विविध राज्यांत सीएएविरोधात उग्र निदर्शने

0
126
Lucknow: Police personnel baton charge at protestors during their rally against NRC and amended Citizenship Act that turned violent, in Lucknow, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo) (PTI12_19_2019_000292B)

मोदी सरकारने संसदेत संमत केलेल्या सीटीझन्स अमेंडमेंट ऍक्ट तथा सीएए या कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र काल प्रकर्षाने दिसून आले. विविध राज्यांमध्ये कलम १४४ लागू झालेले असूनही त्याला न जुमानता देशातील अनेक शहरांमध्ये या नव्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विद्यार्थी, युवक-युवती, महिला, पुरुष, वृद्ध अशा सर्व वयोगटातील नागरीक तसेच चित्रपट क्षेत्रातील कलाकार, निर्माते यासह मोठ्या संख्येने नागरीक रस्त्यावर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही राजधानी अहमदाबादेत नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. बहुतेक ठिकाणी शांततेत निदर्शने झाली असली तरी उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तेथे हिंसक निदर्शकांनी प्रसारमाध्यमाच्या ओबी व्हॅनलाही आग लावली. शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणार्‍या माकप नेते सीताराम येच्युरी, इतिहासकार रामचंद्र गुहा, स्वराज अभिपानचे संस्थापक योगेंद्र यादव, विरोधी नेते अजय माकन, डी. राजा, निलोत्पल बसू, वृंदा करात, संदिप दीक्षित आदींना नवी दिल्लीतील लाल किल्ल्यानजीक आंदोलन करताना स्थानबद्ध करण्यात आले.

दिल्लीत इंटरनेट, मेसेजिंग सेवा निलंबित
दिल्ली पोलिसांच्या निर्देशांनुसार काल एअरटेल, वोडाफोन, आयडिया व रिलायन्स जिओ या कंपन्यांनी दिल्ली एनसीआर परिसरातील इंटरनेट व मेसेजिंग सेवा निलंबित ठेवली होती. मंडी हाऊस, सीलमपूर, जाफराबाद, मुस्तफाबाद, जामिया नगर, शहीत बाग व बावना अशा भागांमध्ये ही सेवा निलंबित केली होती.

दिल्लीत लाल किल्ल्याच्या परिसरात १४४ कलमाचे उल्लंघन करून निदर्शने करणार्‍या शेकडो निदर्शकांना पोलिसांनी बसगाड्यांमधून नेले व स्थानबद्ध केले. निदर्शनाच्या प्रमुख ठिकाणी लाल किल्ला परिसरात जाऊ पाहणार्‍या शेकडो लोकांना रोखण्यात आल्याने त्यांनी राजघाट, शांतीवन, दर्यागंज, काश्मिरी गेट अशा विविध ठिकाणी जाऊन निदर्शने केली.

बंगळुरूत उग्र निदर्शने
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथेही प्रतिबंधात्मक आदेश डावलून मोठ्या संख्येने सीएएविरोधांत निदर्शने झाली. तेथे इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपण शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त करताना आपल्यावर केलेली पोलीस कारवाई हा अलोकशाही प्रकार असल्याचे गुहा म्हणाले. चित्रपट अभिनेते तथा मक्कल निधी मायमचे प्रमुख कमल हसन यांनीही गुहा यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

बिहारात हिंसक निदर्शने
सीएएविरोधात काल प्रमुख विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता. तसेच बिगर राजकीय संस्था, संघटनांनीही काल निदर्शने केली. मात्र अनेक ठिकाणी निदर्शनांदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. येथील निदर्शनांमध्ये डाव्या राजकीय पक्षांसह अन्य प्रादेशिक पक्षांचाही सहभाग होता. राजद पक्षानेही या बंदला पाठिंबा दिला होता.

हैदराबादेत निदर्शनांआधी
विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
हैदराबाद शहर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांसह अनेकांना निदर्शनांआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यात हैदराबाद विद्यापीठाच्या ५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. चार मिनारसह अन्य भागांमध्ये निदर्शकांनी आंदोलने केली.

अहमदाबादेंत निदर्शकांवर
पोलिसांकडून लाठीमार
अहमदाबाद शहराच्या सरदार बाग भागात निषेध मोेर्चा काढू पाहणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी लाठीमार करून पांगविण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी निदर्शने करण्यास मान्यता देण्यात आली नव्हती. त्यामुळे लाठीमार केल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. महाविद्यालयाबाहेर निदर्शने करणार्‍या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय पटेल यांनी दिली.

लखनौत हिंसाचाराचे थैमान
सीएएच्या निषेधार्थ रस्त्यावर आलेल्या उग्र निदर्शकांनी लखनौ शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजवला.

मंगळुरूत पोलिसांच्या गोळीबारात २ ठार
हजारोंच्या संख्येने नागरिकांनी निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर मंगळुरू शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. निदर्शनांदरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाढीमारात अनेक निदर्शक जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात दोन निदर्शक ठार झाले.

गुहांवरील कारवाई ः येडीयुरप्पा यांच्याकडून आश्‍चर्य

इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गुंड प्रवृत्तीच्या घटकांना अटक करायची असते. गुहा यांच्यासरख्यांना विनाकारण ताब्यात घेऊन पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये असे ते म्हणाले. पोलिसांनी संयम पाळावा, असेही ते म्हणाले.

चले जाव चळवळीतील
वृद्धाचाही सहभाग
महात्मा गांधी यांनी १९४२ साली जेथून ब्रिटिशांविरोधात चले जाव चळवळ सुरू केली त्या मुंबईतील क्रांती मैदानावर काल हजारोंच्या संख्येने विविध थरातील क्षेत्रातील, वयोगटातील नागरिकांनी उपस्थिती लावली. यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यासह बॉलिवूड कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आदींचा सहभाग होता. ‘मोदी – शहा से आझादी’ चे नारे लोक संतप्तपणे मुठी आवळून देताना दिसत होते. चले जाव चळवळीत १९४२ मध्ये सहभागी झालेले ९४ वर्षीय जी. जी. पारिख हे यावेळी क्रांती मैदानावर उपस्थित होते. अभिनेते राज बब्बर तसेच चित्रपट लेखक शाहिद मिर्जा, अभिनेता सुशांत सिंग आदींचा निदर्शनांमध्ये सहभाग होता.