वकिलाकडूनच न्यायालयात चोरी; संशयित अटकेत

0
6

आल्तिनो-पणजी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या मुद्देमाल विभागातील चोरी प्रकरणी ॲड. मुजाहिद ईस्माईल शेख (रा. वाळपई) याला काल अटक केली. संशयित गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात वकिली करीत आहे.

या चोरी प्रकरणी मुख्य न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी तक्रार दाखल केली होती. ही चोरीची घटना 31 जानेवारीला संध्याकाळी 6 ते 9.30 या वेळेत घडली होती. ॲड. मुजाहिद ईस्माईल शेख याने 5 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात प्रवेश केला. त्याने मुद्देमाल असलेल्या विभागातील मुद्देमाल साठवून ठेवलेली कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती; मात्र चलनात नसलेल्या जुन्या नोटा नेलेल्या नव्हत्या.

या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी 8 पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर तपासाअंती संशयिताला वाळपई येथे ताब्यात घेण्यात आले, असे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले. त्याच्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत. चोरी केल्यानंतर संशयित मडगावच्या दिशेने गेला होता. काही वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने ही चोरी केली होती. सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून या चोरीचा छडा लागला, असे वाल्सन यांनी सांगितले.