लंकेसाठी ‘करो या मरो’

0
104

भारत व श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूर येथील होळकर स्टेडियमवर होणार आहे. मैदानाचा आकार लहान असल्याने तसेच खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असल्याने गोलंदाजांना या मैदानावर अधिक मेहनत करावी लागणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असल्याने आव्हान राखण्यासाठी श्रीलंकेला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकावा लागणार आहे.

मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांच्या बळावर भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला लोळविण्याचे काम केले होते. फलंदाजीत लोकेश राहुल, धोनी व मनीष पांडे यांच्यासह अय्यरनेदेखील चमक दाखवली होती. त्यामुळे आव्हानात्मक धावसंख्या रचणे भारताला शक्य झाले होते. डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट याच्या वाट्याला पहिल्या सामन्यात केवळ दोन षटके आली होती. या दोन षटकांत त्याने केवळ ९ धावा मोजून एक बळीदेखील मिळविला होता. त्यामुळे त्याला वगळून थम्पी किंवा मोहम्मद सिराज यांना खेळविणे योग्य होणार नाही. परंतु, नवीन खेळाडूंची चाचपणी करण्यासाठी बदल करायचे ठरवल्यास उनाडकटवर गदा येऊ शकते. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ सदीरा समरविक्रमा या स्फोटक फलंदाजाला ‘अंतिम ११’मध्ये स्थान देऊ शकते. यासाठी वेगवान गोलंदाज विश्‍वा फर्नांडो किंवा दुष्मंथ चमीरा यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. अँजेलो मॅथ्यूज व दासुन शनका काही षटके टाकू शकत असल्याने अतिरिक्त फलंदाज खेळविणे लंकेच्या कामी येऊ शकते. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसर्‍यातही दवाचा परिणाम जाणवणार असून नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजीला प्राधान्य देऊ शकतो.

भारत संभाव्य ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, बासिल थम्पी, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल.
श्रीलंका संभाव्य ः निरोशन डिकवेला, उपुल थरंगा, सदीरा समरविक्रमा, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, थिसारा परेरा, दासुन शनका, अकिला धनंजया, दुष्मंथ चमीरा व नुवान प्रदीप