लसिथ मलिंगाला डच्चू, अँजेलो मॅथ्यूज जायबंदी

0
113

पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला वगळले आहे. १३ रोजी दुबईतील सामन्याद्वारे या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुखापतीमुळे अँजेलो मॅथ्यूज या मालिकेला मुकणार आहे. ‘२०१९’ विश्‍वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवून संघबांधणी करण्याच्या उद्देशाने मलिंगाला बाहेर ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

जून महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केल्यानंतर मलिंगाने १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ६ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध खेळलेला टी-२० सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. पुनरागमनानंतर मलिंगाच्या गोलंदाजीतील धार बोथट झाल्याचे दिसून आले आहे. संघात परतल्यानंतर ६२.३०च्या सरासरीने, सहापेक्षा जास्तच्या इकॉनॉमीने त्याला केवळ १० बळी घेता आले आहेत. त्याच्या पोटाचा घेरदेखील वाढल्याने तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे निवड समितीला जाणवले आहे. त्यामुळे वेळीच त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. सराव सत्राला दांडी मारणे तसेच बेशिस्तीच्या कारणास्तव श्रीलंका क्रिकेट मंडळाने सलामीवीर दनुष्का गुणथिलका याला ६ एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ४२.४१ची उत्तम सरासरी असतानादेखील पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही. चायनामन लक्षन संदाकन याच्या जागेवर लेगस्पिनर जेफ्री वंदेरसे याचे संघात पुनरागमन झाले आहे.

श्रीलंका संघ ः उपुल थरंगा, दिनेश चंदीमल, निरोशन डिकवेला, लाहिरु थिरमाने, कुशल मेंडीस, मलिंदा सिरीवर्धने, चामरा कापुगेदरा, थिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, नुवान प्रदीप, सुरंगा लकमल, दुष्मंथ चमीरा, विश्‍वा फर्नांडो, अकिला धनंजया व जेफ्री वंदेरसे.