लोबोंचे बंड

0
45

सन २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षापाशी बहुमत नसतानाही रातोरात गोवा फॉरवर्डचा पाठिंबा मिळवून सरकार बनवण्यात ‘किंगमेकर’ ची भूमिका बजावणारे मायकल लोबो अखेर काल भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांना जागा नसल्याचे सांगत मंत्रिमंडळ आणि पक्षातून बाहेर पडले. वास्तविक पक्षामध्ये राहून आपला पत्नीलाही निवडून आणायचा स्वार्थ साधत नाही याची खात्री पटल्यावरच ते पक्षातून बाहेर पडले आहेत. उगाच पक्षनिष्ठेचा आणि नैतिकतेचा आव त्यांनी आणू नये. गेले सहा महिने त्यांनी ज्या प्रकारे नरो वा कुंजरोवा करीत पत्नीच्या तिकिटाची चाचपणी चालवली होती ती बोलकी आहे. बार्देश मतदारसंघातील सातही मतदारसंघ म्हणजे आपलीच मिरास असल्याच्या थाटात त्यामध्ये आपण सांगू तेच उमेदवार पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवावेत असा आग्रह धरणारे लोबो आता कॉंग्रेसवासी होत आहेत, ते केवळ आपली ही मागणी तो पक्ष पुरवायला तयार आहे म्हणून. त्याला कोणतीही वैचारिक वा नैतिक बैठक नाही.
पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात स्थान देणार नाही असे ठणकावून सांगणारा कॉंग्रेस पक्ष, ह्या सोडून जाणार्‍यांना फोडण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला त्या मायकलना मात्र पक्षात प्रवेश देत आहेत यामागचे तर्कशास्त्र अजबच म्हटले पाहिजे. गेल्या वेळेला कॉंग्रेसचे सरकार सतरा आमदार निवडून येऊनही बनू शकले नाही, त्यालाही मायकलच तर कारणीभूत होते. परंतु सतरावरून दोनवर आलेल्या कॉंग्रेसला संजीवनी आवश्यक असल्यामुळे मायकलचा काडीचा आधार त्यांना मोलाचा वाटतो आहे. त्यामुळे त्यांच्या गतेतिहासाचा कॉंग्रेसला सोईस्कर विसर पडलेला आहे.
भाजपमधून बाहेर पडताना मायकलना प्रश्न विचारला गेला की निवडणुकीनंतर भाजपचे सरकार बनणार आहे का? भाजपवर खरोखर संतापून कोणी बाहेर पडणारा असता तर त्यावर राज्यात भाजपविरोधी हवा कशी आहे हेे सांगून मोकळा झाला असता, परंतु मायकलनी अत्यंत सावधपणे ‘ते सांगू शकत नाही’ असे गुळमुळीत उत्तर देत आपली कुंपणावरची भूमिकाच अधोरेखित केली आहे. उद्या पुन्हा यदाकदाचित भाजपचे सरकार बनते आहे असे दिसले तर मायकल कॉंग्रेसला खुंटीवर टांगून पुन्हा एकटे किंवा आपला गट बनवून भाजपच्या गोटात परतणार नाहीत याची काय खात्री? भाजपच्या पक्षसंघटनेशी त्यांचे भले सध्या बिनसले असेल, परंतु भाजप श्रेष्ठींनी तूर्त कॉंग्रेस पक्षात चाललेला हा महत्त्वाचा दुवा काही समूळ तोडून टाकलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेससाठीच नव्हे, तर एकूणच विरोधकांसाठी महत्त्वाकांक्षी मायकल लोबोंना आपल्या अंतर्गत गोटात प्रवेश देणे उद्या निवडणुकोत्तर घडामोडींत महाग पडू शकते.
मायकल हे उपद्रवी नेते आहेत हे गेल्या दहा वर्षांत सिद्ध झाले आहे. मंत्रिपदासाठी त्यांनी चालवलेला थयथयाट विस्मृतीत गेलेला नाही. वेळोवेळी आपल्याच सरकारवर ते ज्या प्रकारे शरसंधान करीत आले ते पाहिले तर त्यांची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी स्वतःचा दबावगट निर्माण करण्याची खुमखुमी काही लपून राहिलेली नाही. अगदी ज्यांनी आपल्याला भाजपात आणले, त्या मनोहर पर्रीकरांनाही मायकलनी चटके दिलेले आहेत. शेवटच्या आजारपणातही पर्रीकरांना त्यांना दिल्लीला बोलावून घेऊन समज देण्याची वेळ आलेली होती. मंत्रिपद मिळाल्यानंतर तरी लोबोंचा आत्मा शांत होईल असे वाटत होते, परंतु त्यानंतरही त्यांचे विस्तारवादी प्रयत्न सुरूच राहिले. पत्नी डिलायला शिवोलीतून निवडणूक लढवील, म्हापशातून सुधीर कांदोळकर हे आपले उमेदवार असतील, अशा एकेक घोषणा जेव्हा त्यांनी करायला सुरूवात केली, तेव्हापासून ते पक्षावर दबाव आणीत असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या जवळजवळ सहा महिन्यांपासून त्यांनी या तोफा डागायला सुरुवात केली होती, परंतु तरीही मायकल यांचा बार्देशमधील राजकीय प्रभाव निर्विवाद असल्याने तो लक्षात घेऊन भाजपने आजवर तोंड दाबून मुक्क्यांचा हा मार निमूटपणे सोसला. अर्थात, पाठीमागून भाजपचाही काटशह देण्याचा प्रयत्न चाललाच होता. साळगावात जयेश साळगावकर आणि पर्वरीत रोहन खंवटे यांना तातडीने भाजपवासी करून घेण्यात आले ते उगीच नव्हे. निवडणुकीच्या तोंडावर मायकलनी कॉंग्रेसला जवळ केले आहे. या संधीचा फायदा उठवून ते आपले राजकीय वजन वाढवू पाहतील. परंतु ते उपद्रवी असले, तरी उपयुक्त नेते आहेत हे भाजपाला ठाऊक आहे. त्यामुळे वेळ येईल तेव्हा त्यांना पक्षाची दारे पुन्हा खुली करायला भाजप मागेपुढे पाहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. निवडणुकीच्या निकालावर मायकल यांची पुढील भूमिका ठरणार आहे हे सांगायला ज्योतिषी कशाला हवा?