ज्युनियर ग्रेड अधिकारी परीक्षा ः एक अवलोकन

0
128
  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई

ज्युनियर ग्रेड अधिकारी हा सरकारी प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा असतो. सर्वसामान्य नागरिक तसेच सरकार यांच्यामध्ये एक सुंदर बॉंडिंग घडवून आणणे ही त्याची महत्त्वाची भूमिका असते. गोव्याच्या सर्व तरुणांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी या नोकरी संबंधातील स्पर्धा परिक्षेची तयारी अगदी मन लावून करावी.

गोवा लोकसेवा आयोग १९८८ साली स्थापन झाला. भारतीय संविधानाच्या कलम ३१८ नुसार सरकारच्या ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीच्या कर्मचार्‍यांची (अधिकारी) नेमणूक करण्यासाठी तसेच अन्य नोकरशाहीची पदोन्नती करण्याचे विशेष काम लोकसेवा आयोग करते. ३० मे १९८७ रोजी गोवा राज्य झाल्यानंतर ही सर्व कामे आयोगातर्फे वेळोवेळी केली जातात. गोवा लोकसेवा आयोगाच्या वतीने सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाणारी परीक्षा म्हणजे ‘ज्युनियर ग्रेड अधिकारी परीक्षा’ होय. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये ‘अ’ श्रेणीच्या नियुक्त्या या समान प्रवेश परिक्षेद्वारे केल्या जातात. राज्याचे प्रशासन सुरळीतरीत्या किंवा योग्य दिशेने चालण्यासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या वेळोवेळी होत असतात. गोवा प्रशासनातल्या विविध खात्यातल्या जवळ जवळ १०० अधिकार्‍यांच्या जागा गोवा लोकसेवा आयोगातर्फे नियुक्त केल्या जातात. त्यामध्ये विविध प्रकारच्या पदांवर नेमणूक केली जाते… जसे अवर सचिव (अंडर सेक्रेटरी), उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर), खास भूसंपादन अधिकारी (स्पेशल लँड ऍक्विझिशन ऑफिसर) … इत्यादी. परिक्षेचे नियम आणि अटी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
वयोमर्यादा ः ४० वर्षांपेक्षा कमी असावी.
सरकारी कर्मचारी आणि वेगवेगळ्या जातीजमातींसाठी वयाची अट एका खास आदेशाद्वारे सरकार निर्देशित करते. पण उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे.

शैक्षणिक पात्रता ः परिक्षार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा स्नातक असणे गरजेचे आहे. स्नातक हा कला, वाणिज्य, विज्ञान तसेच अन्य कोणत्याही विषयांमध्ये असू शकतात. त्याशिवाय परिक्षार्थी हा विदेशी विद्यापीठाचा स्नातक असू शकतो. मग त्याला केंद्र सरकारची मान्यता प्राप्त असणे बंधनकारक आहे. अथवा त्याच्याकडे मान्यताप्राप्त राज्य किंवा केंद्र सरकारने निर्देशित केलेली पात्रता असणे गरजेचे आहे.

कोकणी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य मिळू शकते. सर्व पात्र परिक्षार्थींना एक समान परिक्षेला सामोरे जावयाचे असते. त्याला ‘स्क्रिनिंग टेस्ट’ असे म्हणतात. गोवा लोकसेवा आयोगाने आता सी.बी.आर.टी.- कम्प्युटर बेस्ड रिक्रूटमेंट टेस्ट घेणे सुरू केले आहे. त्यामध्ये ७५ प्रश्‍न ७५ मिनिटांत सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्‍नाला चार पर्याय दिलेले असतात. या पद्धतीला ‘मल्टीपल चॉइस क्वश्‍चन्स’(एम.सी.क्यू.) असे म्हणतात. परिक्षार्थीला उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये गुण मिळवावे लागतात. त्यात सर्वसामान्य वर्गाच्या मुलांना ६५% गुण मिळवणे गरजेचे असते. ओबीसी किंवा दिव्यांग गटातल्या मुलांना ६०% गुण मिळणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे मागास जातींसाठी ५५% गुण मिळणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीमध्ये परिक्षार्थींना दुसर्‍या फेरीत २५० गुण असलेल्या परिक्षेला सामोरे जावे लागते. चार वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका त्यांना सोडवायच्या असतात. पहिली प्रश्‍नपत्रिका तीन भागात विभागलेली असते. ‘अ’ भागात सामान्य बुद्धिमत्ता, गुणात्मक संख्या आणि रिझनिंग या विषयांवर ५० गुण असतात. त्याला ६० मिनिटांचा अवधी दिला जातो. ‘ब’ भागात भारतीय संविधान, सामान्य प्रशासन आणि राज्य व्यवहार यावर ७५ गुणांचे प्रश्‍न असतात जे १२० मिनिटांच्या अवधीत सोडवायचे असतात. ‘क’ भागात सामान्य ज्ञान आणि सध्याच्या जगातल्या घडामोडी ७५ गुणांसाठी १२० मिनिटांच्या अवधीत सोडवण्यासाठी प्रश्‍न दिलेले असतात. पेपर-२ मध्ये ‘ड’ भागात इंग्रजी विषयाचे परिक्षण केले जाते. त्याला ५० गुण आणि ९० मिनिटांचा अवधी दिला जातो. या परिक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम गोवा सरकारच्या राजपत्रात सिरीज-१, क्रमांक २७- दिनांक ०३ ऑक्टोबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेले आहे आणि परीक्षार्थी ते ुुु.सेरिीळपींळपसिीशीी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर बघू शकतात.
या परिक्षेसाठी कमीत कमी उत्तीर्ण प्रतिशत गुण मिळणे आवश्यक आहे. हे गुण त्यांना स्पर्धा लेखी परिक्षेमध्ये मिळवणे आवश्यक आहे. सर्वसामान्य श्रेणीसाठी ६५% गुण तर ओबीसी आणि दिव्यांग श्रेणीसाठी ६०% गुणांची अट आहे. मागास जाती परिक्षार्थींना ५५% गुण मिळणे आवश्यक आहे.

पर्सनॅलिटी टेस्ट (व्यक्तिमत्व चाचणी) – हा परिक्षेचा तिसरा स्तर असतो. लोकसेवा आयोगातर्फे रिक्त जागांच्या संख्येच्या पाच पटीत परिक्षार्थींना व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावण्यात येते. उदा. पाच पदांवर उमेदवार घ्यायचे असतील तर २५ उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणीकरिता बोलावले जाते. ही चाचणी ४० गुणांची असते, ज्यात उमेदवाराला ५०% म्हणजे २० गुण मिळवणे अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षा(२५०गुण) तसेच व्यक्तिमत्व चाचणी (४० गुण) मिळवून एक गुणवत्ता यादी (मेरीट लिस्ट) तयार केली जाते. यात सर्वसामान्य गटातल्या ६५% गुण तसेच ओबीसी आणि दिव्यांगांना ६०% आणि एससी परिक्षार्थींना ५५% गुण मिळणे आवश्यक असते. यानुसार परिक्षेचा निकाल ठरवला जातो.

गोवा लोकसेवा आयोगातर्फे राज्य सरकारच्या कार्मिक खात्याला यशस्वी परिक्षार्थींची यादी पाठवण्यात येते. राज्य सरकारच्या निर्णयानंतर या उत्तीर्ण उमेदवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये सेवेत नियमित केले जाते. त्याशिवाय त्यांना ओल्ड गोवा येथे स्थित जी.आय.पी.ए.आर.डी.- गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रूरल डेव्हलपमेंट-मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात येते. त्यात प्रशासनाच्या वेगवेगळ्या प्रणालीसंबंधीची माहिती देऊन शिक्षित करण्यात येते. ज्युनियर ग्रेड अधिकारी हा सरकारी प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा असतो. सर्वसामान्य नागरिक तसेच सरकार यांच्यामध्ये एक सुंदर बॉंडिंग घडवून आणणे ही त्याची महत्त्वाची भूमिका असते. गोव्याच्या सर्व तरुणांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी या नोकरी संबंधातील स्पर्धा परिक्षेची तयारी अगदी मन लावून करावी व त्यात सुयश संपादन करून राज्याला एक कुशल प्रशासक मिळवून द्यावा. सर्व बाबींनी उत्तम असलेली गोवा नागरी सेवा आज राज्याला नवा मार्ग देऊ शकेल.

राज्य सेवेतील हेच अधिकारी पुढे पदोन्नती मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय.ए.एस.- इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसमध्ये पदार्पण करू शकतात. आणि अशा प्रकारे केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांना आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेऊन प्रशासनात नवीन कार्यक्षमता निर्माण करावी. दरवर्षी ९ जानेवारी रोजी गोवा नागरी सेवा अधिकारी दिवस साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे २१ एप्रिल हा दिवस केंद्रीय नागरी सेवा दिवस साजरा करून प्रशासकीय अधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येते. राज्यात मुख्य सचिव तसेचअखिल भारतीय पातळीवर कॅबिनेट सचिव ही पदे सर्वांत श्रेष्ठ आहेत. सर्वांत ज्येष्ठ अधिकारी ही पदे भूषवितात. भारतीय नागरी सेवा (आय.सी.एस.) आता भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.) झाली आहे. ‘स्वराज्य’ हे खर्‍या अर्थाने देशात नांदायचे असेल तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना आज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही आजच्या २१व्या शतकाची महत्त्वाची गरज आहे.