राज्यात पूर्ण कालावधीचे विधानसभा अधिवेशन बोलवा

0
97

>> दिगंबर कामत यांचे राज्यपालांस साकडे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपण सोमवारी एक पत्र लिहून या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोवा विधानसभेचे पूर्ण कालावधीचे अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले, त्याला आता बरेच दिवस लोटले आहेत. कोविडच्या संकटामुळे, २७ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत होऊ घातलेले पावसाळी अधिवेशन सरकारने केवळ एका दिवसावर आणले व २७ जुलै रोजी केवळ एकच दिवस अधिवेशनाचे सत्र घेतले, याची आठवणही कामत यांनी सदर पत्राद्वारे राज्यपालांना करून दिली आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आपण सरकारकडे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेचे पूर्ण कालावधीचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती, असेही कामत यांनी या पत्रातून राज्यपालांच्या नजरेत आणून दिले आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चेची गरजही कामत यांनी व्यक्त केली आहे.