लाच दिल्याची माहिती देऊनही सीबीआय, ईडीकडून तपास नाही

0
41

>> राफेलप्रकरणी मीडियापार्ट नियतकालिकाचा दावा

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी फ्रान्सच्या ‘दसॉल्ट एव्हिएशन’ने ७.५ दशलक्ष युरो (६५ कोटी रुपये) एवढी लाच दलालाला दिली होती. यासाठी कंपनीने खोट्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र याबाबत माहिती देऊनही भारतीय तपास संस्था सीबीआय आणि ईडी यांनी त्याबाबत तपास केला नसल्याचा खळबळजनक दावा फ्रान्समधील मीडियापार्ट या ऑनलाइन नियतकालिकेने केला आहे.

भारताने दसॉल्ट एव्हिएशनकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी करार केला असून त्यासाठी ५९ हजार कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फ्रान्सच्या नियतकालिकेने केला आहे. नियतकालिकेने दावा केला आहे की, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी सुशेन गुप्ता नावाच्या दलालाला ६५ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यासाठी बोगस कंपन्या, संशयास्पद करार आणि बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला. राफेल व्यवहारामध्ये भ्रष्टाचार आणि पक्षपाताच्या आरोपांच्या चौकशीसाठी फ्रान्समध्ये एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली होती.

ऑगस्टा-वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स पुरवठा घोटाळ्याच्या चौकशीतून याप्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे सीबीआय आणि ईडीच्या हाती लागली होती, असा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणात सुशेन गुप्तावर लाच घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, राफेल करारासाठी २०१३ पूर्वी ६५ कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, असा दावा भाजपचे संबित पात्रा यांनी केला. हा सौदा कोणाच्या सरकारमध्ये झाला हे आता समोर आले असून २००७ ते २०१२ दरम्यान झालेल्या राफेल सौद्यात ही लाच देण्यात आली होती, असा आरोप पात्रा यांनी केला आहे.