रोहितसह पाच खेळाडूंची ‘खेलरत्न’साठी शिफारस

0
148

>> राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत झाला निर्णय

‘हिटमॅन’ तथा टीम इंडियाचा मर्यादित क्रिकेटमधील उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मा याच्यासह महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅराल्मिपिक सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलू, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट व भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांची प्रतिष्ठेच्या व देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानल्या जाणार्‍या ‘राजीव गांधी खेलरत्न’साठी शिफारस करण्यात आली आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी साजरा होणार्‍या ‘क्रीडा दिनी’ राष्ट्रपती भवनात या क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाते. परंतु कोरोना महामारीच्या देशातील वाढत्या संकटामुळे यंदा या पुरस्कार विजेत्यांची नावे ऑनलाइन पद्धतीने घोषित केली जाणार आहेत.
काल मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर विस्फोट सलामीवर रोहितची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली तर तो हा मानाचा किताब प्राप्त करणारा चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर (१९९८), माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२००७) व टीम इंडियाचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहली (२०१८) यांना या प्रतिष्ठेच्या व क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

हिटमॅन या नावाने परिचित असलेला रोहित शर्मा टीम इंडियाचा सलामीवर म्हणून गेली काही वर्षे क्रिकेट विश्व गाजवत आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात त्याने धडाकेबाज व विक्रमी कामगिरी करताना ५ शतके आणि १ अर्ध्यशतकासह ६४८ धावा कुटल्या होत्या. याच त्याच्या कामगिरीमुळे प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस केली होती. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके नोंदविण्याचा पराक्रमही त्याने केलेला आहे. ३३ रोहितने क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून १४,००० धावा तसेच ३९ शतके व ७४ अर्धशतके नोंदविली आहेत.

टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव गाजवत असलेल्या युवा पॅडलर मनिका बत्राचीही निवड निश्‍चित समजली जात आहे. मनिकाने २०१८पासून महिला एकेरी व दुहेरीत बरीच पदके भारताच्या खात्यात जमा केलेली आहेत. दिल्ली येथे २०१८साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांत तिने महिला एकेरी व सांघिक विभागात सुवर्णपदक प्राप्त केले होते. तसेच २०१८च्या जकार्ता आशियाई खेळांत मिश्र दुहेरीत भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले होते.
पॅराल्मिपिकपटू मरियप्पन थंगावेलूने २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक महाकुंभात टी४२ उंच उडी विभागात ऐतिहासिक कामगिरी करताना सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यासाठी त्याला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त त्याला २०१७साली पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.

विनेश फोगाट ही भारताच्या कुस्तीपटू घराण्यातून आलेली आहे. तिने २०१९ साली नूर-सुल्तानमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. तसेच राष्ट्रीय खेळांत दोन वेळा सुवर्णपदकही मिळवलेले आहे. २०१८च्या जकार्ता आशियाई खेळांत तिने सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. २०१६साली तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.

राणी रामपालने भारतातील महिलांच्या हॉकीला नवीन उंचीवर नेले आहे आणि तिच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. जकार्ता मध्ये २०१८ च्या आशियाई गेम्समध्ये रामपालने भारताला गटात अव्वल स्थान मिळवून अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. परंतु या रोमहर्षक सामन्यात भारताला दुर्दैवाने जपानकडून १-२ने पराभव पत्करावा लागला होता.

अर्जुन पुरस्कार
अर्जुन पुरस्कारांसाठी २९ जणांची शिफारस दरम्यान, अर्जुन पुरस्कारासाठी टीम इंडियाचा दु्रतगती गोलंदाज ईशांत शर्मासह एकूण २९ खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात आलेली आहे. ईशांत शर्माच्या व्यतिरिक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंत भारताचा रिकर्व्ह तिरंदाज अतानू दास, महिला हॉकीपटू दीपिका ठाकूर, क्रिकेटपटू दीपक हुड्डा, युवा टेनिसस्टार दिविज शरण, महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी-सात्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या नावांचाही समावेश आहे. यापैकी साक्षी मलिक (२०१६) आणि मिराबाई चानू (२०१८) यांनी खेलरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार द्यायचा कि नाही याचा निर्णय निवड समितीने क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याचे समजते.

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार
द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी आठ जणांची शिफारस झाली आहे. त्यात धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (ऍथलेटिक्स), शिव सिंग (महिला मुष्टियुद्ध), रोमेश पठाणिया (पुरुष हॉकी), के.के. हूडा (कबड्डी), विजय मुनिश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस) आणि ओ.पी. दहिया (कुस्ती) यांचा समावेश आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार
द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी योगेश मालविया (मल्लखांब), गौरव खन्ना (पॅरा-बॅडमिंटन), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप हांडू (वुशू) आणि ज्युड फेलिक्स (हॉकी) या पाच प्रशिक्षकांची शिफारस झालेली आहेे.

ध्यानचंद पुरस्कार
ध्यानचंद पुरस्कारासाठी एकूण १५ जणांची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यात जिन्सी फिलिप्स (ऍथलेटिक्स), कुलदीप सिंग भुल्लर (ऍथलेटिक्स), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन), प्रदीप गंधे (बॅडमिंटन), एन उषा (मुष्टियुद्ध), लाखा सिंग (मुष्टियुद्ध), सुखविंदर सिंग संधू (फुटबॉल), अजित सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (कबड्डी), मनजीत सिंग (रोइंग), कै. सचिन नाग (जलतरण), नंदन बाल (टेनिस), नेतार पाल हूडा (कुस्ती) आणि जे रणजीत कुमार (पॅरा-ऍथलेटिक्स) यांचा समावेश आहे.