लैंगिक शोषणप्रकरणी मिलिंद नाईक यांचा राजीनामा

0
28

एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. महिला लैंगिक शोषण प्रकरणात मंत्री मिलिंद नाईक यांचा सहभाग असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाची मुक्त व योग्य प्रकारे चौकशी करता यावी यासाठी नाईक यांनी राजीनामा दिल्याचे भाजप सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी चोडणकर यांनी गोवा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्या मंत्र्याचे नाव आपण लवकरच उघड करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र सत्ताधारी भाजपने हा आरोप खोटा असून निवडणुकीवर डोळा ठेवून कॉंगे्रसने हा आरोप केल्याचा दावा केला होता. तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी चोडणकर यांना मंत्र्याचे नाव जाहीर करण्याचे आवाव्हान दिले होते. यावेळी तानावडे यांनी, चोडणकर हे कोणाचेही नाव न घेता खोटा आरोप करत असल्याचा दावा केला होता.

मात्र भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी चोडणकर यांच्या आरोपाला दुजोरा दिला होता. तसेच पीडित महिलेने कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी बळजबरीने आपला व्हिडिओ बनवल्याचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र काल कॉंग्रेसच्या नेत्यांनी काल मंत्री मिलिंद नाईक यांचे नाव पत्रकार परिषदेतून उघड केले. तसेच पुराव्यादाखल एक व्हिडिओ क्लिपही सादर केली. त्या पार्श्‍वभूमीवर काल शेवटी मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला
कॉंग्रेस नेत्यांनी आपले नाव पुराव्यानिशी उघड केल्यानंतर मंत्री मिलिंद नाईक यांनी काल आपल्या राजीनाम्याचे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केले. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर पत्र राज्यपालांकडे पाठवून दिले आहे अशी माहिती काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, या लैंगिक शोषण प्रकरणात मुरगाव पोलिसांनी एका ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यावर कथिल खंडणीचा आरोप ठेवल्याची घटना घडल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी मिलिंद नाईक यांचे नाव उघड केले. चोडणकर यांनीच ती जबाबदारी घेत ती पार पाडली. तद्नंतर संकल्प आमोणकर यांनी लैंगिक शोषणप्रकरणी मिलिंद नाईक यांच्याविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. तसेच पुराव्यादाखल पत्रकारांना क्लिप दाखवली.

गिरीश चोडणकर यांनी केले नाव उघड

महिलेवरील लैंगिक शोषण प्रकरणातील मंत्र्याचे नाव मिलिंद नाईक असे आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता मंत्री मिलिंद नाईक याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

मंत्र्याकडून करण्यात आलेल्या या लैंगिक शोषण प्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी प्राथमिक माहिती उघड करून या प्रकरणात गुंतलेल्या त्या मंत्र्यावर कारवाईची मागणी केली होती. तथापि, त्या मंत्र्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात गुंतलेल्या त्या मंत्र्याचे नाव उघड केले होते. तरीही, सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आता त्या मंत्र्याचे नाव जाहीररित्या उघड करावे लागत आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना सर्व माहिती देण्यात आली होती. त्या महिलेने पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवावी. त्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले होते. त्या मंत्र्याच्या दबावाखाली असलेली पीडित महिला मंत्र्याविरोधात तक्रार करायला पुढे येण्याची शक्यता नसल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

या प्रकरणाची अधिक वाच्यता करू नये म्हणून मुंबईतील एका कायदा कंपनीकडून आपल्याला नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच, सदर महिलेने बिहार पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली. सदर तक्रार गोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर मुरगाव पोलिसांनी कॉंग्रेस नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कॉंग्रेस पक्षाने पीडित महिला, मंत्र्याचे नाव उघड केले नव्हते. मग, पीडित महिला पोलिसांकडे कॉंग्रेस नेत्याविरोधात तक्रार कशी करू शकते, असा प्रश्‍न चोडणकर यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ः तानावडे
दरम्यान, मंत्र्याचा समावेश असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी त्या मंत्र्याचे नाव उघड करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केले होते.

तक्रार दाखल
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने समाज कल्याणमंत्री मिलिंद नाईक यांच्याविरोधात महिलेवरील लैंगिक शोषण प्रकरणी येथील महिला पोलीस स्थानकावर काल तक्रार दाखल केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील पुरावे व इतर माहिती महिला पोलीस स्थानकाच्या अधिकार्‍याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली. आमोणकर यांनी या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप, चॅट तसेच छायाचित्रे पत्रकार परिषदेत उघड केली आहेत.

संकल्प आमोणकरांविरोधात गुन्हा

मुरगाव पोलिसांनी कॉंग्रेसचे नेते संकल्प आमोणकर आणि इतर पाच जणांविरुद्ध बिहारमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून तिथे नोंद झालेल्या गुन्ह्यानंतर एफआयआर नोंदवला आहे.

राज्यातील एका मंत्र्याचे लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असतानाच बिहार राज्यातील बेट्टीया गावातील पोलीस स्थानकात एका महिलेने तक्रार देऊन गोव्यातील गोवा प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, यशवंत घोणसेकर, सोनू ऊर्फ प्रज्योत वेंगुर्लेकर, दामोदर दिवकर यांच्याविरोधात पैशांचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करत त्याचे शूटिंग केल्याची तक्रार बिहार पोलिसांत दाखल केली होती.

मंगळवार दि. १४ रोजी रात्री १०:३० वाजता सदर तक्रार मुरगाव पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर मुरगाव पोलिसांनी वरील संशयितांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.