Home बातम्या रो-रो फेरीबोटीत स्थानिक नागरिक, दुचाकींना शुल्क नाही

रो-रो फेरीबोटीत स्थानिक नागरिक, दुचाकींना शुल्क नाही

0

नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रमसिंग भोसले यांची माहिती; पर्यटकांना मात्र शुल्क लागू होणार

रायबंदर ते चोडण या जलमार्गावर नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रो-रो फेरीबोटीमध्ये स्थानिक नागरिक आणि दुचाकी वाहनांना शुल्क आकारले जाणार नाही. पर्यटकांच्या कारगाड्यांना 300 रुपये, पर्यटक भाडोत्री वाहनांना 100 रुपये, स्थानिकांच्या चारचाकी वाहनांसाठी 30 रुपये आणि पास घेतल्यास 15 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रमसिंग भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
रो-रो फेरीबोट सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत वाहतूक करणार आहे. रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत नदी परिवहन खात्याच्या साध्या फेरीबोटी वाहतूक करतील, असेही भोसले यांनी सांगितले.
खात्याचा महसूल वाढविण्यासाठी रो-रो फेरीबोटीवर पर्यटक भाडोत्री कारगाड्यांना 100 रुपये, पर्यटकांच्या कारगाड्यांना 300 रुपये, मध्यम आकाराच्या वाहनांना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. रो -रो फेरीबोटीवर मोजमजेसाठी जाणाऱ्या पर्यटकांकडून 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. रो-रो फेरीबोटीवर वातानुकलीत कक्ष आणि शौचालयाची सुविधा आहे. एका वेळेला 40 दुचाकी आणि 16 चारचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता रो-रो फेरीबोटीची आहे, असेही भोसले यांनी सांगितले.
‘ती’ फेरीबोट बाहेर काढण्याचे काम सुरू
चोडण येथे फेरी धक्क्यावर नदीत बुडालेली फेरीबोट आठवडा उलटला तरी बाहेर काढण्यास यश आलेले नाही. ही फेरीबोट बाहेर काढण्याचे काम सुरू असून, नदीतील चिखलात फेरीबोट रूतल्याने बाहेर काढण्याच्या कामात अडथळा येत आहे, अशी माहिती विक्रमसिंग भोसले यांनी दिली.
गेल्या 23 जून रोजी सकाळी चोडण धक्क्यावर एक फेरीबोट नदीच्या पात्रात बुडाली होती. या फेरीबोटीतून नदीत पडलेली तीन दुचाकी वाहने नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली आहेत. पण, फेरीबोट बाहेर काढण्यात अजूनपर्यंत यश आलेले नाही.

रो-रो फेरीबोट सेवा कधीपासून?
रो-रो फेरीबोटीच्या शुल्काला मान्यता मिळाली असून, ही सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत सुरू केली जाणार आहे, असेही विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले.