आयपीएल-१३ चा आज महामुकाबला

0
113

>> मुंबई-दिल्ली जेतेपदासाठी लढणार

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १३व्या पर्वाचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्स संघ आपल्या पाचव्या जेतेपदासाठी तर दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या जेतेपदासाठी झुंजणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केलेली आहे. त्यांनी गटफेरीत १८ गुणांसह अव्वल स्थानी राहत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तर त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला क्वॉलिफायर-१मध्ये सहज परास्त करीत दिमाखात अंतिम फेरी गाठली. आतापर्यंत चारदा (२०१३, २०१५, २०१७ आणि २०१९) आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचे लक्ष्य पाचवे जेतेपद मिळवण्यावर असेल. मुंबईने दिल्लीला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या गट फेरीतील दोन्ही सामन्यात आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये सहज नमविलेले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, सौरभ तिवारी अशा जबरदस्त फलंदाजांची फळी आहे. अष्टपैलूंच्या विभागात हार्दिक व कृणाल पंड्या बंधू आणि कायरॉन पोलार्ड उत्कृष्ट योगदान देत आहेत. गोलंदाजीत ट्रेंट बौल्ट दुखापतीतून सावरला असल्याने गोलंदाजी पुन्हा मजबूत बनेल. जसप्रित बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. कृणाल पंड्या व राहुल चहर प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.

दुसर्‍या बाजूने मुंबई इंडियन्स संघाने प्रथमच आयपीएल अंतिम फेरीत धडक दिली असल्याने त्यांचे लक्ष्य आपले पहिले जेतेपद मिळवण्यावर असेल. मुंबईच्या जरी सर्व तीनही लढती गमवाव्या लागल्या असल्या तरी क्लॉलिफायर-२मधील सनरायझर्सवरील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. दिल्लीकडून ‘गब्बर’ चांगल्या लयीत आहे. सलग तीन सामन्यातील अपयशानंतर त्याने गेल्या महत्त्वपूर्ण लढतीत ७८ धावांची खेळी करीत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या पर्वांत आतापर्यंत २ शतके व ४ अर्धशतकांसह ६०३ धावा केल्या आहेत. आजही त्याच्याकडून संघाला अशाचा कामगिरीची अपेक्षा असेल. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत व अष्टपैलू मार्कुस स्टॉईनिस चमकले तर मुंबईसाठी ते धोकादायक ठरू शकतात. गोलंदाजीत कागिसो रबाडा व ऍन्रिक नॉर्के हे दक्षिण आफ्रिकन द्वयी जबरदस्त मारा करीत आहेत. गेल्या सामन्यात रबाडा आणि मार्कुस स्टॉईनिसने सनरायझर्सला नेस्तनाभूत केले होते. रबाडाने गेल्या सामन्यांतील ४ बळींसह २९ बळी घेत पर्पल कॅपसाठी दावा केलेला आहे. फिरकीच्या विभागात रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवू शकतात. त्यामुळे आजचा हा अंतिम सामना निश्‍चितच रंगतदार बनणार आहे.

मुंबई इंडियन्स (संभाव्य) ः क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, जेम्स पॅटिंसन, राहुल चहर, ट्रेंट बौल्ट, जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स (संभाव्य) : शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), मार्कुस स्टॉईनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, ऍन्रिक नॉर्के, प्रवीण दुबे.