लोबो कामत यांच्याविरोधात अपात्रता याचिका

0
15

>> बंडखोरांविरोधात कॉंग्रेसची आक्रमक भूमिका; आमदारांच्या आवश्यक संख्याबळाअभावी डाव फसला : अमित पाटकर

कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो अयशस्वी प्रयत्न केला, त्या बंडाचे नेतृत्व केल्याचा आरोप असलेले पदच्युत विरोधी पक्षनेते मायकल लोबो व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याविरुद्ध काल कॉंग्रेसने विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर अपात्रता याचिका दाखल केली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल ही माहिती दिली.

मायकल लोबो व दिगंबर कामत यांनी पक्षाशी गद्दारी करत रविवारी अन्य काही आमदारांसह पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे त्यासंबंधीचे पुरावे आहेत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. लोबो, कामत यांना आमदारांचे आवश्यक तेवढे संख्याबळ न मिळाल्याने पक्षफुटीचा डाव फसला. आता या दोघांनाही अपात्रता याचिकेला सामोरे जावे लागणार असल्याचे पाटकर म्हणाले.
मी अजूनही कॉंग्रेसमध्येच : कामत
आमदार दिगंबर कामत यांनी आपण अजून कॉंग्रेस पक्षातच असून, आपण पक्षाविरुद्ध बंड केल्याचा व पक्षातून फुटून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचा इन्कार केला. रविवारी आपण घरीच होतो. आपण बंडाचे नेतृत्व केल्याचा खोटा आरोप आपल्यावर लावण्यात आला आहे. गोव्यात गत विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे सर्व आमदार अन्य पक्षात गेले होते, त्यावेळी आपण एकट्याने गत निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व केले. तसेच प्रचार कार्यातही आपण आघाडीवर होतो; मात्र असे असताना निवडणुकीनंतर पक्षाने आपली मानहानी करून विरोधी पक्षनेते पद आपणाला नाकारले, असे कामत म्हणाले.

आपण दिल्लीला भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो हा आपणावर केलेला आरोप खोटा असून, आपण दिल्लीला नव्हे तर कोलकाता येथे जलतरण संघटनेच्या बैठकीला हजर राहण्यासाठी गेलो होतो, असे स्पष्टीकरण कामत यांनी दिले.
शनिवारी दिनेश गुंडू राव यांनी मडगाव येथे घरी येऊन आपली भेट घेतली होती. त्यामुळे नंतर मडगावात झालेल्या बैठकीला आपण हजर राहिलो नाही, असेही कामत यांनी सांगितले.

लोबोंकडूनही इन्कार
मायकल लोबो यांनी काल खुलासा करताना आपण पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश करू पाहत होतो, हा आरोप खोटा असल्याचे सांगितले. मडगाव येथील बैठकीला आपण हजर होतो. त्यामुळे पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला हजर राहिलो नसल्याचे स्पष्टीकरण लोबो यांनी दिले.

कॉंग्रेसचे कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार राजेश फळदेसाई यांनी देखील काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

आपण अजूनही कॉंग्रेस पक्षातच असून, पक्षाविरुद्ध बंड केल्याचा व पक्षातून फुटून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चुकीचा आहे. तसेच बंडाचे नेतृत्व केल्याचा खोटा आरोप आपल्यावर लावण्यात आला आहे.

  • दिगंबर कामत,
    आमदार, कॉंग्रेस.

विधिमंडळ गटनेता निवड लांबली
कॉंग्रेस विधिमंडळ गटाचा नेता निवडण्यासाठी कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत काल कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत गटनेत्याची निवड झालीच नाही. वासनिक यांनी आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. या बैठकीला आमदार संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, आलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई, रुडाल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा, डिलायला लोबो, केदार नाईक, मायकल लोबो यांची उपस्थिती होती. फक्त आमदार दिगंबर कामत हे हजर नव्हते. दरम्यान, वासनिक यांच्यासमोर आपण आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण कॉंग्रेस पक्षात राहणार आहे, असे मायकल लोबो यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.