अतिरिक्त 325 एमएलडी पाणी मिळणार; सध्या पाण्याची मागणी आणि पुरवठ्यात किंचित फरक
राज्यात सध्या 695 एमएलडी एवढ्या पेयजलची मागणी असून, 675 एमएलडी एवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात सरकारला यश आलेले आहे. सध्या काम चालू असलेले जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त 325 एमएलडी एवढ्या पेयजलाचा पुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती काल पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिली.
काल प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा व वीरेश बोरकर यांनी एकत्रितपणे विचारलेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू
राज्यातील पेयजलासाठीची जलवाहिनी ही 6 हजार किलोमीटर एवढ्या लांबीची आहे आणि त्यापैकी सुमारे 2 हजार किलोमीटर एवढ्या लांबीची जलवाहिनी ही 40 वर्षांपूर्वींची आहे. त्यामुळे ही वाहिनी अधूनमधून फुटण्याच्या घटना घडत असल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याचे सुभाष फळदेसाई म्हणाले. त्यापैकीची 217.08 किलोमीटर एवढी जलवाहिनी बदलण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी टीका करताना युरी आलेमाव यानी गोवा सरकारची ‘हर घर जल’ योजना फसली असल्याचा आरोप केला, तर व्हेन्झी व्हिएगस यांनी गोव्यात कुणालाही 24 तास पाणी मिळत नसल्याचा आरोप केला. वीरेश बोरकर, क्रूझ सिल्वा, कार्लुस फेरेरा यांनीही पेयजल पुरवठ्यावरुन सरकारवर टीका केली.
सुभाष फळदेसाई काय म्हणाले?
ाज्यातील 26 टक्के लोकांना सध्या पेयजलाचा 24 तास पुरवठा होत आहे.
पेयजलाद्वारे सध्या राज्याला 200 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे.
तसेच पुरवठा होत असलेल्या पेयजलापैकी 40 टक्के पेयजलाचा महसूल बुडत आहे.
जलवाहिन्या फुटत असल्यामुळे वाया जाणारे पाणी, पाण्याची केली जाणारी चोरी आदींमुळे नुकसान होते.
30 ते 50 टक्के एवढ्या नळजोडण्यांना डिजिटल मीटर बसवल्यास पाणी महसूलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सुमारे 60 हजार पाणी मीटर हे बंद आहेत.