‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबमधील अग्नितांडव दुर्घटनेप्रकरणी अपात्र ठरवण्यात आलेले हडफडे-नागवा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर व बडतर्फे तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर हे दोघेही सध्या बेपत्ता असून, अटकेच्या भीतीने त्यांनी पलायन केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हणजूण पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
6 डिसेंबर 2025 रोजी बर्च नाईटक्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी रोशन रेडकर व रघुवीर बागकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्या दोघांनीही अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, तेव्हापासून वरील द्वयी बेपत्ता असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
शुक्रवारपासून रोशन रेडकर हे घरी नसल्याने त्यांना अटक करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. पोलिसांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवलेली असून अन्यत्रही त्यांचा शोध घेतला जात आहे. रेडकर व बागकर हे पंचायतीतर्फे दिल्या जाणाऱ्या परवान्यांबाबत या प्रकरणी दोषी आहेत.