विशेष संपादकीय – मंगेशाचे लेकरू

0
97

मंगेशाच्या पिंडीवरचे बेलाचे पान काल गळाले. गोव्याचे एक भाबडेे लेकरू मंगेशाच्या चरणी विसावले. लता मंगेशकर नावाची स्वरवेल काल सूर्य मावळता मावळता अनंताच्या महायात्रेला निघाली. खरोखरीचा सूर्यास्त झाला. दीदी देहाने गेल्या, पण भाषा, प्रांत, प्रदेश आणि संस्कृतींच्या सीमा पार करून केव्हाच विश्वव्यापी झालेला, दशदिशांत भरून राहिलेला त्यांचा दैवी स्वर आपल्यातून जाईल कसा? ज्या स्वरलतेच्या लहरत्या स्वरांच्या हिंदोळ्यावर कोट्यवधी मने झुलली, खुलली आणि नव्याने उमललीही, तो स्वर तर चिरंजीवीच आहे. ज्यांनी ज्यांनी तो ऐकला, त्यांना त्याचे विस्मरण अशक्य. तो तुमच्या आमच्या आयुष्याचे अतूट अंग बनून राहिला आहे आणि राहणार आहे!
पुलं म्हणाले होते, ‘या जगात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे.’ परतत्त्वाचा स्पर्श झालेला हा स्वर नक्कीच चिरंतन, अविनाशी आहे आणि राहील. हा स्वर साक्षात् श्रीहरीची बासरीच जणू. मंजुळ तर खरीच, पण ओतप्रोत भिजल्या स्वरांची ही मंगलधून. या लखलखीत तेजस्वी स्वराला पावित्र्याचे कोंदण आहे. काल आपल्याला सोडून गेले आहे ते खेळत्या वयात नाना जबाबदार्‍या अंगावर पडलेले, आयुष्यभर भावंडांसाठी झिजलेले, त्यांची सदैव सावली होऊन राहिलेले, एक निष्प्राण अचेतन शरीर. लोपले आहे एक व्रात्य, खोडकर, मिश्कील भाबडे मन. अगदी आभाळाची उंची गाठूनही सदोदित पराकोटीचे विनम्र आणि विनयशील राहिलेले असे एक व्यक्तिमत्त्व. त्या दोन लांबसडक वेण्या, ती इवलीशी जिवणी, त्या लख्‌कन चकाकणार्‍या कानातल्या हिर्‍याच्या कुड्या आणि त्याहून चमकदार असे चेहर्‍यावरचे ते दिलखुलास प्रांजळ हसू आता पुन्हा कधीच दिसणार नाही हे खंतावणारे आहेच, पण तो महान स्वर आपल्या सोबतीला आहे आणि असेल हा दिलासा काय कमी आहे?
लतादीदींविषयी, त्यांच्या त्या दैवी स्वराविषयी, त्यातील त्या देवदत्त गंधाराविषयी, त्याने विश्वाला घातलेल्या गवसणीविषयी काय काय लिहायचे? काही प्रसंग असे असतात जिथे शब्द मुके होतात. न बोलणेच खूप काही बोलून जात असते. लतादीदींचे जाणे हा असाच मौनाचा क्षण आहे. आपण फक्त त्या तेजापुढे नतमस्तक व्हायचे आहे. भावभिजल्या अंतःकरणाने मूक श्रद्धांजली वाहायची आहे. या स्वरलतेच्या कर्तृत्वाचे गणिती मोजमाप करण्याची ही वेळ नव्हेच नव्हे. फक्त तिची ती अवीट गोडीची सुमधुर गाणी ऐकावीत आणि तिला, तिच्या स्वराला जसे जमेल तसे ह्रदयात साठवून घ्यावे. काळाच्या पल्याड गेलेला लताचा आर्त स्वर हा तुम्हा आम्हाला लाभलेला एक अनमोल अक्षय्य ठेवा आहे ही जाणीव फक्त हवी.
दीनानाथांनी जाताना काय दिले होते आपल्या ह्या कोवळ्या कन्येला? ‘कोपर्‍यातला तंबोरा, उशीपासची चीजांची वही आणि श्रीमंगेशाची कृपा याशिवाय तुला देण्यासारखे माझ्यापाशी काही नाही’ असे सांगून निजधामाला गेलेल्या पित्याच्या पुण्याईला या गुणी मुलीने आयुष्यभर अपार कष्टांची, मेहनतीची जोड दिली म्हणूनच तर पार्श्वगायनाच्या स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये अपार उत्तुंगता तिला गाठता आली. अशी आभाळाची उंची की भोवतीचे सारे विश्व थिटे वाटावे, कानांत वारा जावा. पण हिची मातीमध्ये गेलेली मुळेच इतकी खोल की, उतण्या – मातण्याला मुळी वावच नव्हता. मंगेशाचे हे लेकरू नेहमी त्याच्या चरणांशी लीनच राहिले.
दीदींचे सांगीतिक कर्तृत्व तर मोठेच, परंतु त्यांचा साधेपणा, त्यांची विनम्रता, देव, देश, संस्कृतीवरची त्यांची निःस्सीम निष्ठा त्याहूनही मोठी. या देशात महान गायक गायिका अनेक होते, आहेत आणि होतीलही, परंतु लतादीदींचे कर्तृत्व अधिक झळाळून उठते, प्रत्येकाला अगदी आपलेसे वाटते ते त्यांच्यातील ह्या गुणांमुळे.
थोर थोर व्यक्तींनी भूलोकीच्या या सरस्वतीचे गुणगान वर्षानुवर्षे केले आहे. कवींनी तिच्यावर कविता रचल्या, तर शायरांनी शायर्‍या -मजरुह म्हणाले,
‘एक लम्हेंको जो सुन लेते है
नग्मा तेरा|
फिर उन्हें रहती है जीनेकी
तमन्ना बरसों॥
नौशादना जाणवले, लताच्या आवाजातील प्रेमगीते ऐकताना जणू भारताचे ह्रदयच धडकत असते. ते लिहून गेले,
‘सुनी सबसे मोहब्बतकी जुबॉं
आवाज मे तेरी |
धडकता है दिल ए हिंदोस्तॉं
आवाज में तेरी ॥
विजय तेंडुलकर फार पूर्वी म्हणाले होते, ‘वेळूच्या बनात वेडे वारे सुटावे तशी एक मुलगी गातेच आहे.’ खरोखर ही मुलगी अव्याहत गातच राहिली. तिने आपल्या वेदनेचे गाणे केले, आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे ज्ञानेश्वरांचे विश्वाचे आर्त तिच्या स्वरांत उतरले. त्या स्वराने त्यामुळे केवळ ह्रदयाच्या तारा छेडल्या नाहीत, ऐकणार्‍याच्या आत्म्याशीच नाते जोडले.
‘सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण, कृष्णाच्या मुरलीची साद हे सर्व एकवटून विधात्याने हा आवाज घडवला असला पाहिजे’ असे आचार्य अत्र्यांनी तिच्याविषयी लिहून ठेवले. वि. स. खांडेकरांनी लिहिले, ‘लताबाईंचा उदय होईपर्यंत ते चांदण्यांनी भरलेले आकाश होते, पण चंद्रकोर उगवलेली नव्हती.’ रामभाऊ शेवाळकर म्हणाले, ‘लताबाईंचा आवाज ही श्रवणसुखाची माधवीच.’ ह्या सगळ्या महारथींनी जिच्याविषयी असे भरभरून लिहिले, तिच्याविषयी आणखी लिहायचे असे कुठे काय राहिले आहे?
लतादीदी केवळ एक पार्श्वगायिका नव्हत्या. वाचन, मनन, परिशीलनाने आलेली एक परिपक्व दृष्टी त्यांच्यापाशी होती. कविता आणि गीते समजून उमजून गाण्याचा त्यांचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. संगीतकार यशवंत देव यांनी दीदींवरील कवितेमध्ये हे नेमकेपणाने पकडले आहे –
‘‘सगळे गाती सूर लावूनी,
जीव लावुनी गातो कोण?
कवितेच्या गर्भात शिरूनी,
भावार्थाला भिडतो कोण?
लतादीदी प्रत्येक गाण्याच्या शब्दाशब्दाला अशा जीव लावून भिडल्या. विरामचिन्हांनाही त्यांनी स्वरांतून अधोरेखित केले म्हणूनच त्यांची गाणी अजरामर ठरली आणि त्या या युगाच्या सर्वश्रेष्ठ गायिका ठरल्या आहेत. हा आवाज नुसता मधुर आवाज नाही. हा स्वर या शतकाचा स्वर आहे. दीदींच्या जाण्याने पार्श्वसंगीताचे एक सुवर्णयुग संपले आहे.
‘मंगेशकर भावंडांच्या दारी सुरांचा पिंपळ आहे’ असे पुलं एकदा म्हणाले होते. त्याची थोरली फांदीच काल उन्मळून पडताच जी सुन्नता आणि शांतता आसमंतात भरून राहिली आहे, ती जीवघेणी आहे. एखादे मोठे माणूस जाते तेव्हा मागे पोकळी राहिली असे म्हणण्याचा प्रघात आहे. लतादीदींच्या जाण्याने खरोखरीच जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधीही न भरून निघणारी आहे. अनेक प्रतिलता, अतिलता आल्या नि गेल्या. लता लता राहिली.कालचे गाणे आणि गायक आज लक्षात राहात नाही अशा गतिमान युगातून आपण आज चाललो आहोत. परंतु या युगावर एक अशी अभंग अक्षरमुद्रा कोरली गेलेली आहे जी कधीही पुसली जाणार नाही. तिचे नाव आहे लता मंगेशकर! लतादीदींच्या स्वरांनी आपल्या जीवनातील हरेक ऋतुला वसंतवैभव दिले आहे. आपण सारे किती भाग्यशाली की आपल्या आयुष्यात आपल्याला या कल्पलतेचा स्वर मनमुराद ऐकता आला. यापुढेही मन करील तेव्हा तो भरपूर ऐकता येईल. अमरत्व म्हणतात ते दुसरे काय असते?