लहानपण दे गा देवा!

0
221
  • अनुराधा गानू
    (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)

असंच असतं हे बालपण स्वच्छंद, मनमोकळं, सूर्यप्रकाशाइतकं लख्खं, निरागस. मनात कसली अढी नाही, राग नाही, स्पर्धा नाही. मत्सराचा तर लवलेशही नाही. फार सुंदर, फार पवित्र! म्हणून तर मुलांना ‘देवाघरची फुलं’ म्हणतात.

‘बालपणीचा काळ सुखाचा….’, ‘लहानपण दे गा देवा…’ अशा कवितांच्या ओळी आपण शाळेत असताना वाचायचो. तेव्हा वाटायचं, लहानपण का मागतात लोक देवाकडे? कोण म्हणतो बाळपणीचा काळ सुखाचा असतो म्हणून? तेव्हा मी तरी ‘देवा मी मोठी कधी होणार?’.. असंच म्हणायची. पण माणूस वयानं जसजसा मोठा होत जातो, तेव्हा मात्र बालपणाची फार तीव्रतेने आठवण होते आणि मग वाटतं… लहान होतो तेच बरं होतं. पाहिजे ते करण्याचे दिवस असतात ते. काहीही केलं तरी फारसं कुणी रागावत नाही, अगदी कोणाची लाज काढली तरी..! लहान आहे असं म्हणून सोडून देतात सगळे.

खरंच, आज ७५व्या वर्षीसुद्धा वाटतं, आत्ता सुद्धा होता आलं तर ७० वर्षे मागं जावं आणि परत लहान होऊन आईच्या कुशीत शिरून निवांत झोपावं. वडलांच्या कडेवर बसून पार्कमध्ये फिरून यावं. पण असं मागून ते बालपण पुन्हा थोडंच मिळणार आहे! कारण हा काळ फिरून मागे जात नाही ना! तो सतत पुढे पुढेच धावत असतो. एकदा मोठं झालं की आठवायच्या त्या बालपणीच्या घटना. माझे एक काका होते, ते माझ्या लहान मुलाला नेहमी सांगायचे, ‘‘अरे, आत्ताची चार वर्षे फक्त तुझी आहेत. तुला पाहिजे तसं वाग. तुझ्या मनासारखं सगळं करून घे आत्ताच! यानंतर शिक्षक आणि नंतर बायको… एकदा मागे लागले की मग खरं नाही रे बाबा काही. तुझी सुटकाच नाही यातून’’. खरंच म्हणत होते ते. मुलगा काय किंवा मुलगी, एकदा बालपणीची चार वर्षे संपली की शाळा, शिक्षण, शिक्षक आणि नंतर नवरा किंवा बायको- संसार हे सगळं मागे लागलं की वर्षे कशी सरत जातात ते कळतही नाही. आतासुद्धा एकटं बसलं की लहानपण आठवतं आणि खूप छान वाटतं. एकदम ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं आणि तासन्‌तास त्यात मन रमून जातं.
लहानपणीचं ते पावसात भिजणं, कुठेतरी साचलेल्या पाण्यात कागदाच्या बोटी सोडणं, मग दुसर्‍या मुलांबरोबर केलेली बोटींची चढाओढ.. कित्ती कित्ती मजा यायची! पावसात भिजलं तर आपण कशाला काळजी करायची? मोठी माणसं असतात ना घरात! भिजलेलं डोकं पुसायला आई असतेच की. आपण मस्त मनसोक्त हुंदडायचं. हां, आई फार तर एखादा धम्मक लाडू देईल. पण त्या लाडवाची गोष्ट पाच मिनिटात विसरायला होते. किंबहुना कुणीही रागावलं तरी लहान मुलं पटकन् विसरून जातात. आम्हीही लहान असताना दुपारच्या भरउन्हात अख्खा वाडा फिरत राहायचो. दुपारभर वाड्यात आम्हा मुलांचा नुसता धुडगूस असायचा. दुपारी कोणाची झोपमोड होईल का? कुणाला त्रास होईल का?…हे प्रश्‍न लहानपणी डोक्यात येतच नाहीत. खेळणं, भांडणं, मारामार्‍या, धडपडणं, खरचटणं… सगळं सगळं होत असे पण लहानपणी त्याची फिकिर कोणाला असते? कोणी ओरडलंच तर ५ मिनिटे खेळ थांबवायचा आणि परत सुरू. कधी मनासारखं झालं नाही तर मोठं भोकाड पसरायचं. खरं म्हणजे आपल्याकडे दुसर्‍याचं लक्ष वेधून घ्यायची ती एक युक्तीच असते म्हणा ना! आणि माहीतच असतं की एकदा मोठा गळा काढला की मनासारखं होतंच होतं. पण मोठं झाल्यावर अशी नाटकं केलीत तर .. कुणीसुद्धा विचारणार नाही आपल्याला!
आमच्या वाड्यात एक आयुर्वेदिक डॉक्टर रहायच्या. त्यांना आम्ही सगळी लहान मुलं डॉक्टर मावशीच म्हणायचो. त्यांच्या घरातल्या ठोक्याच्या घड्याळांतून दर अर्ध्या तासाला एक ठोका पडायचा आणि एक चिमणी बाहेर यायची… अगदी एकच क्षण आणि परत आत जायची. ती बघायला आम्ही मुलं खूप वेळा त्यांच्याकडे जायचो. चिमणी येऊन गेली की आमच्या हातावर कधी खोबर्‍याची वडी, कधी श्रीखंडाची तर कधी लिमलेटची गोळी पडायचीच. ती हातावर पडली की आम्ही बाहेर. खरं तर हा सगळा खाऊ आम्हाला घरी मिळत नव्हता का? मिळत होता. पण तरी मावशींकडे खाऊ हातावर पडेपर्यंत आम्ही तिथेच घुटमळत राहायचो. पण या हावरटपणाची आम्हाला कधी लाज नाही वाटली. हेच ते बालपण!

लहानपणी वाढदिवस म्हटला की किती अपूर्वाई! लहान मुलं त्यांना पाहिजे त्या लोकांना वाढदिवसाला बिनदिक्कत बोलावून येतात. शिवाय भेटवस्तू काय देणार हेही विचारतात. भेटवस्तू मिळाल्या मिळाल्या लगेच सगळ्यांसमोर उघडूनही बघतात. आवडलं नाही तर लगेच आवडलं नाही म्हणून सांगून टाकणार. इतकंच नव्हे तर पुढच्या वेळी काय आणावं हेही सांगून मोकळे. यालाच म्हणतात- बालपण! मला पुसटसं आठवतंय… मी माझ्या आईला सारखी म्हणायची, ‘मला शहाणी म्हण’. मग आई म्हणायची, ‘‘चांगली दीड शहाणी आहेस’’. मग परत हट्ट.. ‘‘दीड नको… नुसती शहाणी म्हण’’. शहाणी नसताना ‘शहाणी म्हण’ हा कसला हट्ट? पण.. असं असतं बालपण!

पण हळुहळू मोठं होता होता हे बालपण कधी संपतं कळतंच नाही. मग सुरू होतात ते मान-अपमान. दुसर्‍याशी बोलताना कोणाचा अपमान होत नाही ना, कोणी दुखावलं जात नाही ना… हाही विचार करावा लागतो. इतकंच काय मोठं होता होता आपला इगो जागृत होतो. जरा कोणी काही म्हटलं की आपण दुखावतो आणि ते लहानपणासारखं पटकन विसरलंही जात नाही. तेव्हा आपल्या लक्षात येतं.. अरे, आपण आता लहान नाही राहिलो!
खरंय, लहानपण हे किती स्वच्छंद असतं… उडणार्‍या फुलपाखरासारखं! असंच असतं हे बालपण स्वच्छंद, मनमोकळं, सूर्यप्रकाशाइतकं लख्खं, निरागस. मनात कसली अढी नाही, राग नाही, स्पर्धा नाही. मत्सराचा तर लवलेशही नाही. फार सुंदर, फार पवित्र! म्हणून तर मुलांना ‘देवाघरची फुलं’ म्हणतात. आणि मोठं झाल्यावर मग आपल्याला म्हणावंसं वाटतं… ‘लहानपण दे गा देवा!’ पण… काय उपयोग!!