प्रश्न : गेल्या ५ वर्षांत खात्याचे नाव अत्यंत बदनाम झाले याची तुम्हाला कल्पना असलेच. गोव्यात कुठेही जा कंत्राटदारांकडून दलाली कशी गोळा केली जायची, याच्या सुरस गोष्टी अजूनही ऐकायला येतात.
उत्तर : गेल्या ५ वर्षांत या खात्याची खूप बदनामी झाली हे व्यक्तीश: मलाही मान्य आहे. मात्र, खात्रीने सांगतो यापुढे हे चालू देणार नाही. मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच भ्रष्टाचार व गैरवर्तन करणार्या अभियंत्यांना तंबी देण्यात आली. गैरवर्तन करू नका, कार्यपध्दती बदला व सहकार्य करा अशी सूचना त्यांना करण्यात आलेली असून तरीही जे सुधारत नाहीत त्याना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल.
शिवाय पुढील आठवड्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर एक बैठक घेणार असून भ्रष्टाचारात बरबटलेल्या व एका विभागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ ठिय्या मांडून बसलेल्या अभियंत्यांच्या बदल्या करण्यात येतील. नुकतीच मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची बैठक घेतली. खात्याचा कारभार रुळावर आणण्यास त्यांना आठ दिवसांचा अवधी दिला आहे. साध्या पाण्याच्या जोडण्या देण्यासाठी अभियंते लांच खात असल्याच्या तक्रारी होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ ३ दिवसांतच मी हा भ्रष्टाचार बंद पाडला. पाण्याच्या जोडण्या देण्यासाठी जर अभियंते पैसे मागत असतील तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अथवा माझ्याकडे तक्रार करावी.
मोठ्या प्रमाणात पाण्याची बिले पडून असून ती लवकरात लवकर वसूल करण्याचे आदेश अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बिलाची संख्या जर मोठी असेल व एखादी व्यक्ती एकदम संपूर्ण बिल फेडू शकत नसेल तर हप्त्यात बील फेडण्याची सुविधा त्यांना द्यावी, असेही त्यांना बजावण्यात आले आहे.
प्रश्न : जुवारी नदीवरील पूल जुना झालेला असून तो कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे.
उत्तर : २००२-२००७ या दरम्यान मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असताना मी या पुलाचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. आता मात्र पुलासाठीची प्रक्रिया तीन महिन्यात सुरू करून ३ वर्षांत जुवारीवर समांतर पूल उभा केला जाईल. शिवाय गालजीबाग व बोरी येथेही पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.
प्रश्न : आणि राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ एच्या चौपदरीकरणाचे काय?
उत्तर : २५ ते ३० मीटर एवढी रुंदी ठेवून वरील दोन्ही महामार्ग उभारले जातील. शिवाय या महामार्गांवर दुचाकी गाड्यांसाठी अडीच मीटरची वेगळी लेन तयार करण्यात येईल. दुचाकींना मोठ्या प्रमाणात अपघात होऊन चालक ठार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी ही वेगळी लेन आवश्यक आहे.
प्रश्न : टोल भरण्यास लोकांचा विरोध आहे त्याचे काय?
उत्तर : लोकांचा विरोध आहे अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करणार नाहीत. महामार्गांच्या देखभालीवर मोठा खर्च येत असतो. त्यासाठी टोल आकारला जातो. या देखभालीवर जो १०-१२ टक्के खर्च येणार आहे तो सरकारी तिजोरीतून केला जाईल. त्यापेक्षा जर जास्त काही खर्च येत असेल तर जनतेकडून निश्चितच सहकार्य मिळू शकेल. बेळगाव ते पणजी या संमत झालेल्या महामार्गाचे कामही हाती घेण्याचा विचार आहे.
प्रश्न : उत्तर गोव्यात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्य आहे? त्याबाबत काय करणार आहात?
उत्तर : फोंडा व तिसवाडी तालुक्यासाठी जवाहरलाल नेहरू शहर विकास योजनेखाली २५ एम्एल्डी पाण्याची तर आणखी २५ एम्एल्डी पाण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेखाली सोय केली जाईल. ५० एम्एल्डी पाणी म्हादई नदीतून तर आणखी १०० एम्एल्डी तिळारी प्रकल्पातून मिळवण्यात येईल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटू शकेल.