लांच्छन!

0
19

गेले अडीच महिने मणिपूर धगधगते आहे. तेथील प्रचंड हिंसाचाराने अवघा देश हादरून गेला आहे. अशातच काही महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचा जो व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला, तो थरकाप उडवणारा आहे. त्या दुर्दैवी भगिनींचे घरदार जाळून, कुटुंबीयांना ठार मारून, मुलीवर सामूहिक बलात्कार करून, विवस्त्र करून ही धिंड काढली गेली. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्रः देवता’ असे सांगणाऱ्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे, तिच्या कुशीत जन्मलेल्या चारित्र्यवान महापुरुषांचे, थोर ऋषीमुनींचे, महान संतपरंपरेचे गोडवे आपण नेहमी अभिमानाने गात असतो. सर्वांत मोठी लोकशाही म्हणून जगात मिरवत असतो. अशा आपल्या देशामध्ये निरपराध आदिवासी स्त्रियांच्या नशिबी आज असे भोग यावेत? हे अधम कृत्य करणारी ही माणसे आहेत की हैवान? हा जमाव ‘जनावरांसारखा चालून आला’ अशी प्रतिक्रिया त्यातील एका महिलेच्या पतीने दिली आहे. तो स्वतः एक देशासाठी लढणारा सैनिक आहे. एकेकाळी द्रौपदीच्या आत्मसन्मानासाठी याच देशात महाभारत घडले होते. द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला, तर तिच्या हाकेला कृष्ण धावून गेला होता. येथे तर या महिलांना विवस्र करून धिंड काढली गेली. मणिपूरच्या या भगिनींच्या वेदनेला मात्र कोणी वाली नाही ही शोकांतिका आहे.
जी माहिती या प्रकरणात आतापर्यंत समोर आली आहे, तिची एकेक ओळ काळजाचे पाणी पाणी करून सोडते. ही घटना व्हिडिओमुळे समोर आलेली असली, तरी ती काही कालपरवा घडलेली नाही. प्रत्यक्षात हा प्रकार घडला 4 मे रोजी. हजारोंचा जमाव आदिवासी जमातीचे गाव जाळायला निघाला. पोलिसांच्या मदतीने गावाबाहेर पडू पाहणाऱ्या या महिलांना अडवून विवस्त्र केले गेले. त्यातल्या सर्वांत छोट्या, अवघ्या 21 वर्षांच्या मुलीला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला वाचवायला गेलेल्या तिच्या 19 वर्षांच्या छोट्या भावाला, वडिलांना ठार मारण्यात आले. आणि एवढे सगळे झाल्यानंतर या महिलांची, मुलीची नग्नावस्थेत धिंड काढली गेली, त्याचा व्हिडिओ बनवला गेला. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या भगिनींची ही विटंबना, सदर घटना घडल्यापासून तब्बल 77 दिवसांनी केवळ या व्हिडिओमुळे जगासमोर आली आहे. मणिपूरमध्ये इंटरनेट बंद आहे हे याचे एक कारण असेल, परंतु राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेलाही या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटू नये, आरोपींपर्यंत पोहोचता येऊ नये, हे विलक्षण आश्चर्यकारक आहे. परवा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधानांनी मणिपूरमधील या घटनेबद्दल आपला रोष अतिशय तीव्र शब्दांत व्यक्त केला, तेव्हा कुठे या जमावातील केवळ चौघांच्या मुसक्या आवळल्या गेल्या, परंतु तोवर केंद्र आणि राज्य सरकार कुठे होते? का गप्प होते?
वास्तविक या महिलांनी एवढा अत्याचार सोसूनही पोलिसांत जाण्याचे, तक्रार करण्याचे धैर्य दाखवले होते. त्यांनी पोलिसांत तक्रार केली 18 मे रोजी. प्रत्यक्षात पोलिसांनी एफआयआर नोंदवला 21 जूनला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा देशभरातून संतापाचा लाव्हा उफाळला, तेव्हा कुठे परवा पोलिसांनी चौघाजणांच्या मुसक्या आवळल्या. मणिपूरमध्ये हे कसले प्रशासन आहे? हे कसले नामर्दांचे सरकार आहे? एखाद्या विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात हे घडले असते, तर भारतीय जनता पक्षाने सगळ्या देशभरात आंदोलनांची राळ उडवून दिली असती. पण तेथे स्वतःचेच सरकार असल्याने मणिपूरबाबत सगळे मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत. वास्तविक ज्या तऱ्हेने मणिपूर गेले अडीच महिने जळते आहे, ते पाहता तेथील एन. बिरेन सिंग सरकार बरखास्त करून एव्हाना तिथे राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी होती. विरोधकांची सत्ता असती तर हे कधीच घडले असते. काल गोवा विधानसभेमध्ये बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून आपली निष्ठा व्यक्त करण्याची केविलवाणी धडपड भाजपा आमदारांनी केली. पण संपूर्ण देश संतापाने धगधगत असलेल्या मणिपूरमधल्या या महाभयानक प्रकारावर चर्चा झाली असती, तर ते अधिक उचित दिसले असते. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे 12 जून रोजी तक्रार केली गेली होती, पण हा आयोगही आजवर चिडीचूप बसला. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत दीडशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो बेघर झाले आहेत, कोट्यवधींच्या मालमत्तेची नासधूस, जाळपोळ, लुटालूट झाली आहे. हे सरळसरळ अराजक आहे. मणिपूरच्या घटनांमुळे अवघ्या जगात आज भारताची छीः थू होते आहे. हे कृत्य विकृत, बीभत्स आणि अमानुष तर आहेच, पण प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली घालायला लावणारे आहे. विश्वगुरू बनायला निघालेल्या या देशावरील हे लांच्छन आहे!