मुसाच्या दोन गोलमुळे नायजेरियाला पूर्ण गुण

0
103

अहमद मुसाने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर नायजेरियाने आईसलँडचा २-० असा पराभव करीत रशियात चालू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयासह ‘ड’ गटातून बाद फेरीतील आशा जिवंत राखल्या. पहिल्या सामन्यात क्रोएशियाने नायजेरियावर मात केली होती. विजयामुळे पूर्ण ३ गुण मिळवित नायजेरियाने गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ प्रथमच तळाला फेकला गेला आहे.

कालच्या सामन्यातील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले. या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्याच्या समान संधी चालून आल्या होत्या. परंतु त्यांना गोलकोंडी सोडविता आली नव्हती.

दुसर्‍या सत्रात नायजेरियाने आक्रमक खेळावर भर देत ४९व्या मिनिटाला आपले खाते खोलले. अनुभवी खेळाडू अहमद मुसाने मोझेसकडून मिळालेल्या पासवर हा गोल नोंदविला. त्यानंतर ७५व्या मिनिटाला ओमेरुओकडून मिळालेल्या पासवर मुसाने नायजेरियाच्या २-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केला. सामन्यचाया अंतिम क्षणात आईसलँडला पिछाडी भरून काढण्याची संधी मिळाली होती. परंतु मिळालेल्या पेनल्टीचे गुल्फी सीगुर्डसनला गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्याने घेतलेला फटका गोलपोस्टवरून गेला. या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात नायजेरियाच्या गोलरक्षकानेही आईसलँडचे अनेक हल्ले परतवून लावत मोलाचा वाटा उचलला.