लोकांना विश्‍वासात घेऊन नव्या ओडीपीची मागणी

0
192

कांदोळी पंचायत क्षेत्राचा बाह्य विकास आराखडा तयार करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात न आल्याने तयार बाह्य विकास आराखडा रद्द करून लोकांना विश्‍वासात घेऊन नवा बाह्य विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी कांदोळी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत काल केली.

या पत्रकार परिषदेला सचिन कुर्टीकर. दामियान टेलीस, सावियो मातियश, आग्नेलो बार्रेटो व इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती. कांदोळी ग्रामपंचायतीच्या रविवारी पार पडलेल्या ग्रामसभेत बाह्य विकास आराखड्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. लोकांना विश्‍वासात न घेता कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच आराखड्याबाबत दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आराखडा नव्याने तयार करावा अशी मागणी करण्यात आली. परंतु पंचायत मंडळाने ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा देण्यास नकार दिल्याने ओडीपीला विरोध करणार्‍या नागरिकांना सभात्याग करावा लागला, असे कुर्टीकर यांनी सांगितले.

पंचायत क्षेत्राच्या विकासाला विरोध नाही. परंतु विकास कामांचे नियोजन करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. कांदोळी ओडीपीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. न्यायालयाने कच्च्या ओडीपीच्या आधारे बांधकामांना मान्यता न देण्याचा अंतरिम आदेश दिला आहे, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आराखड्याच्या प्रश्‍नात लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा, असेही कुर्टीकर यांनी सांगितले. खारफुटीची झाडे असलेल्या शेतातून नवीन २५ मीटरचा नवीन रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे आग्नेलो बार्रेटो यांनी सांगितले.