कला व संस्कृती खात्याकडून दरवर्षी कला अकादमीच्या आवारात आयोजित केला जाणारा वार्षिक लोकोत्सव कांपाल पणजी येथील परेड मैदानावर स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कला अकादमीच्या आवारात आयोजित लोकोत्सवामुळे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या निर्माण होते. यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. लोकोत्सवाच्या वेळी अनेक नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन लोकोत्सवाचे कांपाल येथील परेड मैदानावर स्थलांतर करण्यासाठी कला व संस्कृती खात्याशी चर्चा केली जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
या वर्षी गोवा मुक्तीदिन सोहळा कांपाल येथील परेड मैदानावर साजरा करण्यात आला. लोकोत्सवाचे आयोजन परेड मैदानावर केल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो. परेड मैदानावर वाहन पार्किंगसाठी जागाही उपलब्ध होऊ शकते. तसेच लोकोत्सवात थाटण्यात येणार्या स्टॉल्ससाठी चांगली जागा उपलब्ध होऊ शकते, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.
पणजी फेस्ताच्या फेरीमधील व्यावसायिकांना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला होता.