Home Featured लेकव्ह्यू कॉलनीच्या तलावातील मासे मृत्यूमुखी

लेकव्ह्यू कॉलनीच्या तलावातील मासे मृत्यूमुखी

0

सांतइनेज खाडीतील सांडपाणी तलावातील पाण्यात मिसळल्याचा दावा

मळा-पणजी येथील तळ्यातील मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना ताजी असतानाच आता, कांपाल-पणजीतील लेकव्ह्यू कॉलनीच्या तलावातील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.
पणजी महानगरपालिकेला एका बाजूने स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूने पारंपरिक जलस्रोतांतील जलप्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे.

मळा पणजी येथील तळ्यातील मासे मृतावस्थेत आढळून आल्याने प्रशासनाला जाग आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मळा तळ्यातील प्रदूषणाची गंभीर दखल घेतल्यानंतर साफसफाई हाती घेण्यात आली. मळा तळ्यातील प्रदूषणामुळे प्राणवायूचे प्रमाण घटल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले होते.

आता, कांपाल येथील लेकव्ह्यू तलावातील मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, अशी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आहेत. हा तलाव सांतइनेज खाडीला जोडलेला असून, खाडीतून वाहणारे सांडपाणी तलावातील पाण्यात मिसळल्याचा दावा केला जात आहे. तलावातील प्रदूषणामुळे ऑक्सिजनची पातळी घटल्याने मासे मृत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहरातील जलस्रोतांमध्ये मासे मरण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त केली असून, यामागील कारणांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवाह, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची कमी पातळी किंवा इतर पर्यावरणीय घटक यासाठी जबाबदार आहेत का, हे निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महानगरपालिका क्षेत्रातील तलावावर नियमित देखरेख ठेवण्याची आणि पर्यावरणाचा पुढील ऱ्हास रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रशासनाकडून पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून मासे मरण्याचे नेमके कारण शोधले जाण्याची शक्यता आहे.

कांपाल येथील तलावातील मासे मृत झाल्याची माहिती मिळताच पणजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्यातील मृत मासे काढण्याचे आणि तलाव स्वच्छ करण्याचे काम सुरू केले.