>> मंत्री गोविंद गावडे यांची ग्वाही
राज्यातील रेशन कार्डधारकांच्या माथी सडलेला कांदा मारला जाणार नाही. रेशन कार्डधारकांना सडका कांदा मिळाल्यास त्यांनी स्वस्त धान्य दुकानात परत करावा. त्यांना कांदा बदलून दिला जाईल, अशी ग्वाही नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.
सरकारने कांद्याच्या दरवाढीमुळे रेशन कार्डधारकांना महिना तीन किलो कांदा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी पुरवठा खात्याकडून या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. रेशन कार्डधारकांना पहिल्या टप्प्यात १ किलो कांदा नको, तर तीन किलो कांदा एकाच वेळी दिला जावा, सडलेला कांदा दिला जाऊ नये असे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येणार्या कांदा विक्रीचे कोणीही राजकारण करू नये. स्वस्त धान्य दुकानातून सडका कांदा वितरित केला जात नाही. काही ठिकाणी रेशन कार्डधारकांना सडका कांदा मिळाला असल्यास त्यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानात तो परत करावा. दुकानदार कांदा परत घेत नसल्यास नागरी पुरवठा खात्याच्या तालुका कार्यालयात तक्रार करावी. सडलेला कांदा बदलून देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
राज्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडे कांदा साठवून ठेवण्यासाठी आवश्यक जागा नसल्याने पहिल्या टप्प्यात केवळ प्रत्येकी एक किलो कांदा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, ज्या रेशन धान्य दुकानदारांकडे कांदा साठवून ठेवण्यासाठी आवश्यक जागा असेल त्यांना तीन किलो कांदा एकाच वेळी देण्याची सूचना केली जाईल असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.