लक्ष्य सेनची ३२व्या स्थानी झेप

0
109

भारताचा उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेन याने काल मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत पुरुष एकेरीमध्ये ३२वे स्थान मिळविले आहे. नऊ स्थानांची झेप घेत त्याने आपल्या नेत्रदीपक कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान प्राप्त केले. रविवारी झालेली बांगलादेश आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धा जिंकल्याचा फायदा सेन याला झाला. ढाका येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेन याने मलेशियाच्या लियोग जून हाओ याचा २२-२०, २१-१८ असा पराभव केला होता. सेन याने यंदाच्या कॅलेंडर वर्षांत आत्तापर्यंत पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत एकही स्पर्धा जिंकण्यात अपयश आलेल्या लक्ष्य याने सप्टेंबरमध्ये झालेली बेल्जियन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. यानंतर डच ओपन सुपर १००, सारलॉरलक्स सुपर १०० व ऑक्टोबर महिन्यात स्कॉटिश ओपन स्पर्धा जिंकली. पुरुष एकेरीत लक्ष्य वगळता प्रमुख भारतीय खेळाडूंच्या स्थानात बदल झालेला नाही. बी. साई प्रणिथ व किदांबी श्रीकांत अनुक्रमे ११व्या व १२व्या स्थानी कायम आहेत. यानंतर पारुपल्ली कश्यप (२३), एचएस प्रणॉय (२६), सौरभ वर्मा (२८), समीर वर्मा (३३), शुभंकर डे (४४) यांचा क्रमांक लागतो.

महिला एकेरीच्या खेळाडूंमध्ये ऑलिंपिक पदकविजेती पीव्ही सिंधू व सायना नेहवाल अनुक्रमे सहाव्या व ११व्या स्थानी जैसे थे आहे. दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अस्मिता चलिहा हिने मोठी उडी घेताना १३ स्थानांची प्रगती करत ८३व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्ससह वर्षांत एकूण सात स्पर्धा जिंकलेल्या चेन युफेई हिने ताय त्झू यिंगला पछाडत पहिल्या स्थानासह वर्षाची सांगता केली. पुरुष दुहेरीत एकही भारतीय जोडी ‘टॉप १०’मध्ये नाही. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी एका स्थानाने वर सरकताना १२वे स्थान प्राप्त केले. अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी ही महिला दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी ३३व्या स्थानावर राहिली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी २८वे स्थान मिळविले.