भूखंडाची विभागणी करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप असलेले केपे मामलेदार कार्यालयातील तलाठी सुभाष अर्जुन वेळीप यांच्याविरुद्ध काल दक्षता खात्याने आरोपपत्र दाखल केले. रावणफोंड-नावेली येथील दिलीप हेगडे यांनी यासंबंधी तक्रार नोंदवली होती. भूखंडाची विभागणी करण्यासाठी वेळीप यांनी आपणाकडे ५ हजार रु. ची मागणी केल्याची तक्रार हेगडे यांनी २९ नोव्हेंबर २०१० रोजी केली होती. पैसे दिल्यास काम लवकर करू असे वेळीप यांनी सांगितले होते. नंतर सापळा रचून वेळीप याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. यासंबंधीची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकार्यानी आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली. या प्रकरणी २५ साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात आलेली आहे.