Home बातम्या लईराई जत्रोत्सवात धोंड व भाविकांसाठी दोन स्वतंत्र रांगा

लईराई जत्रोत्सवात धोंड व भाविकांसाठी दोन स्वतंत्र रांगा

0

गतवर्षीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय; सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक; देवस्थानच्या कार्यकारी अध्यक्षांची माहिती

शिरगाव येथील श्री लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करून कडक सुरक्षा व्यवस्था अवलंबण्यात आली आहे. जत्रोत्सव दरवर्षीप्रमाणे धोंडांसह सर्वसामान्य भाविकाना खुला असेल. यावर्षी देवीचे धोंड आणि सर्वसामान्य भाविकांसाठी दोन वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. धोंड आणि भाविकांना सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक आहे, अशी माहिती श्री लईराई देवस्थानच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. दरम्यान, गतवर्षी झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक भाविक जखमी झाले होते.

गतवर्षीच्या जत्रोत्सवातील दुर्दैवी घटनेनंतर यावर्षी श्री देवी लईराई जत्रोत्सवात सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरवर्षीप्रमाणे धोंडांसह सर्व भाविक भक्तांना जत्रोत्सव खुला आहे, असे गावकर यांनी सांगितले.

गतवर्षी ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली होती. त्याठिकाणच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. देवस्थानकडे येणाऱ्या रस्त्यावर एकही दुकान थाटण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. देवस्थानच्या जत्रोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेचे 18 एप्रिल रोजी संध्याकाळी प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

देवस्थानच्या महाजनांच्या सभेत श्री लईराई जत्रोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे जत्रोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव बारगळला. देवस्थान समितीने कला व संस्कृती खात्याशी संपर्क साधून राज्य उत्सवाबाबतची माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर महाजनांची सभा आयोजित करून त्यांच्यासमोर कला व संस्कृती खात्याने तयार केलेल्या प्रस्तावाची माहिती सर्वांसमोर ठेवली होती, असेही दीनानाथ गावकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला देवस्थानच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी भास्कर गावकर, आतिश गावकर, दयानंद गावकर, सुभाष गावकर, समीर गावकर, प्रकाश गावकर, वासू गावकर यांची उपस्थिती होती.

राज्य सरकारने यंदा जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक सूचना केल्या आहेत.
देवस्थान निधीतून सुमारे 13 ते 14 लाख रुपये खर्च करून मंदिराच्या परिसरात 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

भाविक आणि धोंडांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी दुहेरी रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिराच्या परिसरात केवळ नऊ दुकाने थाटण्यास मान्यता दिली आहे, तर मागील बाजूला 25 दुकाने थाटण्यास मान्यता देण्यात आली आहे.

देवालयापासून तळीपर्यंत दुकानांना परवानगी दिली जाणार नाही.
जत्रोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेचे काम पोलीस प्रशासन पाहणार आहे.
पोलिसांच्या मदतीसाठी सुमारे 100 स्वयंसेवक तैनात केले जातील.

नोंदणी न केलेल्या धोंडांनाही प्रवेश

देवस्थानाने केलेल्या आवाहनानंतर देवस्थानचा धोंड म्हणून नोंदणी करण्यासाठी 20 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. देवस्थान समितीने आत्तापर्यंत केवळ 7 हजार ओळखपत्र तयार केली आहेत. ह्या ओळखपत्रांचे वितरण केलेले नाही. जत्रोत्सवामध्ये नोंदणी न केलेले धोंड सुध्दा सहभागी होऊ शकतात. धोंडांना देवीचे दर्शन व धार्मिक विधीच्या वेळी कुटुंबीयांना सोबत ठेवता येणार नाही. धोंडांना होमकुंड, तळीवर ये-जा करण्यासाठी दोन वेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत, असे दीनानाथ गावकर यांनी सांगितले.