रॉयच्या जागी सॅम्स

0
100

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने इंडियन प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने १.५ कोटी रुपये मोजून रॉयला आपल्या संघात सामावून घेतले होते. दुखापतीच्या कारणास्तव त्याने या आठवड्यातील पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतूनही अंग काढून घेतले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने याची माहिती दिली आहे.

कॅपिटल्सने रॉय याच्या जागी दुसरा फलंदाज न निवडता ऑस्ट्रेलियाचा नवोदित डावखुरा जलदगती गोलंदाज डॅनियल सॅम्स याला संघात स्थान दिले आहे. आयपीएलमधून अंग काढून घेणारा रॉय हा इंग्लंडचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी अष्टपैलू ख्रिस वोक्स याने न खेळण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे कॅपिटल्सला दक्षिण आफ्रिकेच्या ऍन्रिक नॉर्के याला घ्यावे लागले होते. आयपीएलमध्ये खेळण्याची सॅम्स याची ही पहिलीच वेळ असेल.

२०१९-२०च्या बिग बॅश मोसमात सिडनी थंडर्सकडून खेळताना त्याने स्पर्धेत सर्वाधिक ३० बळी घेतले होते. याच कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी निवडण्यात आले आहे. ४ ते १६ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या या दौर्‍यात प्रत्येकी ३ वनडे व ३ टी-ट्वेंटी सामने खेळविण्यात येणार आहेत.