अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा
कॉंग्रेस आमदार तसेच माजी मंत्री व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी काल एका पत्रकाद्वारे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला आपला पाठिंबा व्यक्त केला व राज्यात लोकायुक्त नेमण्याची मागणी केली.
आपण अण्णांचा चाहता असून यापूर्वीच बर्याच वेळा आपण विधानसभेत लोकायुक्तचा मुद्दा उपस्थित केलेला असून त्यावर चर्चाही केली असल्याचे त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा व्यक्त करणारे ते राज्यातील पहिलेच कॉंग्रेस आमदार ठरले आहेत.
यासंबंधी आपण १० फेब्रुवारी २०११ रोजी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. मात्र, सरकारने आपण केलेल्या विनंतीकडे लक्षही दिले नाही किंवा त्यावर गंभीरपणे विचारही केला नाही, असा आरोपही नार्वेकर यांनी केला आहे. यंदा गोवा मुक्तीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून ते संपण्यास अजून चार महिने शिल्लक आहेत. वर्ष संपण्यापूर्वीच सरकारने लोकायुक्त विधेयक तयार करून ते पुढील महिन्यात विशेष अधिवेशनात संमत करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसे घडल्यास ती आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय अशी घटना ठरेल, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे.