लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

0
18

भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी (७५) यांच्यावर काल अमेरिकेत प्राणघातक हल्ला झाला. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यानापूर्वी स्टेजवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

व्याख्यानावेळी हल्लेखोराने स्टेजवर चढत सलमान रश्दी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यात रश्दी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हवाई रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्टेजवरील अन्य एका व्यक्तीवरही हल्लेखोराने वार केले. त्यात ती व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही प्रत्यक्षदर्शींनी सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी त्याने रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार केल्याचे दिसत आहे.

हल्लेखोराला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली असून, त्याचे वय २५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हल्ला का केला किंवा कोणाच्या आदेशावर हा हल्ला केला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला असून, गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारखी पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रश्दी यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या कांदबर्‍या तसेच त्यामुळे निर्माण होणार्‍या वादांमुळे रश्दी नेहमी चर्चेत असतात.
सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीवर भारतासह अनेक देशांमध्ये बंदी आहे. या कांदबरीमध्ये रश्दी यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप होता. या पुस्तकाचे शीर्षक एका विवादित मुस्लिम परंपरेबद्दल आहे.