लई न्हाई मागणे…

0
35
  • – मीना समुद्र

‘लई न्हाई’ म्हणत आपण कितीतरी मागण्या करत असतो. आपल्या जास्तीत जास्त मागण्या या परमेश्‍वराकडे असतात. तो सर्वशक्तिमान, सामर्थ्यवान असा ईश्‍वर आपल्या मागण्या पूर्ण करेल अशी श्रद्धा आणि विश्‍वास ठेवून आपण त्याला आळवीत असतो. या मागणीला ना अंत ना पार!

‘लई न्हाई, लई न्हाई, मागणे लई नाही…’ म्हणत आपण किती मागण्या मागत असतो. आपल्या जास्तीत जास्त मागण्या या परमेश्‍वराकडे असतात. तो सर्वशक्तिमान, सामर्थ्यवान असा ईश्‍वर आपल्या मागण्या पूर्ण करेल अशी श्रद्धा आणि विश्‍वास ठेवून आपण त्याला आळवीत असतो. हे मागणे कधी श्‍वासाइतके सहज, तर कधी प्रतिक्षित क्रियेसारखे मनातून उमटते. आपल्या मेंदूत काही पेशी अशा असाव्यात ज्या सतत या कामासाठी तत्पर असतात असे वाटावे, इतक्या सहजपणे आपण मागण्या करत असतो. अशावेळी अनायासपणे हात जोडले जातात, मस्तक नमवले जाते आणि आपण म्हणतो ः हे शुभमंगल नीट पार पडू दे, नियोजित काम होऊ दे, आयोजित कार्यक्रम सुरळीत पार पडू दे, नोकरी मिळू दे, धंद्यात भरभराट होऊ दे, घर बनू दे, संतानप्राप्ती होऊ दे, लॉटरी लागू दे, आजार्‍याला बरे वाटू दे… देवा, हे होऊ दे अन् ते होऊ दे! मागणीला ना अंत ना पार!!
माणसाच्या इच्छा आणि गरजा खूपच वाढल्या. जबाबदारीचे ओझे असले की मन हावेने, स्वार्थाने भरून जाते आणि मग मागण्या सुरू होतात कधी देवाकडे, कधी माणसांकडे… अगदी नवे कपडे, चप्पल, बूट, खेळाची साधने, काही ना काही सतत मागण्याची ही खोड माणसाला असतेच असते. मागितल्याशिवाय मिळत नाही असेही म्हटले जाते आणि मागूनही मिळणार नाही असं स्थळ, मुलगा, मुलगी मिळाल्याचेही म्हटले जाते. मागणी पुस्तकांची, चांगल्या विचारांची, चांगल्या संगीताची असावी. खरं तर अशी मागणी आपल्या सकाळच्या प्रार्थनेत असते. विद्यादयासागर अशा प्रथमेशाला नमन करून ‘अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे’ अशी विनंती केली जाते. चिंता, क्लेष, दारिद्य्र, दुःख अवघे देशांतरा पाठवण्याची ही विनंती म्हणजेही मनाने केलेली मागणीच! नवस हाही मागणीचीच पहिली पायरी. आपलं सारं जीवन, पीकपाणी पावसावर अवलंबून; त्यामुळे आपण आभाळातल्या देवाकडे ‘पाऊस पाड गा’ अशी मागणी करतो. वेळेवर पाऊस पडला आणि शेते पिकली की तीच मागणी ‘आता अवेळी पडून हाती आलेलं पीक वाया जाऊ देऊ नको रे बाबा’ अशी विनवणीत बदलते. पाऊस वेळेवर पडावा म्हणून पूजा, अभिषेक, प्रार्थना चालू असतात. ‘तुझी अवकृपा नको व्हायला’ ही पण एक इच्छात्मक मागणी असते. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या तरी इतर वस्तूंची मागणी चालूच असते. ‘पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी’ असं म्हणणारे फारच थोडे.
मागणे शब्दाचा अर्थ भीक, याचना, करुणा, प्रार्थना, दीनता, नम्रता, विनवणी, आर्त भाव, आवाहन आणि आव्हान अशा अनेक छटांनी व्यक्त होतो. भिकार्‍याचे भीक मागणे वेगळे. एखाद्या शेतकर्‍याने, मजुराने सावकाराकडे, जमीनदाराकडे पैशासाठी याचना करणे वेगळे. सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवाची करुणा भाकणे, त्याच्याकडे प्रार्थना करणे, लीनतेने-दीनतेने विनवणी करणे हेही मागणीचेच वेगळे प्रकार. पूर्वी माधुकरी मागायला मुलं यायची. पण पाच घरांत मागून जे मिळेल तेवढेच खायचं असाही नियम असे. काही जोगतिणीही पाच घरे धान्य मागून त्यावर उदरनिर्वाह करत. कुणी नवसासाठी असा जोगवा मागतात. एखादी शेजारीण साखर, दूध किंवा मिरची-कोथिंबिरीची मागणी करते.

स्वाभिमानी मनुष्य मात्र कुणाची याचना करत नाही. कुणापुढे हात पसरत नाही. कुणापुढे पदर पसरत नाही. देशभक्त देहदंडाची, तुरुंगवासाची, अनन्वित हालअपेष्टांची शिक्षा सहन करतो; पण प्राणांची भीक मागत नाही, याचना करीत नाही. समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवी कल्याणासाठी होणार्‍या मागण्या या रास्त असतात. सुभाषबाबूंनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढताना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा’ अशी मागणी आणि घोषणा केली. डॉ. आंबेडकर स्वतंत्रता, समता, बंधुत्वासाठी झटले. गांधीजींनी सत्य, अहिंसेची मागणी लोकांपुढे मांडली. गोवामुक्तिसंग्रामातील शूरवीर लढवय्ये ‘आमचे गोंय आमका जाय’ या मागणीसाठी लढले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी प्रार्थना सागराकडे केली. विवेकानंदांनी कार्योत्सुक अशा युवकांची मागणी केली.

बळीराजा पावसासाठी देवाला गार्‍हाणे घालतो. कर्जफेडीसाठी जमीनदाराकडे मुदतवाढीची मागणी करतो, गयावया करतो. भाडेकरू घरमालकाकडे अशीच मागणी करतो. नोकरचाकर पगारवाढीसाठी धरणे धरतात. समान वेतन, नियमित सेवा, सोयीसुविधा अशा न्याय्य हक्कांसाठी भांडतात. मागण्यांसाठी आंदोलन, संप, बंद, हरताळ घडल्यामुळे सामाजिक व्यवहार ठप्प होतात. ‘हमारी मॉंगे पूरी करो’ हाच त्यांचा नारा असतो. शाळेतला विद्यार्थी मार चुकावा, शिक्षा चुकावी म्हणून शिक्षकांकडे याचना करतो, गयावया करतो. अनेक कार्यालये, आस्थापने यांतून कधी टेबलाखालून तर कधी वजन वापरून पैशांची मागणी केली जाते आणि अवैध व्यवहार चालू राहतात. अशा मागण्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. नैतिकता माजवणार्‍या, स्वैराचार पसरवणार्‍याही मागण्या असतात. मुलेबाळे खाऊ, कपडे, दूध अशासाठी आईवडिलांकडे हक्काने मागणी करतात. त्यात मायेच्या स्पर्शाची, प्रेमाची इच्छा अनुस्यूत असते. आईचे लक्ष जावे म्हणून सतत मागणीचा उद्घोष चालू असतो. आपल्याला घराचा हिस्सा मिळावा, ताबा मिळावा, संपत्ती-सत्तेवर हक्क मिळावा अशा मागण्या तर सर्रास आढळतात. काही सेवाभावी डॉक्टर्स सोडले तर खाजगी इस्पितळांत रोग्याला हात लावण्याआधी पैशांची मागणी केली जाते.

वस्तूंचा, अन्नधान्याचा अभाव असेल किंवा ते कमी असेल तेव्हा त्याची मागणी करावी लागते. सगळीकडे मागणी तसा पुरवठा होतोच असे नाही. नवीन कल्पक योजनांसाठी मागणी केली जाते. आपल्याकडे उत्पन्न न होणारी फळे, भाज्या, वस्तू या मागविल्या जातात. शेजारच्या राज्यांतून, प्रदेशांतून किंवा परदेशातूनही मागवल्या जातात. यामुळेच आयात-निर्यातीचा व्यवहार चालू राहतो; संबंधही जोडले जातात. फक्त मागून न मिळणार्‍या गोष्टींपैकी एक म्हणजे मैत्री, प्रेम. हे आपोआप जुळून यावे लागते. हृदयाशी रेशिमबंध जुळावा लागतो.
‘तेजस्विनावधीतमस्तु| मा विद्विषावहै’ ही त्या सर्वशक्तिमानाला केलेली प्रार्थना, ही बुद्धी तेजस्वी होण्यासाठी केलेली मागणीच.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया|
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चित् दुःखभाग् भवेत्‌|
हीसुद्धा ‘विश्‍वैक नीडं’ची उदात्त कल्पना उराशी बाळगणार्‍या भारतीय ऋषिमुनी, संत-साधूंनी ईश्‍वराजवळ केलेली मागणीच आहे.

कविवर्य कुसुमाग्रज सर्वात्मक सर्वेश्‍वराला ‘जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा…’ असेच आळवतात. ‘गगन सदन तेजोमय’ या प्रार्थनेतून सारे तिमिर हरून ‘दे प्रकाश देई अभय’ अशीच मागणी करतात. आणि ज्ञानेश्‍वर माऊली तर विश्‍वात्मक ईश्‍वराकडे पसायदान मागताना म्हणतात-
दुरितांचे तिमिर जावो| विश्‍व स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात
ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी सर्वांना प्राप्त होवो. ‘मार्तंड जे तापहीन’ अशा अमृतसागर सज्जनांशी नाती जुळोत. ‘माणसाने माणसाला माणसासम’ वागविले जाते तेव्हा अशी सुविचारी, सर्वमंगलाची काळजापासून केलेली मागणी परमात्मा पूर्ण करतो, हे नक्की!