गुरुजी’, ‘माझे तीर्थरूप’, ‘माझे डॉ. बाप्पा’, ‘प्रा. फ्रान्सिश्कू आब्रेव’, ‘डॉक्टर मामा व्यं. पां. कामत’, ‘काका दणाईत व सिनारीगुरुजी’, ‘गानतपस्विनी अंजनीबाई मालपेकर’ आणि ‘समाजसुधारक सुदामजी मांद्रेकर’ यांचा समावेश आहे. दुसर्‍या भागात स्नेह्यांचा समावेश केलेला आहे. त्यांत ‘सर्वो’, ‘लाला सुर्लकर’, ‘चित्रकार रघुवीर चिमुलकर’, ‘वा. वि. भट’, ‘चित्रकार दीनानाथ दलाल’, ‘शंकरराव कुलकर्णी’, ‘केशवराव कोठावळे’, ‘चित्रकार रघुवीर मुळगावकर’, ‘लक्ष्मीकांत भ्रेंबे’ आणि ‘भाऊसाहेब बांदोडकर’ आहेत.
या लेखांमधून लेखकाचा अंतरीचा जिव्हाळा व्यक्त झालेला आहे; शिवाय त्या कालाचा पट आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जातो.
आयुष्याच्या संध्याकाळी ४५१ पृष्ठांचे ‘बादसायन’ हे आत्मचरित्र लिहिले. गोष्टीवेल्हाळ वृत्तीने लिहिलेले वाचनीय आत्मचरित्र म्हणून त्याची गणना करावी लागेल. या वर्णनशैलीत प्रांजळ वृत्ती आणि पारदर्शिकत्व आहे. पूर्वायन, मध्यायन व उत्तरायन अशा तीन कालखंडांत हे आत्मचरित्र विभागलेले आहे. यात दादासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा, जडणघडणीचा आलेख चिररुचिर आणि चिरस्मरणीय झालेला आहे. त्यातील तपशील न नोंदता मुळातून आस्वाद घ्यावा असे हे आत्मचरित्र आहे. ‘बादसायन’ आणि पंडित महादेवशास्त्री जोशी यांचे ‘आत्मपुराण’ या दोन आत्मचरित्रांतून गोमंतकातील मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतरचे जीवन चैतन्यशील वृत्तीने आणि आत्मीयतनेने रेखाटलेले आहे असे निरीक्षण नोंदवावेसे वाटते. या दोघांमधील सौहार्दही अजोड स्वरूपाचे होते.
दादासाहेब सातोस्कर यांना निसर्गाविषयी अत्यंत ममत्व वाटत असे. विशाल नभ, विशाल सागर, उंच डोंगर-पर्वत त्यांच्या मनाला भुरळ घालीत असत. बालपणातील आल्हाददायी क्षणतरंगांचे चित्रमय वर्णन त्यांनी समरसतेने आणि रसमयतेने केलेले आहे. ते रसिकमनाला आनंदानुभव देणारे आहे. ‘बादसायन’मधील ‘मांडवीची परिक्रमा’ अवश्य वाचावी ः ‘दोन्ही तीरांवरची झाडे नदीवर वाकली होती आणि त्यांनी एक लतामंडप किंवा वृक्षमंडप म्हणू, तयार केला होता. दुपारच्या सूर्यकिरणांचा कवडसादेखील होडीत पडत नव्हता. उलट गारव्याने अंगात हुडहुडी भरली होती.’
– तरल मनाने रेखाटलेले चित्र लेखकाच्या सौंदर्यनिष्ठ मनाचे दर्शन घडविते.
‘बादसायन’मध्ये अनेक घटनांची, प्रसंगांची, व्यक्तींच्या सहवासातील क्षणांची चित्रे दादासाहेबांनी रेखाटली आहेत. ते लिहीत नसून आपल्याशी सुखसंवाद करीत आहेत असे जाणवते. फार मोठी माणसे त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटली. त्यांनी दादासाहेबांचे जीवन समृद्ध केले. त्यांनी हे विचारधन समाजपुरुषाला मुक्त मनाने दिले. ‘संध्याछाया न भिवविति हृदया’ अशी त्यांची भावना होती. त्यामुळे ‘वानप्रस्थाश्रम’ त्यांना कधीही मान्य झाला नाही. या वाङ्‌मयनिर्मितीशिवाय अन्य प्रकारची पुस्तके दादासाहेबांनी लिहिली. त्यांचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. ‘पत्रविद्या’ हा त्यांचा ग्रंथ पत्रकारितेच्या व्यवसायात पदार्पण करणार्‍याला मार्गदर्शन करणारा आहे. डॉ. शि. रा. रंगनाथन यांनी रूढ केलेले द्विबिंदू वर्गीकरण नीट समजावून देणारे ‘द्विबिंदू वर्गीकरणपद्धती व तिचा मराठी ग्रंथालयात उपयोग’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. याशिवाय ‘ग्रंथवर्गीकरण ः तात्त्विक’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. ‘येथे देवांची वसती’ हे स्थलवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांच्या अखंडित वाङ्‌मयीन तपस्येचे फल म्हणून मंगेशी येथे भरलेल्या १७ व्या अ. गो. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना प्राप्त झाला. त्यावेळी त्यांनी त्या व्यासपीठावरून अनुभवसिद्ध उद्गार काढले होते ः
‘…भाषा आणि साहित्य यांचे एक अतूट नाते आहे… भाषा म्हणजे शब्दसमुच्चय आणि शब्दांनी जुळवलेली वस्तू म्हणजे साहित्य, हे खरे असले तरी शब्दांमागे लेखकाची सच्ची अनुभूती असायला हवी. ती नसली तर अस्सल सर्जनशील साहित्य निर्माण होणे कठीण.’
वाङ्‌मयीन विश्‍वातील या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपासकाला विनम्र अभिवादन!