वसा सावित्रीचा, वटवृक्ष पूजनाचा

0
826

– पौर्णिमा केरकर

आपल्या श्रद्धाळू मनाला, दैनंदिन रहाटगाडग्यात वावरताना या व्रतामुळेच दिलासा मिळतो. ताणतणावाचे जगणे काहीसे सुसह्य होते. म्हणूनच सावित्रीचा वसा पुढे नेताना अंधश्रद्धा कर्मकांड यांच्या विळख्यात न सापडता, आपल्या कुटुंबाच्या.. समाजाच्या निरामय आरोग्याची पवित्र इच्छा मनीमानसी बाळगून या वृक्षाचे संवर्धन करुया..!!

विज्ञानानेसुद्धा मान्य केलेले आहे की वडाचे झाड हे जास्त प्राणवायू देणारे झाड आहे. त्यामुळे बेशुद्ध पडलेला सत्यवान जेव्हा वडाच्या छत्रसावलीत येतो, तेव्हा त्याच्या देहमनात तजेला निर्माण होतो. आजच्या विज्ञानयुगात जुन्या-पुराण्या या कथेला असा नवा संदर्भ लावून – वटपौर्णिमेच्या व्रताचा हा असा नव्याने विचार करायला आजच्या आधुनिक स्त्रीला सहज शक्य आहे.

हा महावृक्षसुद्धा अगदी तसाच ‘राष्ट्रोळी’, ‘दाडदेव’ वगैरेच्या रूपात गावाच्या सीमांची राखण करणारा, पशुपक्ष्यांना आपल्या अवाढव्य पसार्‍यात निवारा देणारा, लहानग्यांना पारंब्याच्या झोक्यांचा आनंद देणारा, थकल्या भागल्या पांथस्थांना थंडगार सावली देणारा आणि मुख्य म्हणजे सजीवांना प्राणवायूचा भरभरून पुरवठा करणारा परोपकारी वृक्ष!

मान्सूनचा पाऊस सुरू झाला म्हणजे सार्‍या परिसरात हिरवाईला नवा साज चढतो. प्रदीर्घ आयुष्याची देणगी लाभलेल्या वडाचे हिरवेपण ज्येष्ठात शिगेला पोचते. शेकडो वर्षे जगणारा हा महावृक्ष भारतीय संस्कृतीने सनातन काळापासून वंदनीय मानलेला आहे. माणसाचे जीवन सुंदर आणि समृद्ध करणारे आपल्या परिसरात जे महावृक्ष आहेत त्यात वडाच्या झाडाला उल्लेखनीय स्थान लाभलेले आहे. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला गोवा-महाराष्ट्रात वटपौर्णिमेच्या व्रताची परंपरा आहे. वडासारखे दीर्घ आयुष्य आणि निरोगी आरोग्य आपल्या पतीला लाभावे या भाबड्या आशेने पारंपरिक सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात. परंतु वटपौर्णिमेच्या या परंपरेत उगमापूर्वी हजारो वर्षे भारतीय उपखंडात ‘वड’ पूजनीय ठरलेला आहे. ताम्रयुगीन काळात उदयाला आलेल्या सिंधु संस्कृतीत ख्रिस्तपूर्व चार-पाच हजार वर्षांपूर्वी वडाची प्रतिमा सिंधु संस्कृतीच्या काळातल्या शिक्क्यांवरती कोरल्याचे आढळलेले आहे. याच संस्कृतीतील लोक निसर्ग पूजक होते, याची प्रचिती तत्कालीन शिक्क्यावरून येते.

भारतात धर्म, जाती, जमातीत वटपूजनाची परंपरा पाहायला मिळते. पवित्र वृक्षांच्या परंपरेत वडाला विशेष महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून गोव्यातील सुवासिनी व्रत करीत आलेल्या आहेत. वड जसा वर्षानुवर्षे जगतो तद्वतच आपल्या नवर्‍यालासुद्धा आयुष्य लाभो.. असा विचार त्यांच्या मनीमानसी भिनलेला आहे. या निमित्ताने सत्यवान-सावित्रीच्या पावित्र्य-पातिव्रत्याची गोष्टसुद्धा आदरभावाने सांगितली जाते. सत्यवान-सावित्री हे दृष्ट लागण्यासारखे जोडपे. सत्यवान अल्पायुषी आहे याची कल्पना लग्नापूर्वी सावित्रीला होतीच. असे असतानाही तिने मनापासून त्यालाच वरले. तिने अशा अल्प वय लाभलेल्या सत्यवानाबरोबर लग्न करता कामा नये अशी विनंती तिला तिच्या वडलांपासून ते इतर अनेकांनी करून बघितली. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर दृढ राहिली. लग्न झाल्यानंतर सत्यवान रानात गेला असता सर्पदंशाने त्याचा मृत्यू होतो. सावित्री त्याचे शव वडाच्या झाडाखाली ठेवते व बुद्धीकौशल्य पणास लावून यमराजाशी संवाद साधते आणि एका निसटत्या क्षणी यमराजाला त्यांनी दिलेल्या वचनाच्या कोंडीत पकडते. सावित्रीचे चातुर्य यमराजाला स्तिमित करते. तो सत्यवानाचे प्राण परत करतो. पातिव्रत्याची कहाणी अशी सफल-संपूर्ण होते. तिचा शेवटही गोड होतो. परंपरेने प्रवाहित होत आलेली ही कहाणी आजच्या एकविसाव्या शतकातील सुवासिनी सुद्धा ‘वटपौर्णिमा’ व्रत करून मानीत आलेली दिसते. मूर्च्छित सत्यवानाला सावित्री वडाच्या विशाल छायेखाली ठेवते… असा संदर्भ गोष्टीत येतो. विज्ञानानेसुद्धा मान्य केलेले आहे की वडाचे झाड हे जास्त प्राणवायू देणारे झाड आहे. त्यामुळे बेशुद्ध पडलेला सत्यवान जेव्हा वडाच्या छत्रसावलीत येतो, तेव्हा त्याच्या देहमनात तजेला निर्माण होतो. आजच्या विज्ञानयुगात जुन्या-पुराण्या या कथेला असा नवा संदर्भ लावून – वटपौर्णिमेच्या व्रताचा हा असा नव्याने विचार करायला आजच्या आधुनिक स्त्रीला सहज शक्य आहे. परंपरेला डोळस साज चढवून, आपल्या श्रद्धांना धक्का न लावता बहुपयोगी असलेल्या वडाच्या झाडाचे जतन आणि संवर्धन करता येते.

आज आपली जीवनशैली तणावाची बनलेली आहे. पती-पत्नी दोघेही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात. स्त्रीला तर घरी येऊनसुद्धा घरची कामे करावीच लागतात. त्याला धरूनच परंपरेने चालत आलेले सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांचा विचार करावा लागतो. आपली बरीचशी व्रते ही संसार-कुटुंब, मुले, नवरा यांच्या वृद्धीसाठी असतात. त्यामुळे घरच्या गृहलक्ष्मीने ती करायलाच हवीत असा अलिखित नियम असतो. पूर्वी तर हा दिवस वडाची पूजा करून साजरा केला जायचा. आज तेवढाही वेळ मिळत नाही म्हटल्यावर वडाच्या फांद्या छाटून त्या विक्रीस ठेवलेल्या असतात. पैसे देऊन त्या सहजपणे आणता येतात. ऑफिसमधून येताना हे काम होऊन जातं. त्यामुळे वडाचे झाड शोधत तिथे जाऊन त्याच्या सान्निध्यात पूजेच्या निमित्ताने का होईना वेळ घालवायची गरज नाही असा आपला ‘वेळ वाचविण्याचा’ सुजाण विचार केला जातो.

एका वडाचे वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याच्या हजारो फांद्या एकाच वेळी छाटल्या आणि बाजारात विक्रीसाठी ठेवल्या, तर त्या वृक्षाची काय बरं अवस्था होईल … याचा विचार सुजाण संवेदनशील मनानी नको का करायला?.. पण तसं होत नाही. आपल्या पूर्वजांनी या महावृक्षाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. एकत्र कुटुंबपद्धतीतील पुराणपुरुष जसा संपूर्ण कुटुंबावर दरारायुक्त प्रेम करतो. घरातली लहान मुले त्याच्या अंगाखांद्यावर निर्धास्तपणे जशी खेळतात, हा महावृक्षसुद्धा अगदी तसाच ‘राष्ट्रोळी’, ‘दाडदेव’ वगैरेच्या रूपात गावाच्या सीमांची राखण करणारा, पशुपक्ष्यांना आपल्या अवाढव्य पसार्‍यात निवारा देणारा, लहानग्यांना पारंब्याच्या झोक्यांचा आनंद देणारा – थकल्या भागल्या पांथस्थांना थंडगार सावली देणारा आणि मुख्य म्हणजे सजीवांना प्राणवायूचा भरभरून पुरवठा करणारा परोपकारी वृक्ष! खूप विस्तारत जाणारा त्याचा पसारा त्याच्या औदार्याचेच प्रतीक मानले गेले आहे. कुरूक्षेत्रात देवानी म्हणे एकदा मोठा यज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्याचाच मग वटवृक्ष बनला. सृष्टीवर जेव्हा प्रलय झाला त्यावेळी श्रीविष्णूच्या बालरूपाला वटपत्रावरील शयनाने तारले, वडाच्या झाडावरच ब्रह्मदेवाचे निवासस्थान असते. यक्ष, वेताळ, दाड, राष्ट्रोळीसारखे राखणदार याच वृक्षावर असतात, असे लोकमानस मानीत आलेले आहे. गोव्यात आणि गोव्याबाहेरही अशा काही जागा आहेत ज्या जागेवर या वृक्षाचा विस्तार एवढा वाढत गेलेला आहे की एकाच वेळेला पाचहजारापेक्षाही जास्त माणसं त्याच्या सावलीत बसू शकतात.

अहमदनगरमधील पारनेरच्या ‘पेमगीरी’ येथे असाच मोठ्ठा वटवृक्षाचा विस्तार आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही. नर्मदेच्या मुखाजवळील ‘कबीरवट’, कलकत्त्याला बोटॅनिकल गार्डनमधील वड, इ. अनेक ठिकाणी असलेला हा वृक्ष आपल्या आगळ्यावेगळ्या तजेलदार डौलाने आबालवृद्धांना आकर्षित करतो.

गोव्यात तर काणकोण पर्तगाळीचा, वेडणेतील पार्सेला भगवती मंदिराजवळ, मांद्रे गावडेवाडा, पालये भोमात इ. अनेक ठिकाणची वडाची रूपे देखणी आणि श्रद्धाळू मनात नतमस्तक व्हायला लावणारी अशीच आहेत. असा हा वडाचा महिमा कितीही वर्णिला तरी अपुराच वाटणार. पक्ष्यांच्या विष्ठेतून वडाची रोपे अशीच कोठे कोठे रुजत जातात. त्याच्या आडव्या फांद्यांपासून पारंब्या फुटून त्या जमिनीत शिरतात व पुढे पुढे विस्तारत जातात. अशा या वृक्षाचे आकर्षण आपल्या पूर्वजांना वाटले नसते तरच ते नवल मानावे लागले असते.

विविध रोगांवर गुणकारी असलेला हा वृक्ष भरभरून प्राणवायू देणारा आहे. एका अर्थाने समस्त मानवी मनाना संजीवनी बहाल करणारा आहे, याची जाणीव पूर्वजांना त्यांच्या निसर्ग सान्निध्यामुळे – अनुभवामुळे झालेलीच होती. म्हणून हा वृक्ष जीवनदायिनी बनला. तो जसा दीर्घायुषी, तजेलदार, धष्टपुष्ट आहे तसाच ‘आपला पतीही दीर्घायुषी होवो’ ही कामना या वृक्षाच्या सान्निध्यात, ज्येष्ठातील वटपौर्णिमेला करणे त्यांना संयुक्तिक वाटले असावे. एका अर्थाने हे वृक्ष संवर्धन होते. निसर्गाला देव मानून त्याच्याविषयीची कृतज्ञता त्यातून अभिव्यक्त व्हायची. सौभाग्यवृद्धीसाठी व्रत करताना प्रत्यक्ष वडाच्या झाडाला फेरे मारणे संयुक्तिक वाटले. पुढे मग वटवृक्षाची पूजा मोठ्या उत्साहात पार पाडली जायची. प्रवाह वाहता असतो. त्यात बदल होतच राहतो. आज आपण जर या व्रताच्या निमित्ताने वडाच्या फांद्या छाटून त्याची प्रतीकात्मक पूजा करून मनीची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा बाळगू लागलो तर ते कितपत् संयुक्तिक ठरेल याचा विचार शिकल्या-सवरलेल्या स्त्रियांनी जरूर करावा. याव्यतिरिक्त वडाचे रोपटे रोवून आपलं व्रत करता येते. पर्यावरण-निसर्गरक्षणाचा वसा घेऊन सामूहिक वृक्षारोपण करता येते. त्या निमित्ताने नव-विचाराची रुजवण समाज जागृतीसाठी महत्त्वाची ठरणार. खरं तर आपल्या भोवतालचा परिसर आपण सुंदर-निसर्गसंपन्न ठेवला तर आपल्या कुटुंबाच्या जीवनवृद्धीला ते पोषक ठरते. त्यासाठी नुसते आंधळेपणाने अशा व्रतांचे पालन न करता त्यामागचे विज्ञान समजून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या श्रद्धाळू मनाला, दैनंदिन रहाटगाडग्यात वावरताना या व्रतामुळेच दिलासा मिळतो. ताणतणावाचे जगणे काहीसे सुसह्य होते. म्हणूनच सावित्रीचा वसा पुढे नेताना अंधश्रद्धा कर्मकांड यांच्या विळख्यात न सापडता, आपल्या कुटुंबाच्या.. समाजाच्या निरामय आरोग्याची पवित्र इच्छा मनीमानसी बाळगून या वृक्षाचे संवर्धन करुया..!!