कोरोनाशी महिनाभर चाललेली झुंज निष्फळ
>> शोकाकुल चाहत्यांच्या उपस्थितीत मुंबईत अंत्यसंस्कार; पंतप्रधानांकडून अंत्यदर्शन
जगविख्यात गायिका गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत ब्रीच कँडी इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना निधन झाले.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर काल संध्याकाळी ७.१५ वाजता त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून लतादीदींचे अंत्यदर्शन घेतले. लतादीदींचे बंधू पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या प्रिय भगिनीच्या पार्थिवास मुखाग्नी दिला.
आशा भोसले, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी समस्त मंगेशकर कुटुंबीयांबरोबरच सचिन तेंडुलकर, शाहरूख खान, श्रद्धा कपूर आदींसह लतादीदींच्या हजारो चाहत्यांची यावेळी उपस्थिती होती.
गेल्या ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांना लागलीच ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गेला महिनाभर त्यांची कोरोनाने निर्माण केलेल्या शारीरिक गुंतागुंतीमुळे मृत्यूशी झुंज सुरू होती. ब्रीच कँडी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागातील डॉ. प्रतीत समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याची शर्थ केली. मात्र, त्यांना त्यात यश येऊ शकले नाही. गेल्या आठवड्यात लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, परंतु नंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे शनिवारी सकाळी त्यांना पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते.
कोरोनाबरोबरच त्यांना न्युमोनियाचीही बाधा झाली होती.
काल संध्याकाळी त्यांचे पार्थिव पेडर रोडवरील प्रभुकुंज या राहत्या घरातून दादरच्या शिवाजी पार्कवर लष्करी वाहनाने आणण्यात आले. तेथे दोन हजार चौरस फूट परिसरामध्ये अंत्यदर्शन व अंत्यसंस्कारांसाठी खास व्यवस्था उभारण्यात आली होती. काल दुपारी एक वाजल्यापासूनच लोकांची तेथे रीघ लागली होती. संध्याकाळी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
संध्याकाळी थेट शिवाजी पार्कवर येऊन लतादीदींचे अंत्यदर्शन घेऊन पंतप्रधानांनी त्यांना पुष्पचक्र वाहिले. मुंबई विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
प्रेमळ लतादीदी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्याने देशात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
केंद्र व राज्य सरकारतर्फे दुखवटा
केंद्र सरकारने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मृत्युमुळे देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. मनोरंजनाचा कोणताही शासकीय कार्यक्रम या काळात होणार नाही. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ दुखवटा जाहीर केला असून सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. गोवा सरकारने गोमंतकन्या लता मंगेशकर यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे, तर कर्नाटक सरकारनेही दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.