लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा शिवसेना लढविणार

0
106

शिवसेना राज्यातील लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघ या दोन्ही जागा लढविणार आहे. शिवसेनेची गोवा सुरक्षा मंचाशी युती कायम राहणार आहे. शिवसेनेच्या पक्षीय कार्याला गती देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे येत्या एप्रिल महिन्यात गोव्यात दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे गोवा प्रभारी तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

शिवसेनेने आगामी लोकसभेच्या २०१९ ची निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी उमेदवार बाहेरून आयात केले जाणार नाहीत. तर पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन्ही जागा लढविण्यास मान्यता दिली आहे. प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा पाठिंबा असलेल्या गोवा सुरक्षा मंच लोकसभेची निवडणूकीसाठी शिवसेनेला सहाय्य करणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात जागांचे नव्याने वाटप केले जाणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, गोवा सुरक्षा मंच आणि मगोप यांच्यात आघाडी होती. त्यातील मगोपने आघाडीतून फारकत घेतली आहे. शिवसेनेच्या कार्याचा राज्यात विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पक्षीय कार्याच्या विस्तारासाठी राज्यात आणखीन कार्यालय सुरू केली जाणार आहेत.
म्हादईच्या प्रश्‍नावर स्थानिक शाखेने घेतलेली भूमिका जनता आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची असून या भूमिकेशी तडजोड केली जाणार नाही. यावेळी संपर्क प्रमुख जीवन कामत, सह संपर्क प्रमुख आदेश परब, राज्य प्रमुख जीतेश कामत, उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई- नाईक यांची उपस्थिती होती.

शिवसेनेचे दोन राज्यप्रमुख
शिवसेनेचे राज्यप्रमुख म्हणून शिवप्रसाद जोशी कार्यरत आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यप्रमुख म्हणून जितेश कामत यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राऊत यांनी केली. गोव्यातील भाजप व इतर पक्षांमध्ये नवीन कणखर नेतृत्वाच्या अभावामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांना आजारपणातसुध्दा कामकाज करावे लागत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरी पर्रीकर यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागते. गोव्याला पर्रीकर यांच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना आम्ही ईश्‍वरचरणी करीत आहोत.