वर्षभरात काही प्रमुख मार्गांचे राष्ट्रीयीकरण

0
7

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; खासगी बसेस कदंबच्या ताफ्यात सामावणार; प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने राज्यातील काही प्रमुख मार्गांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात म्हणजेच पुढच्या दसर्‍यापूर्वी राज्यातील काही प्रमुख मार्गांचे राष्ट्रीयीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पणजीत कदंब महामंडळाच्या ४२ व्या वर्धापनदिन सोहळ्यात दिली. तसेच काही मार्गांवरील खासगी बसेस कदंब महामंडळाच्या ताफ्यात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व कदंब महामंडळाचे चेअरमन आमदार उल्हास तुयेकर उपस्थित होते. कदंबच्या पहिल्या बसची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.
खासगी बसेसना कदंब महामंडळाच्या ताफ्यात सामावून घेण्याच्या वाहतूक खात्याच्या योजनेमुळे राज्यातील प्रवाशांना चांगली सेवा तर मिळणार आहेच. शिवाय या योजनेमुळे कदंब महामंडळ आणि खासगी बसमालकांनाही फायदा होणार आहे. ज्या खासगी बसेस कदंब महामंडळ आपल्या ताफ्यात सामावून घेईल, त्या बसेस त्यांच्या सध्याच्या मार्गावरूनच सोडण्यात येतील. परिणामी या योजनेमुळे कदंब महामंडळ आणि खासगी बसमालक यापैकी कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जेथे कदंब बसेस नाहीत, अशा मार्गांवरही या खासगी बसेच कदंब महामंडळ सुरू करील. या योजनमुळे कदंब महामंडळ तसेच खासगी बस मालक अशा दोघांचाही फायदा व्हावा यासाठी या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा बनणार लॉजिस्टिक हब
आगामी काळात गोवा हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणजेच रसद पुरवणारे केंद्र म्हणून पुढे येणार असून, केंद्र सरकारच्या गतीशक्ती योजनेत गोवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यातील रस्ते, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग व जलमार्ग जोडण्यात येणार असून, या योजनेचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला कदंब महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कदंबच्या कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करणार नाही

कदंब महामंडळाचे कर्मचारी गेल्या ४२ वर्षांपासून प्रवाशांना चांगली व दर्जेदार सेवा देत आहे. इलेक्ट्रीक बसेस आल्यामुळे व काही मार्गांचे राष्ट्रीयकरण होणार असल्याने महामंडळाच्या कर्मचार्‍यांना आपल्या भवितव्याबाबत चिंता वाटू लागलेली आहे; मात्र त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कदंबच्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात येणार नाही, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

तिकिटासह कदंबच्या सर्व सेवा डिजिटल होणार

कदंब महामंडळाच्या तिकिटासह सर्व सेवा डिजिटल करण्यात येणार आहेत. तसेच यापुढे टप्प्याटप्प्याने डिझेलवर चालणार्‍या बसेस कमी करून इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.